गोव्यात ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला रात्रीची संचारबंदी नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आरोग्य खात्याचा नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीची संचारबंदी लावण्याचा प्रस्ताव !

पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देहली आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर गोव्यातही ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी यां दिवशी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव गोव्याच्या आरोग्य खात्याने शासनापुढे ठेवला होता; मात्र ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी यां दिवशी रात्रीची संचारबंदी असणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी परराज्यांतून लाखो पर्यटक गोव्यात आले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात येणारे पर्यटक, हॉटेल व्यावसायिक, पार्टीचे आयोजक आणि सार्वजनिक नागरिक यांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सर्व सुरक्षेच्या उपायांचे कठोरतेने पालन करावे. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्यासंबंधीची धारिका शासनाला सुपुर्द केली असावी; परंतु शासनाने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. या विषयावर मी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याशी चर्चा करणार आहे. चर्चमध्ये प्रार्थना आणि जत्रोत्सव हे सामाजिक अंतर पाळून साजरे केले जात आहेत.’’

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार रात्रीची संचारबंदी लावण्याचा प्रस्ताव पाठवला ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गोव्याच्या आरोग्य खात्याला एक पत्र प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रत्येक राज्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गोवा हे एक पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरनेते पालन होणे आवश्यक आहे.