पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितलेला दृष्टीकोन ठेवून प्रायश्‍चित्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यावर कोणताही त्रास न होणे

पू. (सौ.) संगीता जाधव

१. सकाळी अल्पाहार न करण्याचे प्रायश्‍चित्त असूनही औषध घेण्यासाठी बाहेरून पदार्थ आणून अल्पाहार करणे आणि या चुकीविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी अंतर्मुख करणे

एका प्रसंगात माझ्याकडून कार्यपद्धतीचे पालन न झाल्याने मी ८ दिवस सकाळचा अल्पाहार न करण्याचे प्रायश्‍चित्त घेतले होते. मला औषध घ्यावे लागत असल्याने दुसर्‍या दिवशी बाहेरून पदार्थ आणून मी अल्पाहार केला; परंतु अल्पाहार केल्यानंतर माझ्याकडून चूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्याकडून झालेली चूक मी पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंना सांगितली. या प्रसंगात पू. काकूंनी ते औषध दुपारी घेतले असते, तर चालले असते का ?, असे विचारून मला अंतर्मुख केले. मी तसे करू शकले असते; पण माझी विचारप्रक्रिया तशी झाली नाही. या चुकीची जाणीव त्या वेळी मला झाली. तेव्हा पू. काकूंनी प्रायश्‍चित्त घेतांना कोणते दृष्टीकोन असायला हवेत ?, या विषयावर मला मार्गदर्शन केले.

२. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी प्रायश्‍चित्त घेण्याविषयी दिलेला दृष्टीकोन 

पू. काकूंनी सांगितले, प्रायश्‍चित्त जर मनापासून घेतले, तर तो स्वभावदोष जाण्यासाठी आपण प्रायश्‍चित्त घेत आहोत, असे वाटून आपल्या मनावरील त्या स्वभावदोषाचा संस्कार नष्ट होतो. कोणीतरी सांगितले आहे; म्हणून प्रायश्‍चित्त न घेता माझी साधना व्हावी, माझ्यात पालट व्हावेत, या तळमळीने प्रायश्‍चित्त घेतल्यास त्याचा खर्‍या अर्थाने लाभ होतो. जर पालटण्याची तळमळ असेल, तर प्रायश्‍चित्तामुळे कोणताही त्रास होत नाही. अल्पाहार न करण्याचे प्रायश्‍चित्त घेतले असेल, तर ८ दिवस त्या वेळी खरेच भूक लागणार नाही आणि स्वतःमध्ये होणारे पालट आनंद देतील; मात्र प्रायश्‍चित्त घेतांना देव माझे पापक्षालन करून माझ्यात पालट करणारच आहे, ही दृढ श्रद्धा हवी.

३. जेव्हा पू. जाधवकाकूंनी सांगितलेला दृष्टीकोन ठेवून मी प्रायश्‍चित्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुढील ७ दिवस मला खरेच भूक लागली नाही किंवा त्याचा कोणताही त्रास झाला नाही.

प.पू. गुरुदेवांनी पू. काकूंच्या माध्यमातून प्रायश्‍चित्ताविषयी योग्य दृष्टीकोन देऊन माझ्या साधनेच्या प्रयत्नांना नवीन दिशा दिली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– सौ. चारुशीला नकाते, पनवेल (२४.४.२०२०)