दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘मनाचे श्लोका’विषयीची २६ मार्च ते २८ मार्च आणि ३० मार्च या दिवशी ४ भागांत लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. या लेखासंबंधाने अनेक साधक आणि वाचक यांनी या ना त्या प्रकारे तो आवडल्याचे सांगितले. त्यासाठी कृतज्ञता ! यासह काही जणांकडून विचारणाही झाली. ती सूत्रे आणि संबंधित विवरण पुढे देत आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मनाच्या श्लोकांचा साधनेत वापर, ईशचिंतनाचा मेंदूवर परिणाम, कर्म आणि दृष्टी, भगवद्गीतेतील ९ व्या श्लोकाचे निरूपण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1027294.html
१. ईशदृष्टी सूत्राचे विवरण
अ. अंतिम सत्य : हे जगत ज्याच्यापासून प्रकट झाले, तो त्यापासून अभिन्न आहे. त्याच्या यादृष्टीने तो एकटाच आहे. अर्जुनाला गीता सांगत असलेल्या श्रीकृष्णाला त्याच्या या स्वस्वरूपाचे भान सदोदित आहे. मग यांत कर्म संभव नाही. कर्म होण्यासाठी द्वैत हवे. या ईशदृष्टीचा अर्थच अद्वैत. तेथे कर्म करणाराही नाही, त्याचे फळ भोगणाराही कुणी नाही; कारण सर्व काही तोच आहे. त्यामुळे काही घडतच नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘अगा जे घडिलेची नाही, वार्ता कशाची पुसता ।’
आ. सापेक्ष सत्य : वर हे सत्य जे सांगितले त्या तुलनेत थोडे दुय्यम स्तरावरचे. आता येथे मायेचा संदर्भ घेत पहायचे, तर श्रीकृष्ण मायाधिपती आहे, म्हणजे आपल्या दृष्टीने जी काही माया म्हणून वाटते त्याचा तो अधिपती आहे. त्याला भूत-भविष्य सर्व ज्ञात आहे. तो अलिप्त आहे. त्यामुळे तो तिच्या अधीन नाही. त्याला कर्मांचे बंधन नाही, तर अर्जुन (जीव) मायाधीन आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मडक्याने मडक्याकडे पहाणे म्हणजे जीवदृष्टी. येथे मडक्याला अन्य मडक्यांतील भेदच दिसेल. मातीने मडक्यांकडे पहाणे म्हणजे ईशदृष्टी. येथे भिन्नता (डिफरन्स) दिसेल, भेद (डिव्हिजन) नाही.

२. जीवदृष्टी
जीवदृष्टी रज्जूसर्प रुपकाप्रमाणे (अल्प प्रकाशात दोरीऐवजी साप आहे, असे वाटणे) असते. म्हणून त्या ‘सापा’ला पाहून काही भितात, तर काहींना तो ‘चावला’ (दु:ख) असेही वाटते. काही त्याला काही प्यायला देतात (मायेतील उपाय शोधणे). एवढेच नव्हे, तर त्याने काही प्यायले म्हणून तो त्रास न देता पडून आहे, असेही सांगतात. काही तो ‘साप’ नेमका कसा आहे, याचे ‘शवविच्छेदन’ (आपापल्या शाखेनुसार समस्यांचे अध्ययन) करत रहातात. कितीही उद्योग केले, तरी या मंडळींसाठी तो ‘साप’ नाहीसा होत नाही. यांतील कुणीच, कधीच सत्यापर्यंत पोचत नाहीत. या सगळ्या कृती, म्हणजे कर्म आहे. त्यात कर्तेपणा आणि भोक्तेपणा आहे. कर्तेपणामुळे कर्मफलन्याय लागू होतो. करणार्यावर, भोगणार्यावर या सगळ्याचा संस्कार होतो. याचे मूळ कारण, म्हणजे तेथे मुळातच द्वैत असते. अज्ञानापोटीचे प्रत्येक कर्म बंधन बनते.
३. अविद्या म्हणजे काय ?
ईश्वर म्हणजे ब्रह्म + माया. जीव म्हणजे ब्रह्म + अविद्या. अविद्या म्हणजे एक प्रकारे मायाच ज्यात जीवाला मायेच्या आवरण शक्तीमुळे स्वत:च्या सत्य स्वरूपाचे (मी ब्रह्म / परमात्मा) भान नाही. यात भर म्हणजे मायेच्या विक्षेप शक्तीमुळे तो स्वत:ला देह समजून बसला आहे. हे म्हणजे अज्ञान आणि देहात्मबुद्धी. यांत द्वैत आणि अपूर्णता आहे. अपूर्णत्वाने तळमळणारा जीव कर्ता आणि भोक्ता बनतो. तो जीवाला बंधनात पडतो. कर्माचा बंध कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांमुळे निर्माण होतो. त्यामुळे जोपर्यंत देहात्मबुद्धी जाऊन स्वरूपज्ञान होत नाही, तोपर्यंत जीवाचे कर्मफलन्यायाने जन्म-मृत्यू होत रहातात.

