इराणकडून पाकमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून २ इराणी सैनिकांची सुटका

भारत-पाक युद्धकाळातील अनेक सैनिक पाकच्या कारागृहात खितपत पडले आहेत, तसेच भारताचे माजी सैन्याधिकारी कुलभूषण जाधव यांनाही पाकने कारागृहात डांबून ठेवले आहे. याविषयी भारतानेही आता चर्चा करत वेळ दवडण्यापेक्षा अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करणे इष्ट !

तेहरान (इराण) – भारतानंतर आता इराणनेही पाकमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून त्याच्या २ सैनिकांची सुटका केली आहे. इराणच्या ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’ने जैश-अल्-अदल या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर आक्रमण करून स्वतःच्या सैनिकांची सुटका केली. यात इराणच्या सैनिकांची कुठली हानी झाली नाही. गेली अडीच वर्षे हे सैनिक या आतंकवादी संघटनेच्या कह्यात होते.

१. जैश-उल्-अदल एक कट्टर वहाबी आतंकवादी संघटना असून पाकिस्तानच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील इराणच्या सीमेवर सक्रीय आहे. या आतंकवादी संघटनेने वर्ष २०१९ मध्ये इराणी सैन्यावर झालेल्या आक्रमणाचे दायित्व घेतले होते. यामध्ये काही सैनिक ठार झाले होते.

२. १६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी जैश-उल्-अदलने इराणच्या १२ सैनिकांचे अपहरण केले होते. ही घटना बलुचिस्तान प्रांतातील मर्कवा शहरात घडली होती. हा भाग पाकिस्तान-इराण सीमेच्या जवळ आहे. सैनिकांची सुटका करण्यासाठी इराण आणि पाकिस्तान यांची संयुक्त समितीदेखील स्थापन केली होती. या संघटनेने नोव्हेंबर २०१८ मध्ये ५ सैनिकांची सुटका केली होती, तर २१ मार्च २०१९ या दिवशी पाक सैन्याच्या कारवाईत ४ सैनिकांची सुटका करण्यात आली होती.