पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचा चिनी तरुणांसमवेत विवाह लावून त्यांना दासी बनवले जाते ! – अमेरिकेचा आरोप

पाक आणि चीन यांची ही युती चांगले काम कधीतरी करू शकेल का ? जगानेच आता या दोन्ही देशांच्या विरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारणे आवश्यक आहे !

प्रशासकीय अधकारी सॅम्युअल ब्राउनबॅक

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकमधील हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचा चिनी तरुणांसमवेत विवाह लावून त्यांना चीनमध्ये दासी म्हणून पाठवण्यात येत आहे, असा आरोप अमेरिकेचे प्रशासकीय अधकारी सॅम्युअल ब्राउनबॅक यांनी केला आहे.

१. सॅम्युअल यांनी म्हटले आहे की, पाकमधील अल्पसंख्य समाजातील तरुणींना चिनी तरुणांसमवेत विवाह करण्यासाठी बाध्य केले जाते. त्यांना चीनमध्ये दासीच्या स्वरूपात पाहिले जाते. या तरुणांना साहाय्य करणारे कुणी नसल्याने त्यांचा अपलाभ घेतला जात आहे. चीनमध्ये अनेक वर्षे ‘एक मूल’ असा नियम होता. त्यामुळे तेथे महिलांची कमतरता आहे. यासाठी पाकसारख्या देशांतील महिलांशी चिनी विवाह करून त्यांचा नोकर म्हणून वापर करत आहेत. पाकमधील काही गरीब लोक पैशाच्या आमीषामुळे त्यांच्या मुलीचे विवाह चिनी नागरिकांशी करून देत आहेत. काही मासानंतर हे लग्न तुटते.

२. ‘अमेरिकेने नुकतेच धार्मिक स्वातंत्र्याचे हनन होणार्‍या १० देशांची सूची बनवली आहे. त्यात भारताचे नाव का नाही ?‘ या प्रश्‍नावर सॅम्युअल यांनी सांगितले की, पाकमधील सरकार अल्पसंख्यांकांच्या विरोधात काम करते. भारतात तसे होत नाही. जगात ईशनिंदेचे जितकी प्रकरणे समोर येतात त्यांतील अर्ध्याहून अधिक पाकमधील असतात.