२८ जानेवारी २०२१ या दिवशी जिजामाता जयंती आहे. यानिमित्ताने…
वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्यांना रामायण-महाभारत आणि पुराणे यांतील कथा अतिशय आवडत होत्या. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात मोगल अन् विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. राष्ट्ररक्षणासाठी सुपुत्र दे, अशी प्रार्थना जिजाऊंनी श्री भवानीदेवीला केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार होण्यासाठी जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुति, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले.
पुण्यात रहाण्यासाठी आल्यानंतर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली आणि श्री जोगेश्वरीदेवी अन् केदारेश्वर यांचा जीर्णोद्धार केला. राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालत होत्या. राजमाता जिजाबाईंचे ५ पुत्र मृत्यूमुखी पडले होते. एकटे छत्रपती शिवाजी महाराज जगले आणि त्यांच्यावरही अनेक संकटे ओढवत होती; पण तशाही स्थितीत मन कठोर करून त्या शिवरायांना यशस्वी होण्याचे आशीर्वाद देत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आगरा येथे जातांना सर्व राज्यकारभार जिजाऊंच्या स्वाधीन केला. जिजाबाई या केवळ माताच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्तीही होत्या. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या १२ दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये त्यांनी पाचाड येथे देह ठेवला. अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
(संदर्भ : भारतीय संस्कृतीकोष)