नायगाव धरण (जिल्हा नांदेड) येथील महिलांची ग्रामपंचायतीसमोर ‘ठिय्या आंदोलना’द्वारे मागणी
|
नांदेड – ‘गावातील देशी मद्याचे दुकान हटवा, मगच सरपंच आणि उपसरपंच निवडा’, अशी अट घालत धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण येथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ९ फेब्रुवारी या दिवशी ठिय्या आंदोलन केले. या वेळी या महिलांनी ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. यामुळे नायगाव ग्रामपंचायतीची सरपंच निवडीची सभा स्थगित करून निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. २१ जानेवारी या दिवशी याच गावातील महिलांनी याच मागणीसाठी धर्माबाद येथील प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते. (महिलांनी यापूर्वी आंदोलन करूनही त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करणारे आंधळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ! लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मद्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळे महिलांनी कायदा हातात घेऊन आंदोलन केल्यास त्यात चूक काय ? – संपादक)
नायगाव धरण येथील देशी मद्याचे दुकान २४ घंटे चालू असते. परिणामी शेजारी असलेल्या तेलंगाणा राज्यातील लोकही याठिकाणी मद्य स्वस्त मिळत असल्याने गर्दी करतात. त्यामुळे गावात मद्यपींचा सतत उच्छाद असतो, तसेच या मद्याच्या दुकानामुळे गावातील पुरुष मंडळी मद्यपी झाली आहेत.
इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी लहान मुलेही मद्याच्या आहारी जाऊन गावभर धिंगाणा घालत असल्याची तक्रार दिली होती; परंतु लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे शेवटी गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू केले. या वेळी धर्माबाद पोलीस आणि तहसील प्रशासना यांनी मध्यस्थी केली; परंतु जोपर्यंत मद्याचे दुकान बंद होत नाही, तोपर्यंत सरपंच आणि उपसरपंच निवड होऊ देणार नाही, अशी भूमिका या रणरागिणींनी घेतली. (पोलीस आणि प्रशासन यांनी नुसती मध्यस्थी करण्यापेक्षा ते गावातील मद्याचे दुकान का बंद करत नाहीत ? वारंवार सांगूनही प्रशासन मागणीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे उद्या याच रणरागिणी महिलांनी अधिक आक्रमक भूमिका घेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक)