दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी मागील १० वर्षांपासून देवद आश्रमात वास्तव्याला आहे. मी आश्रमात राहिल्यामुळे मला साधना आणि सेवा करण्याची संधी लाभली आहे. आश्रमातील साधकांची साधना चांगली होत आहे. पू. (सौ.) अश्‍विनी पवार आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. माझा त्यांच्याशी फारसा संपर्क नसतो, तरीही काही अनुभवांवरून मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये कृतज्ञतापुष्पांत गुंफून ती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

११ डिसेंबर या दिवशी या लेखातील काही सूत्रे पाहिली होती. आज उर्वरित लिखाण पाहूया.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429997.html


पू. (सौ.) अश्‍विनी पवार

९. पू. ताईंची प्रीती

९ अ. ‘साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य बिघडू नये’, यासाठी पू. ताईंनी त्यांची काळजी घेणे : ‘पू. ताई आम्हा साधकांना आईप्रमाणे वात्सल्याने सांभाळतात; म्हणून त्यांना ‘माऊली’ म्हणावेसे वाटते. ‘साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य बिघडू नये’, यासाठी त्या अहोरात्र काळजी घेतात, उदा. आश्रमातील साधकांसाठी बटाटेवडे करायचे होते. प्रथम त्यांनी स्वयंपाकघरातील साधिकांना बटाटावड्याचा नमुना करायला सांगितला. जोपर्यंत त्यांना अपेक्षित बटाटावडा सिद्ध झाला नाही, तोपर्यंत त्यांनी तो नमुना पुनःपुन्हा करून स्वत: त्याची चव पाहिली. त्या नमुन्यावरून त्यांनी आश्रमातील एकूण बटाटावड्यांना लागणारे चण्याचे पीठ, बटाटे, कांदे, तिखट, मीठ इत्यादींचे प्रमाण काढले. त्यानंतर साधिकांना बटाटेवडे करायला सांगितले आणि साधकांना प्रेमाने खाऊ घातले.

९ आ. ‘साधकांना शुद्ध आणि सात्त्विक जेवण कसे मिळेल ?’, याचा विचार करून साधकांना नियोजन करायला सांगणे आणि आश्रमातील जेवणातून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्‍याच्या प्रसादाचा आनंद मिळणे : ‘कुठल्या ऋतूत साधकांना काय खायला द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचे ?’, हे पू. ताई साधकांना वैद्यांना विचारून ठरवायला सांगतात, तसेच ज्या भाज्या आणि पदार्थ अर्पणात किंवा स्वस्तात मिळतात, त्यानुसार नियोजन करायला सांगतात. ‘पू. ताई साधकांना शुद्ध आणि सात्त्विक जेवण कसे मिळेल ?’, याचा विचार करून नियोजन करायला सांगतात. पूर्वी आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर, कांदळी, मोरटक्का आणि मोरचुंडी येथील भंडार्‍यांना जायचो. तेथे जेवणातून, म्हणजे भंडार्‍यातील प्रसादातून आनंद मिळायचा. देवद आश्रमात पू. ताई प्रतिदिन ‘आम्हा साधकांना भंडार्‍याचा प्रसाद मिळावा’, यासाठी प्रयत्नरत असतात. ‘त्या आमच्या अन्नपूर्णादेवी असून आम्हाला या भंडार्‍याच्या रूपातून चैतन्य आणि आनंद देत आहेत’, असे मला जाणवते.

१०. नोकरी न करता थेट आश्रमात सेवेला आल्याने शांत राहून सेवा करता येत असल्याचे पू. ताईंनी सांगणे

मी पू. (सौ.) ताईंना विचारले, ‘‘तुम्ही संयम ठेवून सेवा कशी काय पूर्ण करता ?’’ त्यावर पू. ताई म्हणाल्या, ‘‘मी बाहेरील आस्थापनात नोकरी केली असती, तर ओरडले असते आणि इतरांकडून कामे करवून घेतली असती. मी थेट आश्रमात सेवेला आले. त्यामुळे मला शांत राहून सेवा करता येते.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही नोकरी केली असती, तरी त्याचा तुम्ही साधनेसाठी उपयोग केला असता. संयम ठेवून आणि समयमर्यादेत साधना म्हणून सेवा केली असती. ‘तुम्हाला राग आणि उतावळेपणा हे स्वभावदोष हरवू शकत नाहीत’, असे मला वाटते.’’

११. पू. (सौ.) अश्‍विनीताईंची अहंशून्यता – साधकांना सर्वतोपरी साहाय्य करून नामानिराळ्या रहाणार्‍या पू. (सौ.) अश्‍विनीताई !

पू. अश्‍विनीताई साधकांना साधनेत साहाय्य करतात. मी रुग्णाईत असतांना आणि निवासाची सोय करतांना त्यांनी मला मोलाचे साहाय्य केले; मात्र ‘तुम्ही माझ्यासाठी हे केले’, असे मी त्यांना म्हणू शकत नाही; कारण त्या सर्वकाही करून त्यातून नामानिराळ्या होतात. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून किंवा कृतीतून कर्तेपणा मुळीच जाणवत नाही. ‘हे त्यांचे केवळ कौशल्य नाही, तर त्याची अहंशून्यता आहे’, असे मला वाटते.

