पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) – ३ कृषी कायद्यांच्या विरोधात ८ डिसेंबर या दिवशी शेतकर्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम झाला नाही. राज्यात जनजीवन सुरळीत चालू होते. या ‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष, आप आणि शिवसेना या राजकीय पक्षांनी, तसेच शेतकरी संघ, ‘अखिल भारतीय किसान सभा’, ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन’ आदींनी पाठिंबा दर्शवला होता आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते; मात्र राज्यात सर्व बाजार, सार्वजनिक वाहतूक सेवा, शैक्षणिक संस्था आणि अन्य सेवा सुरळीत चालू होत्या. याविषयी ‘आयटक’ या कामगार संघटनेचे महासचिव सुहास नाईक म्हणाले, ‘‘प्रत्येकाला स्वयंस्फूर्तीने ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि कुणीही बळजोरीने दुकाने किंवा कारखाने बंद करण्याचा प्रयत्न केलेला नाही. कामगार संघटना यापुढे ३ कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यभरात शांततापूर्णरित्या आंदोलन करणार आहेत.’’ राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात गस्त वाढवली होती. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे यापूर्वीच म्हटले होते.
‘बंद’ला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन
कृषी कायद्यांच्या विरोधात आझाद मैदान, पणजी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये पर्यावरण कार्यकर्ते क्लॉड आल्वारीस, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदींनी सहभाग घेतला.