मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – तानाजी कांबळे
प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पहात आहे ? विकासकामे करतांना अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानेच पुढे अनेक ठिकाणी जनता विकासाला विरोध करू लागते !
वैभववाडी – अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात भूमी बुडित क्षेत्रात जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही, तसेच निवासी भूखंडाची ताबा पावती मिळाली नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणारे धरणग्रस्त शांताराम विठ्ठल नागप यांचे १३ जानेवारी या दिवशी उपचारांच्या वेळी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील केईएम् रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, मुली, सून, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा. जेणेकरून पुन्हा कुणावर अशी वेळ येऊ देऊ नये’, अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे.
‘धरण झाल्यानंतर पुनर्वसन गावठाणात भूखंडाची ताबा पावती मिळण्यासाठी प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांनी अनेक हेलपाटे घातले; मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या पाण्यात बुडालेले घर, भूमी आणि घराचे योग्य प्रकारे न केलेले मूल्यांकन या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केलेले शांताराम नागप यांच्या आत्महत्येस संबंधित अधिकारी आणि तथाकथित धरण समितीचे पुढारी यांना उत्तरदायी ठरवण्यात यावे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी ‘लढा संघर्षाचा, अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा’ संघटनेच्या वतीने साहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी अध्यक्ष तानाजी कांबळे, सचिव मनोहर तळेकर आदी उपस्थित होते.