ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांवर ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

कालच्या भागात आपण नवग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि ग्रहदोष म्हणजे काय ? याविषयी पाहिले. आज आपण पुढचा भाग पाहूया.

लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429140.html

श्री. राज कर्वे

६. ग्रहदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ‘साधना करणे’ हाच सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात. कालांतराने पुन्हा त्रासांचे प्रमाण वाढते. मनुष्याला त्याच्या प्रारब्धातील भोग भोगूनच संपवावे लागतात. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या चक्रातून कायमची मुक्तता होण्यासाठी ‘साधना करणे’ हाच सर्वोत्तम उपाय आहे.

६ अ. साधना म्हणजे काय ? : साधना म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न. ईश्‍वराची प्राप्ती होणे म्हणजे ‘सत्-चित्-आनंद’ ही अवस्था अखंड अनुभवणे. जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. साधना ही ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादी योगमार्गांनुसार केली जाते. ‘कलियुगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे.

६ आ. योग्य साधना होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असणे : एकट्याने साधना करून स्वबळावर ईश्‍वरप्राप्ती करून घेणे पुष्कळ कठीण असते. त्यापेक्षा अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीची, म्हणजेच गुरु किंवा संत यांची कृपा संपादन केली, तर ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय लवकर साध्य होते. यासाठी गुरुप्राप्ती होणे आवश्यक असते. गुरु हे शिष्याचे अज्ञान घालवून ‘त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी त्याला साधना सांगतात, ती त्याच्याकडून करवून घेतात आणि त्याला अनुभूतीही देतात.

६ इ. गुरुकृपेमुळे कठीण प्रसंगांमध्ये शिष्याचे रक्षण होणे : मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते. यासंदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

६ इ १. मरणासन्न अवस्थेतून गेलेल्या साधिका कु. दीपाली मतकर यांचे गुरुकृपेमुळे रक्षण होणे

६ इ १ अ. सनातन संस्थेच्या साधिका कु. दीपाली मतकर यांची मरणासन्न अवस्था : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या साधिका कु. दीपाली मतकर यांना २२.१०.२०१६ या दिवशी डेंग्यू, न्यूमोनिया आणि कावीळ, असे विविध गंभीर आजार झाले. त्यांच्या पोटातील यकृत (लीव्हर) आणि प्लीहा (स्प्लीन) यांना सूज आली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झाले आणि एक गंभीर प्रकारचा ‘न्यूमोनिया’ निर्माण झाला. त्यांच्या रक्तामधील ‘प्लेटलेट्स’ची संख्या अतिशय न्यून झाली होती. अशा वेळी आपोआप तीव्र रक्तस्राव होऊन मरण येण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते. आधुनिक वैद्यांनी कु. दीपाली यांच्या जगण्याची आशा सोडली होती.

६ इ १ आ. ज्योतिषशास्त्रानुसार कु. दीपाली यांच्या कुंडलीतील तत्कालीन ग्रहस्थितीवरून त्यांना ‘अपमृत्यूयोग’ असणे : कु. दीपाली यांच्या गोचर (तत्कालीक) कुंडलीत षष्ठ स्थानात, म्हणजे रोग स्थानात राहू हा पापग्रह होता. षष्ठ स्थानाचा स्वामी रवि ग्रह अष्टम स्थानात, म्हणजे मृत्यू स्थानात होता. गोचर कुंडलीतील मंगळ ग्रहाचे भ्रमण जन्म कुंडलीतील शनि ग्रहावरून चालू होते. कु. दीपाली यांची केतू ग्रहाची महादशा चालू होती. हे योग तीव्र शारीरिक त्रास किंवा ‘अपमृत्यूयोग’ असल्याचे दर्शवतात.

६ इ १ इ. महर्षि आणि संत यांनी केलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे कु. दीपाली यांना झालेले सर्व गंभीर आजार अवघ्या १५ दिवसांत बरे होणे : कु. दीपाली अत्यवस्थ स्थितीत असतांना महर्षि आणि संत यांनी त्यांच्यावर नामजपादी उपाय केले. भृगु महर्षि आणि सप्तर्षि यांनी नाडीपट्टीच्या माध्यमातून अनेक उपाय करण्यास सांगितले. संतांनी अनेक घंटे कु. दीपाली यांच्यावर नामजपादी उपाय केले. त्यामुळे कु. दीपाली यांना झालेले सर्व गंभीर आजार दूर होऊन त्या अवघ्या १५ दिवसांत बर्‍या झाल्या.

६ इ १ ई. कु. दीपाली साधना करत असल्यामुळे अपमृत्यूयोगासारख्या संकटात गुरूंनी त्यांचे रक्षण करणे : कु. दीपाली या तन-मन-धन अर्पण करून पूर्णवेळ गुरुकार्य आणि साधना करतात. त्यांच्यात गुरूंप्रती श्रद्धा आणि ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात ‘गोपीभाव’ आहे. त्यामुळे त्या सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असतात. कु. दीपाली या साधना करत असल्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन अपमृत्यूयोगासारख्या संकटात गुरूंनी त्यांचे रक्षण केले.

६ इ २. खडतर प्रारब्ध भोगत असतांना त्याकडे साक्षीभावाने पाहून संतपद प्राप्त करणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

६ इ २ अ. पू. (सौ.) संगीता पाटील यांचे खडतर प्रारब्ध : पू. (सौ.) संगीता पाटील यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. पुढे विवाह होऊन त्यांना मुलगा झाला; परंतु लहान वयातच त्याचा मृत्यू झाला. पू. (सौ.) संगीता यांना विषमज्वर (टायफॉईड) झाल्याने त्यांना अंधत्व आले. त्यांच्या यजमानांचा नोकरीच्या ठिकाणी अपघात होऊन यजमानांची नोकरी गेली. पुढे यजमानांच्या एका डोळ्याची दृष्टीही गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती.

६ इ २ आ. पू. (सौ.) संगीता पाटील यांचे प्रारब्ध ७५ टक्के असणे : सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी पू. (सौ.) संगीता यांचे सूक्ष्म परीक्षण करून सांगितले, ‘‘सौ. संगीता यांचे प्रारब्ध ७५ टक्के आहे; पण भक्तीभावाच्या बळावर त्यांनी त्यावर मात केली.’’ (कलियुगातील सध्याच्या काळात सर्वसाधारण व्यक्तीचे प्रारब्ध ६५ टक्के असते आणि सर्वसामान्य व्यक्ती अडचणींमुळे खचून जाऊन दुःखी होते.)

६ इ २ इ. खडतर प्रारब्ध असतांनाही परिस्थितीला दोष न देणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील संतपदी विराजमान ! : अशा प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता पू. (सौ.) संगीता पाटील आनंदाने साधना करत आहेत. खडतर प्रारब्ध असतांनाही त्यांनी परिस्थितीला कधीच दोष दिला नाही. उलट त्यांनी झोकून देऊन गुरुकार्य आणि साधना केली. त्या म्हणतात, ‘‘माझ्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले; पण ते गुरुकृपेने पार पडले.’’ ईश्‍वराप्रतीच्या भावामुळे पू. (सौ.) संगीता पाटील संतपदी विराजमान झाल्या.

(क्रमशः)

– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.१०.२०१९)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक