‘मनाचे श्लोक’ हे मनातील दोषरूपी चौफेर शत्रूवर आक्रमण करणारे असून साधकाने त्यासह स्वयंसूचनेचाही लाभ घ्यावा !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘मनाचे श्लोका’विषयीची लेखमाला २६ मार्च ते २८ मार्च आणि ३० मार्च या काळात ४ भागांत प्रसिद्ध झाली आहे. या लेखासंबंधाने अनेक साधक आणि वाचक यांनी या ना त्या प्रकारे तो आवडल्याचे सांगितले. त्यासाठी कृतज्ञता ! यासह काही जणांकडून विचारणाही झाली.

ती सूत्रे आणि संबंधित विवरण ६ ते ९ एप्रिल या दिवसांमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केले आहे. याच अनुषंगाने आलेली २ सूत्रे पुढे देत आहे.

६ एप्रिल → https://sanatanprabhat.org/marathi/1026660.html
७ एप्रिल → https://sanatanprabhat.org/marathi/1026944.html
८ एप्रिल → https://sanatanprabhat.org/marathi/1027294.html
९ एप्रिल → https://sanatanprabhat.org/marathi/1027702.html

उदासीनता (डिप्रेशन) असणार्‍यांसाठी साधना म्हणून काय करावे, हे व्यक्तीपरत्वे भिन्न !

प्रश्न १. : ‘केवळ माहितीसाठी ज्यांना उदासीनता आहे, त्यांना तो दूर करणार्‍या आधुनिक मनोविकारतज्ञांकडून देण्यात येणार्‍या औषधांद्वारे मेंदूमध्ये या अनुकूल प्रकारच्या रसायनांची मात्रा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.’ हे  ६.४.२०२६ या दिवशीच्या लेखात आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, ‘हे रसायन कृत्रिमपणे वाढवले जाते. ते असे केल्याने त्यांच्या निर्मितीच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये (‘नॅचरल प्रोसेस’मध्ये) अडथळा येत नाही का ? अशीच सवय राहिली की, नैसर्गिकरीत्या (नॅचरली) निर्माण होण्याच्या प्रक्रिया काही प्रमाणात मंदावते का ? – कु. सुप्रिया टोणपे, फोंडा, गोवा.

उत्तर : मुळात या ना त्या कारणाने उदासीनता, म्हणजे ‘डिप्रेशन’ असणार्‍यांमध्ये ‘सेरोटोनीन’, ‘डोपामिन’ आदी संप्रेरकांची मेंदूतील मात्रा मनाला सकारात्मक भावना निर्माण करण्यास पुरेशी पडत नसते. प्रत्येकातील उदासीनतेची कारणे भिन्न, तसेच तीव्रता भिन्न असू शकते. वर उल्लेखित औषधांमुळे ही संप्रेरके नष्ट करण्याची नैसर्गिक प्रक्रिया थोडी मंदावते. त्यामुळे त्यांची मात्रा थोडी वाढते. मनातील भावना सकारात्मक राखण्याच्या प्रक्रियेत हातभार लावला जातो. त्यामुळे नैसर्गिकरित्या तीच संप्रेरके सिद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळा होत नाही. ‘डिप्रेशन’ असणारे काही सुखदायक प्रसंग जीवनात अनुभवत असतातच. उदाहरणार्थ करमणुकीचे कार्यक्रम भ्रमणभाषवर पहाणे, आवडणारे खाद्यपदार्थ सेवन करणे इत्यादी, तेव्हा ही रसायने सिद्ध होतातच. आध्यात्मिक दृष्टीने मन, मेंदू. त्यातील पेशी, रसायने, त्यावर परिणाम करणारी औषधे इत्यादी जड आहेत, हे लक्षात घ्यावे. ‘डिप्रेशन’ असणार्‍यांनी औषधे घेत असतांना साधना म्हणून काय करावे, हे व्यक्तीपरत्वे भिन्न असते.

‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य, म्हणजे एकप्रकारे व्यापक !

प्रश्न २. : ‘मनाचे श्लोक’वरील लेखमाला वाचल्यानंतर असे वाटले मनाला उद्देशून ते योग्य-अयोग्य सांगतात. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) स्वयंसूचना पद्धत सांगितली, तेच ‘मनाचे श्लोक’ मनाला सतत जाणीव करून देतात, यात दोन्हीत साधर्म्य आहे ना ? – कु. सुप्रिया टोणपे, फोंडा, गोवा.

उत्तर : दोन्ही स्वपरिवर्तन साधण्यासाठी आहेत. स्वयंसूचनेमध्ये नेमका विशिष्ट विचार, नेमकी विशिष्ट नेमकी कृती आदींवर लक्ष केंद्रीत केले जाते. ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य प्रकारे आहेत, म्हणजे एकप्रकारे व्यापक आहेत. येथे ‘व्यापक’ याचा अर्थ समजून घेण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे (सैन्याने शत्रूवर केलेली तात्पुरती कारवाई) उदाहरण लक्षात घ्यावे. तेथे शत्रूपक्षाच्या विशिष्ट एका चौकीवर सैनिक आक्रमण करतात. हे स्वयंसूचनेसारखे झाले. त्याच वेळी सीमेवरील त्यांचे सहकारी पुष्कळ तोफा, बंदुका आदी विविध ठिकाणी चालवून शत्रूपक्षाला सर्वसाधारण दाबण्याचा आणि गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे ‘मनाचे श्लोक’सारखे झाले. दोन्ही शत्रूवरील आक्रमणेच. साधकाने दोन्हींचा लाभ घ्यावा. आपली समस्या कोणती ? आपल्या प्रकृतीला कोणते आणि काय चांगले, हे पाहून ठरवावे.

डॉ. दुर्गेश सामंत

टीप : दोन्ही प्रश्न उदासीनता आणि साधना यासंबंधी आहेत.

उदासीनतेमुळे साधनेच्या प्रयत्नांना बाधा कितपत येते, हे व्यक्तीसापेक्ष आहे. एखादा उदासीनतेच्या समस्येला तोंड देण्यास पुरेसा सक्षम नसेल, तर त्याचे साधनेचे प्रयत्न मर्यादित किंवा नगण्यही असतील. दुसरा कुणी असेल, तो या उदासीनतेचे एक साधक म्हणून स्वागत करील. त्याच्यासाठी मनाची चौकट तोडून जगाकडे, स्वतःकडे आणि जीवनाकडे पहायची उदासीनता ही संधी असेल. त्याच्यासाठी ईशप्राप्ती आणि ईशस्वरूपाचा बोध हे समानार्थी बनतील. एखादा एवढा संवेदनशील असेल की, दुसर्‍याचे दुःख पाहून त्याला दुःखाची वरकरणी दिसणाऱ्या कारणांपेक्षा त्यांच्या मूळ कारणांचा शोध घ्यावासा वाटेल. उदासीनतेकडे संधी म्हणून पहाणाराही याच वाटेने जातो. दोघांचा शोध स्वरूपज्ञानाची प्राप्ती हे खरे उत्तर म्हणून समजले की, संपतो. यासह दुःख आणि उदासीनता संपते. मग स्वरूपज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न चालू होतात. याचे साध्य पूर्णत्वाचे समाधान असतेच; परंतु वाटचालही आनंदाची असते.

श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२६)

मनाच्या श्लोकांविषयीच्या लेखमालेतील भाग पाहण्यासाठी क्लिक करा →

भाग १ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक !

भाग २ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम !

भाग ३ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांमुळे मेंदूला चुकीच्या कृतीपासून वाचवण्यासाठी होणारा प्रयत्न !

भाग ४ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त !