खानयाळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा आज जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील खानयाळे येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा जत्रोत्सव १८ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त देवस्थानविषयीची माहिती थोडक्यात पाहूया.

संकलक : श्री. बाबला वासुदेव शेट्ये, खानयाळे, तालुका दोडामार्ग

श्री देव दाडसाखळ
श्री देवी सातेरी

इतिहास

पोर्तुगिजांच्या राजवटीत त्यांच्या जुलमी अत्याचारापासून वाचण्यासाठी आणि बळजोरीने केल्या जाणार्‍या धर्मांतरापासून रक्षण होण्यासाठी गोव्यातील डिचोली तालुक्यातील नार्वे गावातील शेट्ये कुटुंबीय हे श्री दाडसाखळदेवाच्या पाषाणासह रात्रीच्या वेळी घाट माथ्याच्या दिशेने जात असतांना वाटेत त्यांनी खानयाळे येथे वस्ती केली. गावापासून दूर जंगलात देवाचे पाषाण लपवून ते पूर्वज गावात गेले. तेथील ग्रामस्थांनी त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय केली. ‘आम्ही घाटमाथ्यावर जात होतो. रात्र झाली म्हणून थांबलो. सकाळी आम्ही निघणार आहोत’, असे सांगून ते झोपले. ग्रामस्थांना सुगावा लागू नये, म्हणून शेट्ये कुटुंबीय भल्या पहाटे उठून पाषाणाच्या जागी गेले; पण काय चमत्कार श्री दाडसाखळदेवाचे पाषाण तेथून हलेना. सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. मग नाईलाजाने खानयाळे गावात जाऊन तेथील गावकर्‍यांना खरी गोष्ट सांगितली आणि गावातील श्री सातेरीदेवीला कौल लावला. तेव्हा देवीने स्पष्ट कौल दिला की, ‘श्री दाडसाखळ देवाला येथेच ठेवायची माझी इच्छा असून तो येथून पुढे जाणार नाही.’

मंदिराचे निर्माण

देवीच्या इच्छेनुसार मग शेट्ये कुटुंबियांनी पुढे जाण्याचे रहित केले. देवीचा कौल घेऊन गावात छोटेसे मंदिर बांधण्यात आले. त्याआधी गावात देवाची पूजा करण्यासाठी गावस आणि हाणये अशी २ घराणी होती. या घटनेनंतर देवळात पूजा करण्यासाठी ३ पुजारी झाले. सण परबेला तिन्ही पुजार्‍यांनी देवळात जाऊन ३ भांड्यांतून नैवेद्य बनवून आपापल्या देवाला दाखवायचा, अशी प्रथा चालू झाली. काही काळाने असे ठरले की, एकाने नैवेद्य बनवायचा आणि तिघांनी आपापल्या देवाला दाखवायचा; परंतु पुढे प्रश्‍न आला की, नैवेद्य दाखवायचा कोणी ? मग देवापुढेच हा प्रश्‍न मांडण्यात आला. तेव्हा देवाने निर्णय दिला की, ‘तिघांनी मातीच्या ३ भांड्यांत नैवेद्य करावा आणि त्यांची तोंडे बंद करून प्रत्येकाने स्वतःच्या नावाची खूण करावी अन् ती भांडी अवसाराच्या (ज्या व्यक्तीच्या अंगात देवाचा भार येतो, त्याच्या) हातात द्यावी. त्याप्रमाणे ती तीनही भांडी अवसाराने देवळाच्या एका बाजूला उभे राहून दुसर्‍या बाजूला भिरकावली. या वेळी गावस आणि हाणये यांची भांडी फुटून गेली अन् शेट्ये यांचे भांडे फुटले नाही. त्यामुळे मंदिरातील सर्व अधिकार शेट्ये परिवाराकडे आले. कालांतराने गावस आणि हाणये ही दोन्ही घराणी नामशेष (निर्वंश) झाली.

श्री सातेरी मंदिरात साजरे होणारे उत्सव

देवदीपावली या दिवशी प्रथम लिंगाची पूजा, श्री सातेरीदेवीची पूजा आणि त्यानंतर श्री दाडसाखळदेवाच्या देवळात देवाच्या पाषाणाची पूजा केली जाते. श्री सातेरीदेवीच्या देवळात दिवजा (दिवे) पेटवतात आणि देवीला गार्‍हाणे घातले जाते. नंतर देवीची खणानारळाने ओटी भरतात. त्यानंतर कुळघरातील लोक आणि इतर लोक ओटी भरतात. ओटी भरल्यावर देवीची पूजा होते आणि बाहेर ५ टाळे (कवाळ) मारले जातात अन् बारा अंधाराला (देवाला) सांगणे केले जाते. त्यानंतर कुळाची माया कुळघराकडे नेण्यास देवांकडे मागणे केले जाते.

होळीउत्सव (शिमगोत्सव)

होळी पौर्णिमेदिवशी रात्री १० वाजेपर्यंत होळी असते. पहिली होळी ही देवीची, दुसरी दाडसाखळदेवाची, तिसरी चव्हाट्यावरील, तर चौथी ‘राखण्या’ची, अशा ४ होळ्या घातल्या जातात. ७ व्या दिवशी देवाचे न्हावण (तीर्थ) लोकांना घातले जाते.

श्री दाडसाखळ देवस्थानचा वर्धापनदिन

या दिवशी सकाळपासून देवाची पूजा-अर्चा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने आणि दशावतारी नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम असतात. पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून ८ दिवसांनी मंदिराजवळ ‘वाडवळ’ देतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवळात पूजा करून मूर्तीला जानवी घालून नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर गावातील लोक येऊन ती जानवी स्वतःच्या घरी घेऊन जातात. ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर भातशेतीचे ‘नवे’ केले जाते. देवळात भाताच्या कणसांची पूजा करून त्यांची कापणी करतात. प्रथम दोन्ही देवळांत, तसेच कुळघरात भाताच्या कणसांचे तोरण बांधतात. नंतर सर्व लोक स्वतःच्या घरी भाताची कणसे नेऊन ती दरवाजावर बांधतात.

सर्व विज्ञापनदाते, हितचिंतक, वाचक आणि भाविक यांची आध्यात्मिक उन्नती होवो, अशी श्री सातेरीदेवी आणि देव दाडसाखळ यांच्या चरणी प्रार्थना !

जत्रोत्सवात कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.