सौ. विजया श्रीपाद नाईक पंचतत्त्वात विलीन : अनेकांनी घेतले अंतिम दर्शन

सौ. विजया श्रीपाद नाईक यांचे पार्थिव प्रारंभी सकाळी त्यांच्या सांपेद्र येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

फोंडा, १४ जानेवारी (वार्ता.) – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी सौ. विजया श्रीपाद नाईक यांना १४ जानेवारी या दिवशी दुपारी त्यांच्या आडपई या मूळ गावात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे कुटुंबीय आणि त्यांचे असंख्य चाहते यांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर आडपई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आदींसह अनेक नेत्यांनी सौ. विजया श्रीपाद नाईक यांचे अंतिम दर्शन घेतले. आडपई येथे अंतिम दर्शनासाठी महनीय व्यक्ती येणार असल्याने वाहतूक आणि सुरक्षा या दृष्टींनी विशेष सोय करण्यात आली होती. आडपई-रासई मार्गावरील फेरीसेवा बंद ठेवून दुर्भाट-रासई मार्गावर अतिरिक्त फेरीसेवा ठेवण्यात आली होती. सौ. विजया श्रीपाद नाईक यांचे पार्थिव प्रारंभी सकाळी त्यांच्या सांपेद्र येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्यात सुधारणा ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्यात १३ जानेवारीच्या तुलनेत १४ जानेवारीला खूपच सुधारणा झाली आहे. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे. त्यांना ‘हाय फ्लो नेझल कॅनुला ऑक्सीजिनेशन’वर ठेवण्यात आले आहे. त्यांचे रक्ताचे नमुनेही तपासण्यात आले असून त्याचा अहवालही चांगला आला आहे. त्यांच्या जखमाही भरत आहेत. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.