याविषयी बोलतांना पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘पू. काका, तुमचा माझ्याशी सेवेनिमित्त तसा काहीच संपर्क नसतो, तरी तुमच्यात शिकण्याची वृत्ती, निरागसता आणि कृतज्ञताभाव आहे. यासाठी अहं अल्प लागतो. माझाही अहं तुमच्यासारखा न्यून झाला, तर किती छान होईल ?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘पू. ताई, माझ्याएवढा अहं तुम्हाला कशाला हवा ? तुमच्यात मुळातच अहं अल्प आहे. माझ्याएवढा अहं करायचा असेल, तर तो वाढवावा लागेल आणि नंतर माझ्याएवढा करावा लागेल !’’

१२. साधकांचे वय किंवा भावनाशीलता यांचा विचार न करता तत्त्वनिष्ठ राहून त्यांना साधनेत साहाय्य करणे

माझ्याकडून चूक झाल्यावर पू. ताई मला वेळीच त्याची जाणीव करून देतात. त्यामागील मूळ स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सांगून ‘ते कसे घालवायचे ?’, याविषयी, तसेच प्रायश्‍चित्त अन् क्षमायाचना यांविषयीही सांगतात. त्यांचा संकल्प आणि तळमळ यांमुळे माझ्याकडून त्याविषयी आपोआप प्रयत्न होऊन मला मोलाचे साहाय्य मिळते. त्या माझे वय किंवा भावनाशीलता यांचा विचार न करता तत्त्वनिष्ठ राहून चुका सांगतात. ‘मला किंवा इतरांना काय आवडेल ?’, यापेक्षा परात्पर गुरु डॉक्टरांना काय आवडेल ?’, असेच त्या करतात. ‘संत मुक्ताईने जसे चांगदेवांना घडवले, तसेच पू. ताई मला घडवत आहेत’, असे मला वाटते. अशाच प्रकारे पू. ताई तत्त्वनिष्ठ राहून आश्रमातील सर्व साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांची प्रगती करवून घेत आहेत.’

१३. स्वतःच्या आणि इतरांच्या चुका यांविषयी गांभीर्य असणे

१३ अ. चुकांविषयीची संवेदनशीलता : ‘आश्रमामध्ये कोणत्याही स्तरावरील कुठलीही लहानशी चूक झाली, तरी ‘ती चूक माझी आहे’, असे त्यांना वाटते. ‘प्रत्येक कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण कशी होईल ?’, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. ‘चूक होऊ नये’, यासाठी त्या काळजी घेतात.

१३ आ. अंतर्मुख होऊन स्वतःच्या चुकांमधून शिकणे आणि पुढे तशा चुका न झाल्याने सेवेत परिपूर्णता येणे : त्या त्यांच्या लहान-सहान चुका प्रांजळपणे स्वीकारतात. त्याविषयी त्यांना खंत वाटते. ‘मी कुठे न्यून पडले ? काय चूक झाली ?’, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. ‘अंतर्मुख होऊन त्या स्वतःच्या चुकांमधून शिकतात आणि पुढे तशा चुका न झाल्याने त्यांच्या सेवेत परिपूर्णता येते’, असे मला वाटते.

१३ इ. साधकांची साधना होण्यासाठी वर्षानुवर्षे त्यांचे स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेणे आणि त्यातून त्यांची साधकांची प्रगती होण्यासाठीची तळमळ लक्षात येणे : आश्रमात आम्ही साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्यासाठी निवासाला आहोत. या साधनामार्गात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला ६० टक्के महत्त्व आहे. पू. ताई आम्हा साधकांच्या चुका सांगतात. त्या स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेेऊन आम्हाला आमच्या चुका आणि स्वभावदोष यांची जाणीव करून देतात. त्या साधकांना सतत घडवत असतात. एखाद्या साधकाला एखाद्या वेळी एखादी चूक सांगणे कठीण असते. असे असतांना पू. ताई वर्षानुवर्षे साधकांचे स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घेत आहेत. यावरून त्यांच्यातील लढाऊ वृत्ती शिकायला मिळते, तसेच साधकांची प्रगती होण्यासाठीची तळमळ लक्षात येते.

१४. कोरोना महामारीच्या अनुषंगाने दळणवळण बंदी लागू केल्यावर साधकांनी आश्रमातील फलकावर लिहिलेल्या सूचनेचे पालन करणे आणि पू. ताई प्रेमाने, कर्तेपणा न घेता अन् अपेक्षा न करता सांगत असल्याने त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम होऊन साधक ऐकण्याच्या स्थितीला येणे

