वेंगुर्ले – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावात आगळीवेगळी परंपरा असलेले एक श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरात प्रतीवर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीपासून सिद्ध केलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. या मूर्तीचे विसर्जन फाल्गुन पौर्णिमेच्या (होळी पौर्णिमेच्या) आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी केले जाते.
बहुतांश गणेश मंदिरांमध्ये श्री गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते, तर काही मंदिरांमध्ये भाद्रपद मासातील श्री गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते; उभादांडा गणेश मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येते. यावर्षी १४ नोव्हेंबरला सायंकाळी भक्तीमय वातावरणात मातीच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील देवस्थानचे मानकरी विनायक तांडेल हे स्वतः श्री गणरायाची मूर्ती साकारतात.