सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा वापर !

कणकवली (सिंधुदुर्ग) – यावर्षी जिल्ह्यातील अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रचार चालू केला  आहे. निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार ‘डिजिटल’ प्रचारावर भर देत आहेत. याद्वारे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.

जिल्ह्यात ७० ग्रामपंचायती आहेत; मात्र काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर काही प्रभागातील उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. सध्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे निवडणूक प्रचाराची पद्धतही पालटली आहे. बहुतांश गावांमध्ये विविध पक्षांच्या सदस्यांनी गावांतील तरुणांचा व्हाट्सअ‍ॅप गटही बनवला आहे. या व्हाट्सअ‍ॅप गटाच्या माध्यमातून गावाची समस्या आणि सर्वांगीण विकास या संदर्भातील योग्य उमेदवार कोण, याविषयी माहिती दिली जात आहे.