पालकमंत्री जयंत पाटील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक देतात ! – सांगलीतील शिवसैनिकांची तक्रार

सांगली – राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील निवडींमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत आहे, अशा तक्रारी शिवसैनिक करत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौर्‍यात २२ डिसेंबर या दिवशी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ‘या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि त्यांच्यापुढे आपले गार्‍हाणे मांडीन’, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील जैन कच्छी भवनमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या.