‘२३.३.२०२० पासून संपूर्ण भारतात कोरोना वैश्‍विक महामारीच्या अनुषंगाने दळणवळण बंदी लागू झाली. त्या वेळी अत्यावश्यक कामाविना नागरिकांनी घराबाहेर पडू नये’, असा नियम शासनाने घालून दिला. त्यानुसार देवद आश्रमातील फलकावर सूचना लिहिल्या होत्या. त्यामध्ये एक वाक्य होते, ‘साधकांनी आश्रम परिसरात, म्हणजे आश्रमाच्या इमारतीच्या बाहेर फिरू नये.’ इतर वेळी आश्रम परिसरात नेहमी रहदारी असते, उदा. सकाळ-संध्याकाळ साधक व्यायाम म्हणून चालायला जातात. दूरभाष करण्यासाठी थांबलेले असतात; मात्र या सूचनेप्रमाणे मागील पाच मास मी स्वतः आश्रमाच्या इमारतीबाहेर गेलो नाही किंवा कोणताही साधक फिरत असलेला किंवा आवारात उभा राहिलेला माझ्या पहाण्यात आला नाही. यावरून ‘सर्व साधक आश्रमातील सूचनांचे पालन करतात’, हे शिकायला मिळाले.

याविषयी मी पू. ताईंना म्हणालो, ‘‘एका वाक्याच्या सूचनेचे सर्व साधकांनी ५ मास काटेकोर पालन कसे काय केले ?’’ पू. ताई म्हणाल्या, ‘‘साधक चांगले आहेत. ते ऐकतात आणि सूचनांचे पालन करतात.’’ मी म्हणालो, ‘‘साधक ऐकण्याच्या स्थितीला जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या सांगण्यात कर्तेपणा नसतो. त्यामुळे तुमच्या बोलण्यातून ‘देवच सांगत आहे’, अशीच स्पंदने येतात. ‘देव आमच्या भल्यासाठी सांगत आहे’, याची आम्हाला जाणीव होते. तुम्ही प्रेमाने, आपुलकीने, कर्तेपणा न घेता आणि अपेक्षा न करता सांगत असता. त्या चैतन्याचा परिणाम होतो आणि माझ्यासारखे साधक ऐकण्याच्या स्थितीला येतात.’’

१५. पू. ताईंचा देवद आश्रमाप्रतीचा भाव !

मी पू. ताईंना म्हणालो, ‘‘आपला देवद आश्रम लांब जंगलात आहे, असे नाही. पनवेल आणि मुंबई यांच्याजवळ आहे. आश्रमाबाहेर सर्वत्र पुष्कळ प्रदूषण आहे. आपल्या आश्रमात साधकांना आवडेल; म्हणून इतर आश्रमांसारखे भजन, कीर्तन किंवा करमणुकीचे कार्यक्रम नसतात, तरीही आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे. हे कसे काय ? आणि साधक आनंदी कसे असतात ?’’ त्यावर पू. ताई म्हणाल्या, ‘‘देवद आश्रम म्हणजे गुरूंचे आश्रयधाम आहे. आपल्यासारख्या माणसांना कळत नाही; पण झाडे, पक्षी इत्यादी सर्व जिवांना ते कळते. आकाश रंग पालटते. आश्रमाशेजारील डोंगरावर ‘ॐ’ आणि शिवाची पिंडी यांचे आकार दिसतात. भगवंत आणि गुरु येथे निर्गुण रूपात रहातात. सर्व निसर्ग आणि परिसर यांना कळते की, हे उद्धाराचे स्थान आहे. याविषयी कृतज्ञता वाटून आपण आश्रमात राहिले पाहिजे.’’

१६. शिकण्याची वृत्ती पुष्कळ असल्याने प्रत्येक कृतीतून शिकून साधकांना सांभाळणे

‘सर्वसाधारणपणे पू. ताईंच्या वयाच्या आणि अनुभवाच्या मानाने आश्रमातील साधकांना साधनेविषयी एवढे साहाय्य करणे अशक्य आहे’, असे वाटते. त्यांच्यात शिकण्याची वृत्ती पुष्कळ असल्याने त्या प्रत्येक कृतीतून शिकून साधकांना सांभाळत आहेत. त्यांच्यामध्ये ते कौशल्य निर्माण झालेले असून आश्रमातील प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुंदरम् ।’ होण्यासाठी त्या प्रयत्न करतात.

१७. पू. अश्‍विनीताईंनी स्वतःच्या गुणांमुळे साधकांपुढे आदर्श निर्माण करणे

प्रसंगानुरूप मला पू. ताईमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि महाकाली यांची रूपे अनुभवायला मिळतात. त्यांच्यातील ‘नेतृत्वगुण, गुर्वाज्ञापालन, सतर्कता, संयम, विचारून कृती करणे, प्रेमभाव, व्यापकता, तत्त्वनिष्ठता’ इत्यादी गुण मला शिकायला मिळतात. ‘पू. अश्‍विनीताई म्हणजे दैवी गुणांच्या रत्नांची खाण असून आमच्यासाठी चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय आहे’, असे मला वाटते. ‘त्यांचे बोलणे, वागणे आणि सर्वांशी प्रेमभावाने मिसळून वागणे’ यांतून त्यांनी साधकांपुढे आदर्श निर्माण केला आहे’, असे मला वाटते.

देवद आश्रमातील आम्हा साधकांना पू. अश्‍विनीताईंच्या रूपात महान असे संतरत्न परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिले आहे. त्यासाठी पू. अश्‍विनीताई आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– पू. (श्री.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक