आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क

अध्यात्माविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’ या विषयावरील संशोधन श्रीलंका येथील ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

मुंबई – व्यक्ती सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्याने त्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि परिणामस्वरूप समाजाची हानी होण्यासह आध्यात्मिकदृष्ट्या वातावरण प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी आपण आध्यात्मिक स्पंदने आणि त्यांचा स्वतःच्या जीवनावरील परिणाम यांविषयी स्वतःचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. तसेच आपण नित्यनेमाने साधना केल्याने स्वतःकडे सकारात्मकता आकर्षित करतो आणि फलस्वरूप आपोआप अधिकाधिक सात्त्विक पर्याय निवडतो, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते २९ जानेवारी २०२१ या दिवशी कोलंबो, श्रीलंका येथे आयोजित ऑनलाईन ११ व्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स (आय.सी.बी.एम्.ई.)’ या वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘ग्लोबल अ‍ॅकेडॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (गॅरी)’ या संस्थेने केले होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क याचे सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की,

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क

१. समाजाच्या कल्याणासाठी ७० आणि ८० व्या दशकांत उद्योगक्षेत्रात ‘शाश्‍वत विकास’ आणि ‘औद्योगिक सामाजिक दायित्व’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिऍबिलिटी (सी.एस्.आर्.)’ या २ महत्त्वपूर्ण चळवळी उभ्या राहिल्या. असे असले, तरी आज समाजाची स्थिती पाहिल्यास सत्तेमधील व्यक्तींचे चारित्र्य, भ्रष्टाचार, हाव, शिक्षणाचा अभाव, प्रयत्नांमधील सातत्याचा अभाव, एकसंघ प्रयत्नांचा अभाव यांसारख्या सूत्रांमुळे या चळवळींची फलनिष्पत्ती अल्प आहे. या चळवळी उभ्या राहून ५० वर्षे उलटली, तरी आज आपल्या सभोवती पाहिल्यास आपल्याला कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणातील अनिष्ट पालट, युद्धाचे सावट यांसारखी आपत्काळ निर्माण करणारी संकटे भेडसावतांना आढळतात. हे सर्व पहाता सर्वांना प्रश्‍न पडणे साहजिक आहे की, मानवजातीचे काही चुकते आहे का ? यामध्ये ‘धर्मपालनाचा अभाव’, हे चुकणारे सूत्र आहे. आद्यशंकराचार्यांनी ‘धर्म’ या संज्ञेची पुढील व्याख्या केली असून तो पुढील तीन कार्ये करतो :

अ. समाजव्यवस्था उत्तम स्थितीत ठेवणे.

आ. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नती साधणे.

इ. आध्यात्मिक उन्नतीही साध्य करणे.

२. सद्यःस्थितीत औद्योगिक आचारसंहितेच्या वैचारिक नेतृत्वाचे लक्ष सूत्र क्र. ‘अ’ आणि ‘आ’ यांकडे आहे; परंतु कुणाचेही सूत्र क्र. ‘इ’ (आध्यात्मिक उन्नती) कडे लक्ष नाही. आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांच्या अंतर्गत एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे स्वतःचे जीवन आणि आपण जे करतो, त्यात सकारात्मकता वाढवणे आणि नकारात्मकता न्यून करणे.

या वेळी श्री. शॉन क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) वापरून करण्यात आलेल्या विपुल संशोधनातील २ प्रयोगांविषयी माहिती दिली. ‘यू.ए.एस्.’ हे वैज्ञानिक उपकरण भूतपूर्व अणूशास्त्रज्ञ डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केले आहे. ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे कोणतीही वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांतील सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, तसेच एकूण प्रभावळ मोजता येते.

