भगवद्गीतेतील अध्याय ९ मधील ९ व्या श्लोकाशी संबंधित निरूपण

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘मनाचे श्लोका’विषयीची २६ मार्च ते २८ मार्च आणि ३० मार्च या दिवशी ४ भागांत लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. या लेखासंबंधाने अनेक साधक आणि वाचक यांनी या ना त्या प्रकारे तो आवडल्याचे सांगितले. त्यासाठी कृतज्ञता ! यासह काही जणांकडून विचारणाही झाली. ती सूत्रे आणि संबंधित विवरण पुढे देत आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मनाच्या श्लोकांचा साधनेत वापर, ईशचिंतनाचा मेंदूवर परिणाम, कर्म आणि दृष्टी’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026944.html

१. गीतेतील श्लोकाचे निरूपण

१ अ. मूळ श्लोक :

न च मां तानि कर्माणि निबन्धन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ – भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ९

अर्थ : हे धनजंया, त्या कर्मांत (टीप : अ) आसक्ती नसलेल्या आणि उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला (टीप : आ) ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. (टीप : इ)

१ आ. श्लोकातील ३ प्रधान सूत्रे : वर कंसात नोंद केल्यानुसार श्लोकातील ३ प्रधान सूत्रे कशाविषयी आहेत, हे सांगणारे विवरण येथे करत आहे.

१ आ १. कर्मविषयक : कर्माचा विचार करतांना या जगतात उत्पत्ती, स्थिती, लय या प्रकारची कर्मे होत असतात, हे लक्षात येते.

१ आ २. ईशदृष्टी : त्या कर्मांकडे मी (परमात्मा) अलिप्तपणे, उदासीनपणे, साक्षीभूत होऊन पहात रहातो. जगत निर्माण केले आणि त्याला सोडून परमात्मा बाजूला बसला असेही नाही. तो स्वत: त्यात आहेच.

१ आ ३. फलविषयक : मी (परमात्मा) त्या कर्मांनी बांधला जात नाही, गेलेला नाही. सामान्यत: काही हवे अथवा नको वाटणे यातून आपण त्या त्या गोष्टीशी बांधले जात असतो. अमुक फल मला (परमात्म्याला) हवे अथवा मला नको, हा विचार येथे नाही. त्यामुळे बंधन नाही. त्यांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही.

मनाचे श्लोक ५७ मधील तिसर्‍या चरणाचे आधारगुह्य गीतेतील या श्लोकात दडलेले आहे. या सूत्रांच्या विवरणानंतर साधकाला ‘उदासीनतेने’ प्रपंच करावा, असे का सांगण्यात येते, हे थोडे उलगडेल. ते समजण्यासाठी पुढे जाण्याआधी काही उपयुक्त सूत्रे…

२. जगतनिर्मितीचे कार्य

उत्पत्ती (कार्य) होण्यासाठी काही सामग्री हवी (उपादानकारण) आणि त्यांचे उचित संयोजन करून आणण्यासाठी कुणी (निमित्तकारण) हवे. जसे मातीपासून (उपादानकारण) मडके (कार्य) बनण्यासाठी कुणी कुंभार (निमित्तकारण) हवा. या जगताचे निमित्तकारण आणि उपादानकारण भगवंत (परमात्मा / ब्रह्म) आहे.

३. श्लोकातील सूत्रांचे विवरण

३ अ. कर्मविषयक सूत्राचे विवरण : जगताची स्थिती रहाण्यासाठी काही व्यवस्था हवी. उदा. धर्म, कर्म, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय, विद्युत्, प्राण आदी व्यवस्था आहेत; म्हणून जगतात सूर्याने प्रकाश देण्यापासून अन्नपचन होणे इत्यादीपर्यंत व्यवहार होतो. लयही तितकाच महत्त्वाचा आहे. उदा. साधी तेल-वात जळत गेल्यानेच (लयामुळेच) ज्योत तेवत असते. थोडक्यात या तीनही गोष्टी नित्य चालू असतात.

