चंद्राचा झोप आणि मासिक पाळी यांच्यावर होतो परिणाम ! – संशोधकांचा निष्कर्ष

वॉशिंग्टन (अमेरिका) – नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्विम्स, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटी यांच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार चंद्राचे विविध टप्पे यांचा झोप आणि महिलांची मासिक पाळी यांवर परिणाम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. २७ जानेवारी या दिवशी ‘सायन्स एडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये याविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. होरासिओ डे ला इग्लेसिया, लेआंड्रो कॅसिरागी, इग्नासिओ स्पियियस, गिडेन पी. डन्स्टर, कॅट्लिन मॅकग्लॉथलेन, एडुआर्डो फर्नांडीज्-ड्यूक आणि क्लाउडिया वॅलेगिया या ७ संशोधकांच्या गटाने हे संशोधन केले आहे. उत्तर अर्जेंटिनातील फोर्मोसा भागातील टोबा-कूम हा आदिवासी समुदाय आणि सिएटलमधील साडेसात लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचे निरीक्षण करून हे संशोधन करण्यात आले आहे.

१. २९.५ दिवसांच्या चंद्राच्या भ्रमणचक्रात लोकांच्या झोपेच्या चक्रातही चढ-उतार होतात. पौर्णिमेपर्यंतच्या दिवसांच्या कालावधीत लोक उशिरा झोपायला जातात आणि या काळात ते अल्पकाळ झोपतात, असे या संशोधनात म्हटले आहे.

२. अर्जेंटिनामधील एका ग्रामीण समुदायाच्या वास्तव्याच्या ठिकाणी विजेची जोडणी नव्हती, तर दुसर्‍या समुदायातील लोकांकडे काही प्रमाणात विजेची जोडणी होती. तिसर्‍या शहरी भागातील समुदायाकडे विजेची जोडणी होती. २ पौर्णिमांच्या मधल्या कालावधीत त्यांच्या झोपेच्या पद्धतीत झालेले पालट नोंदवण्यात आले. टोबा-कूम आदिवासी समुदायातील तीन-चतुर्थांश सहभागींचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

३. या संशोधनातील प्रमुख संशोधक आणि वॉशिंग्टन विद्यापिठातील प्राध्यापक होरासिओ डे ला इगलेसिया यांनी म्हटले की, पौर्णिमेच्या आधीच्या दिवसामध्ये झोपेचे प्रमाण अल्प होते आणि त्यानंतर झोपेच्या वेळेत वाढ झाल्याचे आढळले. विजेचा वापर नसलेल्या समुदायामध्ये हा प्रभाव ठळकपणे जाणवला, तसाच तो विजेचा वापर असलेल्या शहरी विद्यार्थ्यांमध्येही सारखाच दिसून आला.

४. पौर्णिमेच्या काळातही झोपेमध्ये सरासरी ४६ ते ५८ मिनिटांचा भेद आढळून आला आहे. झोपेच्या वेळेत साधारण ३० मिनिटांचा भेद होता. पौर्णिमेपर्यंतच्या ३ ते ५ दिवसांमध्ये या तीनही समुदायांतील लोकांच्या झोपेच्या वेळा उशिराच्या झाल्या आणि त्यांचा झोपेचा वेळ अल्प झाल्याचे या संशोधनात आढळले.

५. अर्जेंटिनाच्या टोबा संस्कृतीत चंद्र हा पुरुषाचे प्रतीक मानला जातो, तर त्याच्या कलांचा संबंध स्त्रियांशी जोडला जातो. पहिली मासिक पाळी आणि पुढील मासिक पाळीच्या चक्राचे नियमन यांचा संबंध चंद्राच्या गतीचक्राशी जोडला जातो. जुन्या टोबा क्यूम समुदायाच्या लोककथांमध्येही चांदण्या रात्री लैंगिकभावना तीव्रतेने जागृत होत असल्याचे सांगितले गेले आहे. अर्जेटिनाच्या आदिवासी समाजामध्ये चंद्रप्रकाशाचा, चंद्राचा संबंध स्त्रियांच्या जननक्षमतेशी जोडण्यात आला आहे.