अमेरिकेच्या संसदेजवळ बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह एकाला अटक

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली. विशेष म्हणजे या व्यक्तीकडे बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याची खोटी प्रवेशपत्रिकाही आढळली आहे. या व्यक्तीचे नाव वेस्ले ए बिलर (वय ३१ वर्ष) असल्याचे समोर आले आहे. अटक केल्यानंतर बिलरने ‘मी ही बंदूक आणि काडतूसे चुकून आणली. मी वॉशिंग्टनमध्ये एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम करत आहे. कामावर जाण्यास विलंब होत असल्यामुळे घाईगडबडीत गाडीमध्ये शस्त्र असल्याचे विसरलो’, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, बिलरचा कोणत्याही अतिकट्टरतावादी गटांशी संबंध नाही. बिलरवर सध्या परवान्याविना शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.