ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यांची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होणार !

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा, सोलापूर

सोलापूर – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. यंदा कोरोनामुळे कार्तिकी वारीच्या धर्तीवर श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्राही प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडावी, असा अभिप्राय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाला पाठवला आहे. तरी यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात केली जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

प्रतिवर्षी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक येथून श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेसाठी सहस्रो भाविक सोलापूर येथे येतात. दरम्यान नंदीध्वज मिरवणूक, अक्षता सोहळा यांसह अन्य धार्मिक विधीसाठी सर्व मानकर्‍यांसह भाविकांनाही अनुमती द्यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांसह काही राजकीय पक्षातील नेत्यांनी केली आहे.

श्री सिद्धेश्‍वर यात्रा व्हावी, यादृष्टीने निर्णय व्हावा ! – खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य

खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य

कोरोनाविषयी पूर्वीसारखी गंभीर स्थिती सोलापूर येथे नाही. त्यामुळे परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेतील धार्मिक उत्सव पार पडावेत, या दृष्टीने शासनाने निर्णय द्यावा, अशी अपेक्षा खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांनी व्यक्त केली.