पणजी – केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉ) अधिष्ठाता (डिन) डॉ. बांदेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘श्रीपाद नाईक त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांशी बोलू शकले. त्यांची हनुवटी आणि मांडी या ठिकाणी झालेले अस्थिभंग ठीक करण्यात आले आहेत आणि रक्तस्राव होण्याची शक्यता नाही.’’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन श्रीपाद नाईक यांच्या आरोग्यविषयी, तसेच त्यांना काय उपचार देण्यात येत आहेत, याविषयी चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘ नवी देहली येथील ‘एम्स’ या रुग्णालयातील डॉक्टर श्रीपाद नाईक यांच्यावरील उपचारांसंबंधी त्यांचा सल्ला देण्यासाङ्गी पणजी येथील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत.’’ रात्री २ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत श्रीपाद नाईक यांच्यावर अस्थिभंग झालेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुख्यमंत्री सावंत यांनी ‘श्रीपाद नाईक यांना अतीदक्षता विभागात ठेवले असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कोणीही नातेवाईक किंवा अतीमहनीय व्यक्ती यांनी त्यांना भेटण्यास जाऊ नये’, असे आवाहन केले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्वीट करून ‘आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत’, असे सांगितले.
सौ. विजया नाईक यांचा मृतदेह गोव्यात आणला !
अपघातात मृत झालेल्या आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी सौ. विजया नाईक यांचा मृतदेह गोव्यात आणला आहे; परंतु त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. अंत्यसंस्कारांचा दिनांक आणि वेळ लोकांना नंतर कळवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. श्रीपाद नाईक यांचे लातूर येथील जवळचे मित्र डॉ. दीपक घुमे यांचाही अंकोला येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १२ जानेवारीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात श्रीपाद नाईक यांना भेटले. राजनाथ सिंह यांनी डॉक्टरांसमवेत एक आढावा बैठकही घेतली.