हाँगकाँग येथील मोठ्या प्रसारमाध्यम आस्थापनाचे मालक जिमी लाई यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक

चीनकडून लोकशाहीचे समर्थन करणार्‍यांची मुस्कटदाबी चालूच !

हाँगकाँग – हाँगकाँगचे लोकशाही समर्थक आणि मोठ्या प्रसारमाध्यम आस्थापनाचे सर्वेसर्वा जिमी लाई यांच्यावर राष्ट्र्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. चीनच्या कायद्यानुसार शासनाशी मतभेद असल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्याचा सरकारला अधिकार आहेत.

‘अ‍ॅपल डेली’ या  नियतकालिकांची स्थापना करणार्‍या लाई यांच्यावर विदेशी शक्तींसोबत हातमिळवणी करून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याच्या संशयावरून आरोप ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली. जूनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची कार्यवाही झाल्यापासून या कायद्याच्या अंंतर्गत कारवाई झालेले लाई ही सर्वांत महनीय व्यक्ती आहे. लाई यांच्यासह ‘अ‍ॅपल  डेली’ हे नियतकालिक चालवणार्‍या ‘नेक्स्ट डिजिटल’ या आस्थापनाच्या २ अधिकार्‍यांवर त्यांनी आस्थापनाच्या कार्यालयाच्या जागेवर भाडेपट्टीच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करून फसवणुकीचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.