गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प करा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात १०७ कोरोनाबाधित, तर १५ जण कोरोनामुक्त

मुंबई – कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प आपण सगळ्यांनी करूया, असे आवाहन करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०७ वर पोचली आहे, तर १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टोपे पुढे म्हणाले की,

१. डॉक्टरांनी ‘ओपीडी’ (बाह्य रुग्ण विभाग) बंद केल्या आहेत, ते योग्य नव्हे. लोक आजारी पडले, तर त्यांनी काय करायचे ? वैद्यकीय व्यवसाय आपण संचारबंदीतून वगळले आहेत. त्यांनी कर्मचार्‍यांना बोलवावे. रुग्णांवर व्यवस्थित उपचार करावेत. या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायचा आहे.

२. मुंबई, पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने या दोन्ही शहरांतील नागरिकांकडे ग्रामीण भागातील लोक संशयाने पहात आहेत. हे योग्य नाही. मुंबई, पुणे येथून मूळ गावी जर कुणी येत असेल, तर अशा व्यक्तींना गावात येण्यापासून अडवू नका. मुंबई-पुण्यातून गावात जाणार्‍या लोकांनीही अंतर राखावे.