सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला दिलेल्या भेटीच्या वेळी केलेले मार्गदर्शन

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आश्रमात आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करतांना पू. पृथ्वीराज हजारे आणि साधक

फोंडा (गोवा) – कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःमधील सात्त्विकता जागृत करून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. मानव जन्मातच स्वतःचे नशीब पालटण्याचे सामर्थ्य असून योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य केल्यास विश्वशांतीचे ध्येय गाठता येईल, असे ओजस्वी मार्गदर्शन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी अव्याहतपणे कार्य करणारे रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी १३ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मंगलमय भेट दिली. या वेळी केलेल्या मार्गदर्शनात त्यांनी समाजाच्या उत्कर्षाचा संदेश दिला.

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले की,

१. हिंदु धर्मियांनी सर्व भेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. आमचे आणि प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे मिशन (कार्य) एकच आहे, ते म्हणजे हिंदु धर्माचे रक्षण अन् उत्थान !

२. कलियुगात रज आणि तम या गुणांचा प्रभाव आपोआप वाढतो, त्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची आवश्यकता नसते. हे गुण मानवी जीवनाला अधोगतीकडे नेतात. या गुणांचा प्रभाव नष्ट करून सात्त्विकता वाढवण्यासाठी समाजाने ‘साधना’ करणे अनिवार्य आहे.

सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार

१. प.पू. डॉ. आठवले हे अंतर्बाह्य सत्पुरुष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक जगभरात विश्वशांतीचे असामान्य कार्य करत आहेत. हे कार्य इतर कोणत्याही संप्रदायाला सहजासहजी शक्य झालेले नाही; कारण येथे गुरुतत्त्व प्रधान मानले जाते आणि शिस्तबद्ध पद्धतीने साधना केली जाते.

२. तुम्ही सर्व साधक पुण्यात्मे आहात; म्हणून या जन्मात तुम्हाला प.पू. डॉ. आठवलेरूपी रत्न मिळाले आहे.

३. प.पू. डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या केवळ स्पंदनांमुळे साधकांची आध्यात्मिक प्रगती होत आहे.

४. आश्रमातील स्पंदने आत्मचैतन्याकडे घेऊन जाणारी आहेत. इथल्या साधकांमध्ये हे चैतन्य (सात्त्विकता) दिसत आहे.

५. साधकांनी प.पू. डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करावे, म्हणजे आपल्या जीवनाचे कल्याण होईल

थोर विभूतींची हृद्य भेट !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सन्मान करतांना जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची भेट घेतली आणि कार्यासाठी आशीर्वाद घेतले.

 हे ही वाचा → प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

भावपूर्ण वातावरणात पार पडला सोहळा !

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा सन्मान करतांना पू. पृथ्वीराज हजारे

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य परंपरेनुसार प्रथम मंगलाचरणाचे पठण झाले आणि त्यानंतर त्यांनी साधकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाच्या आरंभी सनातनचे साधक दांपत्य श्री. अभिषेक पै आणि सौ. सिद्धी पै यांनी गुरुपादुकांचे पूजन केले, तसेच जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे औक्षण केले. या वेळी सनातनचे पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी मंत्रपठण केले. यानंतर सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू अर्पण करून भावपूर्ण सन्मान केला. या वेळी त्यांच्यासह आलेल्या सर्व भक्तांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे अन् सनातनच्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.