नगरसेवक अण्णा लेवे यांचे आरोप तथ्यहीन ! – नगराध्यक्षा माधवी कदम

नगराध्यक्षा माधवी कदम

सातारा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – केवळ विहित माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना काळातील खरेदीविषयीची माहिती एक नगरसेवक किंवा विश्‍वस्त म्हणून अण्णा लेवे यांनी घेणे महत्त्वाचे होते. नंतरही त्यांना माहिती मिळाली नसती, तर त्यांनी ती माझ्याकडे मागायला हवी होती. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी किंवा हस्ते, परहस्ते कोणता ठेका कोणाला मिळाला नसेल; म्हणून लेवे यांनी बिनबुडाचे आरोप केले असावेत. लेवे हे काही काळ आरोग्य सभापती होते. त्यांनाही शासकीय कारभाराची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत, असा घणाघाती आरोप नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केला.

नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लेवे यांच्या आरोपांना काहीही अर्थ नाही. त्यांच्या लोकांना ठेके मिळाले नसल्याने त्यांनी हे आरोप केले असावेत. पालिका प्रशासनात मुख्याधिकार्‍यांसह सर्वांचाच सहभाग असतो. प्रशासनाला दिशा देऊन ते चालवणे हे पदाधिकार्‍यांचे काम असते. त्यामुळे प्रशासनावर केले आरोप हे संबंधित प्रत्येक व्यक्तीविषयी संशय निर्माण करणारे आहेत. त्यामुळे लेवे यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देणे माझे उत्तरदायित्व आहे.