ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? सरकारी आदेशांची कार्यवाही प्रशासन स्वतःहूनच का करत नाही ?
वैभववाडी – सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे नियमित कर्मचारी, तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचारी, सल्लागार यांच्यासाठी वस्त्रसंहितेचा (ड्रेसकोडचा) आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ८ डिसेंबर २०२० या दिवशी जारी केला आहे. त्याची सकारात्मक कार्यवाही (अंमलबजावणी) सर्व शासकीय कार्यालयांमध्ये व्हावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
‘सरकारी कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा’ याविषयीच्या सूचनांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जाणीव करून देऊन कार्यवाही करावी, अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस्.एन्. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे आणि जिल्हा कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी केली आहे.