पहिला प्रयोग

पहिला प्रयोग पोशाखावर होता. या प्रयोगात एका महिलेने पुढील ७ प्रकारचे पोशाख क्रमाने प्रत्येकी ३० मिनिटे परिधान केले होते – १. ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ (पायघोळ पांढरा झगा), २. ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ (‘ऑफ शेल्डर’, म्हणजे खांद्यांकडे उघडा असणारा काळ्या रंगाचा पाश्‍चात्त्य पोशाख), ३. काळा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट, ४. पांढरा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट, ५. सलवार-कुडता, ६. सहावारी साडी आणि ७. नऊवारी साडी. तिने प्रत्येक पोशाख परिधान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यु.ए.एस्.’ द्वारे परीक्षण करण्यात आले. त्या महिलेने पहिले ४ पोशाख परिधान केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरचे ३ पोशाख परिधान केल्यानंतर मात्र तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ घट झाली. पोशाख क्र. ३ आणि ४ हे एकसारखेच होते, केवळ रंगात भेद होता, तरीही महिलेने पोशाख क्र. ३ (काळ्या रंगाचा पोशाख) परिधान केला असता पोशाख क्र. ४ च्या तुलनेत तिच्यामध्ये पुष्कळ अधिक नकारात्मक ऊर्जा दिसून आली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. महिलेमध्ये सकारात्मक ऊर्जा केवळ तिने शेवटचे ३ पोशाख परिधान केल्यावर दिसून आली. या प्रयोगातून लक्षात येते की, पोशाखाचा प्रकार आणि रंग यांचा व्यक्तीवर आध्यात्मिक (ऊर्जेच्या) स्तरावर परिणाम होतो; मात्र पोशाखांची निर्मिती करणारी आस्थापने आणि संबंधित व्यावसायिक (फॅशन डिझायनर) याविषयी पूर्णतः अनभिज्ञ आहेत.

दुसरा प्रयोग

यानंतर श्री. शॉन क्लार्क यांनी दुसर्‍या प्रयोगाची माहिती दिली. या प्रयोगात एका व्यक्तीला शास्त्रज्ञांच्या मते अनुक्रमे त्रासदायक असलेले ‘हेवी मेटल’ हे संगीत, ‘सर्वाधिक शिथिलता निर्माण करणारे’, असे शास्त्रज्ञांनी नावाजलेले ‘वेटलेस’ (Weightless) नाव असलेले पाश्‍चात्त्य संगीत, सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायकाचे गायन आणि संत भक्तराज महाराज यांचे भजन प्रत्येकी ५ मिनिटे ऐकवण्यात आले. प्रत्येक प्रकारचे संगीत ऐकण्यापूर्वी आणि ऐकल्यानंतर त्या साधकाची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ‘हेवी मेटल’ हे संगीत ऐकल्यानंतर व्यक्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. सर्वाधिक शिथिलता निर्माण करणारे पाश्‍चात्त्य संगीत ऐकण्याचा ऊर्जेच्या स्तरावर किमान परिणाम दिसून आला. या दोन्ही प्रकारचे संगीत ऐकल्यानंतर व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याउलट सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायकाचे गायन आणि संत भक्तराज महाराज यांचे भजन ऐकल्यानंतर व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही; मात्र त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. ही वाढ भजन ऐकल्यानंतर सर्वाधिक होती.

बहुतांश कलाकार, संगीतकार, संगीत क्षेत्रातील आस्थापने यांना संगीताचा श्रोत्यांवर होणार्‍या आध्यात्मिक स्तरावरील परिणामांविषयी काहीच माहिती नसते. एखादे गीत लोकप्रिय झाल्यास ‘इंटरनेट’च्या माध्यमातून ते लक्षावधी लोकांपर्यंत पोचते. त्यामुळे एखादे लोकप्रिय गीत नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करत असल्यास (जे बहुतांश वेळा होत असल्याचे आम्हाला आढळले आहे) त्याचा लक्षावधी लोकांवर आध्यात्मिक स्तरावर अनिष्ट परिणाम होतो. शाश्‍वत विकास आणि व्यावसायिक सामाजिक दायित्व यांच्या पलीकडे ‘आध्यात्मिक परिणाम’ नावाचे एक सूत्र आहे अन् नवीन उत्पादने, तसेच सेवा यांची निर्मिती करतांना ते विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे, हे या शोधनिबंधाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. उद्योग आणि उपभोक्ता या दोन्ही घटकांना याविषयी जाणीव असणे आवश्यक आहे; कारण सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्यास त्याचा व्यक्तीवर अनिष्ट परिणाम होतो. परिणामस्वरूप समाजाची हानी, तसेच वातावरणात आध्यात्मिक प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी नित्य साधना करणे हा उपाय आहे, असेही श्री. शॉन क्लार्क यांनी शेवटी सांगितले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६५ वा शोधनिबंध होता. याआधी १५ राष्ट्रीय आणि ४९ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.