कोरोनाच्या संकटातही चीनच्या निर्यातीमध्ये २१ टक्क्यांची वाढ !

नोव्हेंबर मासातच २६८ अब्ज डॉलर कमावले !

जगाला कोरोनाच्या संकटात चीनने टाकले, असे म्हटले जात असतांना चीनच्या व्यापारामध्ये होणारी वाढ त्याच्यावरील संशय वाढवते !  

बीजिंग (चीन) – कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असतांना चीनच्या निर्यातीमध्ये वाढ झाल्याची माहिती उघड झाली आहे. एकट्या नोव्हेंबर मासामध्ये चीनची निर्यात २६८ अब्ज डॉलरपर्यंत पोचली आहे. ही गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मासापेक्षा २१.१ टक्क्यांनी अधिक आहे. अमेरिकेने चीनच्या आस्थापनांवर अनेक कठोर निर्बंध घातले असतांनाही तेथील निर्यातीमध्ये वाढ झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ७५.४ अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे.


१. अमेरिकेच्या जकात विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये निर्यात केल्या जाणार्‍या चिनी वस्तूंची टक्केवारी ४६ टक्क्यांनी वाढली आहे.

२. ऑक्टोबरमध्ये चीनमधून होणारी निर्यात ११.४ टक्क्यांनी वाढली होती, तर चीनमधील आयातही ५ टक्क्यांनी वाढून १९२.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोचली होती. ऑक्टोबर मासामध्ये चीनची आयात ४.७ टक्क्यांनी वाढली. या आकड्यांवरून चीनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटामधून पूर्णपणे सावरल्याचे स्पष्ट होत आहे.