हे सर्वकाही (पदार्थ, तसेच ऊर्जा), म्हणजे भगवंताची अपरा प्रकृती; मात्र येथे तूर्त केवळ लक्षात ठेवायची गोष्ट, म्हणजे अपरा प्रकृती म्हणजे भगवंत; परंतु भगवंत म्हणजे अपरा प्रकृती नव्हे. जिच्या आधारे हे सर्व आहे ते भगवंताचे श्रेष्ठ स्वरूप परा प्रकृती आहे. पुढे जाण्याआधी आणखी एक विवरण…

३ अ १. ब्रह्म आणि माया : येथे थोड्या अधिक परिचित संज्ञांकडे येऊ. परा प्रकृती, म्हणजे ब्रह्म आणि अनुभवाला येणारे/ जाणवणारे उर्वरित सर्वकाही माया. ब्रह्म सत् (अस्तित्व), चित् (चैतन्य) आणि आनंद स्वरूप आहे. माया ही ब्रह्माची उपाधी आहे. अर्थात् माया म्हणजे ब्रह्म नव्हे खरे; परंतु ब्रह्माखेरीज तिला अस्तित्व नाही.

प्रश्न : मग ब्रह्म यांचा संबंध नेमका काय ?

उत्तर : अपुर्‍या प्रकाशात वाटेत पडलेल्या रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. हा भ्रम रज्जू नसता, तर झालाच नसता. अशा दृष्टीने ‘उपाधी’ ही संज्ञा समजून घ्यावी. ती समजली की, ब्रह्म-माया संबंध स्पष्ट होतो.

डॉ. दुर्गेश सामंत

३ अ २. मायेमुळे काय होते ? : मायेच्या शक्ती २ प्रकारच्या आहेत.

अ. आवरण : या योगे माया सत्याची (ब्रह्माची) जाणीव होऊ देत नाही.

आ. विक्षेप : या योगे माया सत्याच्या जागी सत्याहून भिन्न भलतेच कशाची तरी जाणीव देते.

३ अ ३. परमात्म्यापासून जगत प्रकट होते : बर्‍याचदा देवाने सृष्टी निर्माण केली इत्यादी सहजतेने बोलले जाते. वर सांगितल्यानुसार गीताशास्त्र सांगते की, ‘जगताचे कारण ब्रह्म (परमात्मा) आहे; परंतु निर्माता नाही’, म्हणजे परमात्म्यापासून जगत प्रकट झाले आहे, जणू समुद्रात लाट असावी.

काही सांगतात की, जगाची निर्मिती ते सांगत असलेल्या देवाने केली. अमुक इतक्या दिवसात केली इत्यादी. येथे कर्ता आणि सामग्री भिन्न आहे. जसे मडके आणि कुंभार यांचे नाते असते. असे असेल, तर तो देव कुठे आहे, तर स्वर्गात ! तो आधी एकटाच होता, तर त्याने सामग्री कुठून आणली ? असो. पुढे जे मांडले जाणार, ते नीट समजण्यासाठी हे दिले आहे.

३ आ. जगत सच्चिदानंद स्वरूपच आहे ! : गीताशास्त्र सांगते की, ज्याच्यापासून (कारण) जे बनते (कार्य) त्यात ते (कारण) असतेच. स्फुरणापायी जगताच्या रूपाने सत्-चित्-आनंदस्वरूपी परमात्मा प्रकट झालेला आहे. परमात्म्याचे स्फुरण ही केवळ सच्चिदानंद स्वरूपीच असू शकते. याचे कारण तो परमात्मा केवळ तेच आहे. त्याचे स्वरूपच आनंद असले, तरी आपल्याला जगतासंबंधाने सुख-दु:ख, हवे-नको या जाणिवा असतात. असे का ?

४. दृष्टी म्हणजे काय ?

आपल्यासमोर काही येते, त्यासंबंधाने काही तरी फलित आपल्या अंत:करणामध्ये सिद्ध होत असते. मग तो विचार असेल, भावना इत्यादी काहीही असेल. वस्तूसापेक्ष हे जे वाटणे आहे, ती म्हणजे दृष्टी. कुणालाही त्याच्या दृष्टीनुसार सृष्टी समजते. मग त्यानुसार त्याचे कर्म होते. यासंबंधाने भगवंताची दृष्टी काय ? जीवाची काय ? हे आपण पुढच्या लेखात पाहू.

(क्रमश:)

॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२६)

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1027702.html

मनाच्या श्लोकांविषयीच्या लेखमालेतील भाग पाहण्यासाठी क्लिक करा →

भाग १ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक !

भाग २ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम !

भाग ३ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांमुळे मेंदूला चुकीच्या कृतीपासून वाचवण्यासाठी होणारा प्रयत्न !

भाग ४ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त !