अर्णव गोस्वामी यांच्याकडून पैसे मिळाल्याची ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दासगुप्ता यांनी स्वीकृती दिल्याची पोलिसांकडून माहिती

टी.आर्.पी. घोटाळ्याचे प्रकरण

डावीकडून अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता

मुंबई – रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांनी ६ वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी पैसे दिल्याची स्वीकृती भारत ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बॉर्क)चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांनी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. यामध्ये भेटीच्या ठिकाणांचा तपशीलही दासगुप्ता यांनी दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे देऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवल्याच्या घोटाळ्यात पार्थ दासगुप्ता हेच मुख्य आरोपी आहेत. ‘रिपब्लिक टी.व्ही.’कडून दासगुप्ता यांना ‘हॉलीडे पॅकेज’, तसेच रोख रक्कम दासगुप्ता यांना मिळाली. त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. ‘रिपब्लिक टी.व्ही.’ प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी दासगुप्ता यांनी ‘टी.आर्.पी.’च्या माहितीमध्ये फेरफार केला. यामध्ये दासगुप्ता यांना सहकार्य करणारे अन्य अधिकारी कोण आहेत ?, याचे अन्वेषण पोलिसांकडून चालू आहे. दासगुप्ता यांच्या अधिकोषातील खात्यांचाही तपशील पोलिसांनी प्राप्त केला आहे. २९ डिसेंबर या दिवशी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊनही चौकशी केली.