४. भगवंताशी एकरूप व्हायचे, तर त्याच्यासारखे व्हायला हवे !
प्रश्न : ‘मी साक्षीभूत होऊन पहातो’, असे का म्हटले ? कारण जे चालले आहे, त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटक, पदार्थ आदींमध्ये भगवंत आहे, तरी त्यात तो नुसते कसे पहातो म्हणायचे ?
उत्तर : ब्रह्म सर्वव्यापी आहे, याचा अर्थ प्रत्येक जीवात, म्हणजे या लेखाच्या वाचकातही आहेच. ब्रह्माचा स्वभाव किंवा स्वरूप सत्, म्हणजे अस्तित्व म्हणजे आहे किंवा असणे, चित म्हणजे चैतन्य अर्थात् मूळ जाणीव, आनंद म्हणजे पूर्णत्व किंवा समाधान, असे आहे. जीवाच्या बुद्धीमध्ये या सर्वव्यापी चैतन्याचे प्रतिबिंब पडलेले असते. येथे जीवाची बुद्धी-देह हे माध्यमाचे काम करते, ज्यायोगे परमात्म्याचे रूप तसे दिसते. जसे सकाळच्या पावसाच्या सरीनंतर पानापासून किंवा गोल कठड्यापासून लटकत असलेल्या थेंबाप्रमाणे हे काहीसे आहे. थेंब दिसतो तो सभोवतालचा प्रकाश + त्याच्या प्रतिबिंबित प्रकाश यांच्यामुळे. अंधार असता, तर थेंबाला अस्तित्व नाही. जीवातील प्रकाश, म्हणजे आत्मा, तर बाहेरचा प्रकाश म्हणजे परमात्मा. खरेतर दोन्ही एकच. समस्या ही आहे की, ‘थेंब म्हणजे जीव मी स्वतंत्र आणि हा प्रकाशही माझाच’, असे मानून बसतो. तेथे भेद होऊन द्वैत येते. आरशातील प्रतिबिंब मूळ प्रतिमेसारखेच असते. जीवाला पंचकोषात्मक देहातील आत्म्याचे-ब्रह्माचे प्रतिबिंब जसेच्या तसे मूळ स्वरूपात अनुभवाला येत नाही; कारण या देहातील संस्कार, म्हणजेच आरशावरील डाग. त्यामुळे जीव कर्ता आणि भोक्ता भावाने सर्व करत रहातो. जीव असे सगळे करत राहीला, तरी आत्मा म्हणजेच ब्रह्म डागाळत नाही, जसे आरशावरील डागांचा मूळ प्रतिमेवर काही परिणाम होत नाही. असे असले, तरी जे घडत असते, ते त्या ब्रह्मामुळेच किंवा त्या तत्त्वामुळेच होते, म्हणजे ते भगवंतालाही समजते; कारण समजणे, अनुभवणे केवळ आत्मतत्त्वामुळेच संभव होते. समजले तरी भगवंत येथे ‘उदासीन’ (indifferent) असतो.
भगवंताला उत्पत्ती, स्थिती, लयाचे यांचे ना भय आहे, ना आनंद आहे. जसा दिव्याच्या प्रकाशात घरात सर्व कामे करतात, त्या प्रकाशाला त्याचे काहीच वाटत नसते; मात्र प्रकाशाविना काही संभव नसते, तसे भगवंताचे आहे. त्यामुळे त्याच्याशी एकरूप व्हायचे, तर त्याच्यासारखे व्हायला हवे. त्यासाठी ‘उदासीनता’ हे सूत्र अंगी बाणायला हवे. म्हणून समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘उदासीनता तत्वता सार आहे.’ अर्थात् येथे उदासीनता, म्हणजे कर्मापासून दूर जाऊन बसणे नव्हे ! तसे कुणी स्वत: ठरवून केले, तर तेही कर्मच होईल आणि त्याचेही फळ असणारच ! अर्जुनाची हीच समस्या होती. ‘मनाचे श्लोक’ हा प्राधान्याने एकप्रकारे साधना करायची, तर कशी हे ‘प्रॅक्टिकल’ (प्रायोगिक) सांगणारा, तर ‘गीता’ हा त्या साधनासूत्रांमागील मूलतत्त्व कोणते अर्थात् तशी साधना का सांगितली ? यामागील ‘थिअरी’ (तात्त्विक) सांगणारा ग्रंथ आहे. असे दोन्ही प्रकारचे ग्रंथ साधनेसाठी परस्परपूरक असतात.
(समाप्त)
॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२६)
| मनाच्या श्लोकांविषयीच्या लेखमालेतील भाग पाहण्यासाठी क्लिक करा →
भाग १ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक ! भाग २ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम ! भाग ४ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त ! |

‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !