संभाजी बिग्रेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर २ वर्षांसाठी ४ जिल्ह्यातून हद्दपार !

संभाजी ब्रिगेडचे खरे स्वरूप !

संभाजी ब्रिगेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर

कासेगाव (जिल्हा सांगली) – येथील शासकीय कर्मचार्‍यांकडे खंडणी मागणारा संभाजी ब्रिगेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (तालुका -वाळवा) याला २ वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. (४ जिल्ह्यांतून हद्दपार म्हणजे गुन्हेगाराला अन्य जिल्ह्यांत गुन्हे करण्यास अनुमती आहे का ? अशा गंभीर गुन्ह्यांसाठी हद्दपारी नाही, तर जलदगती न्यायालयात खटले चालवून औंधकर यांच्या सारख्यांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक) औंधकर याच्यावर विविध अशा ५ प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद आहेत.

सुयोग औंधकरविषयी कासेगाव पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठवला होता. अधीक्षकांनी हा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवला. अधीक्षकांकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी औंधकर याच्या हद्दपारीचे आदेश दिले. औंधकर याच्या विरोधात जिल्हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालयातील सरकारी कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, ईश्‍वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वाळवा तालुका कृषी अधिकारी, वाळवा उपअभियंता (सार्वजनिक बांधकाम) यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याच्या प्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याविषयी ५ गुन्हे नोंद आहेत.