कोरोनामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाकडून केंद्र सरकारकडे प्रोत्साहन पॅकेजची मागणी

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – कोरोनामुळे विज्ञापने आणि वितरण यांना मोठा फटका बसल्याने वृत्तपत्र उद्योग महसुलातील घटीच्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. अनेक प्रकाशने बंद झाली आहेत किंवा काही आवृत्त्या अनिश्‍चित काळासाठी स्थगित झाल्या आहेत. हीच स्थिती राहिली, तर भविष्यात आणखी अनेक प्रकाशने बंद होतील. ८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली आहे आणि वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी मागणी ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’चे (‘आय.एन्.एस्.’चे) अध्यक्ष एल्. आदिमूलम् यांनी  केली आहे. आय.एन्.एस्. अनेक मासांंपासून पॅकेजची अपेक्षा करत आहे.

पॅकेजची मागणी करतांना त्यात न्यूजप्रिंट, जी.एन्.पी. आणि एल्.डब्ल्यू.सी. प्रकारच्या कागदावर उर्वरित ५ टक्के सीमा शुल्क रहित करावे, २ वर्षांचा टॅक्स हॉलिडे, शासकीय विज्ञापनांच्या दरांत ५० टक्के वाढ, प्रिंट मीडियावर सरकारद्वारे केल्या जाणार्‍या खर्चात २०० टक्क्यांची वाढ , बीओसी, तसेच राज्य सरकारांच्या माध्यमाने जारी केलेल्या विज्ञापनांची प्रलंबित देयके त्वरित देण्याचा समावेश आहे.