आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांमुळे मेंदूला चुकीच्या कृतीपासून वाचवण्यासाठी होणारा प्रयत्न !

समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मनाच्या श्लोकाची जन्मकथा आणि मनाच्या श्लोकांमधील सूत्रांचे प्रकार’, यांविषयी वाचले. आज ‘आधुनिक विज्ञानशाखांच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकाच्या परिणामकारकतेची कारणे’ याचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग ३ )

भाग २  वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022765.html

३. आधुनिक विज्ञानशाखांच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकाच्या परिणामकारकतेची कारणे

आ २. विचारांत वाहून न जाता त्यांच्याकडे पहाणे शक्य होणे : बर्‍याचदा पूर्वीचे त्रासदायक प्रसंग, त्याच्याशी संबंधित व्यक्ती या सगळ्यांचा मेंदूवर (मनावर) एकप्रकारे असा संस्कार झालेला असतो की, मनात त्यासंबंधी काहीही निमित्त झाले, तरी काही वेळा सकृतदर्शी त्याच्याशी संबंधित काही झाले नसतांनाही मनात प्रतिक्रियात्मक विचार येतो, मनातील वेदना जागृत होते, मन भावनांचे रस देहात उसळतात, मन ती भावना आणि त्यातून निर्मित पुढचे विचार यांत वाहून जाते.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास विचारात ‘वाहून जाणे’ (Fusion), म्हणजे या सर्व विचारांना ‘सत्य’ मानून जसेच्या तसे स्वीकारणे असे आहे, तर विचारांना ‘पहाणे’ (Defusion), म्हणजे विचारांना केवळ मेंदूतील ‘डेटा’ मानणे, असे काहीसे आहे. वाहून जाण्याने भावनांचा वेग वाढतो आणि व्यक्तीकडून चुकीची कृती घडते. (उदाहरणार्थ रागाच्या भरात ओरडणे.) विचारांकडे पहाणे होते, तेव्हा केवळ त्या रागाची जाणीव होते; पण आपण काय कृती करायची, हे तेथे ठरवू शकत असतो. यामुळे विवेक हा गुण अंगी बाणणे सोपे बनते. उदाहरणार्थ जेव्हा विचार येतो, ‘अमुक माणसाने फसवले म्हणून मी अपयशी आहे’, तेव्हा सामान्यतः आपण त्या विचारात वाहून जातो; पण ‘मनाचे श्लोक’ आपल्याला शिकवतात, ‘हा विचार म्हणजे मी नाही, हे माझ्या मनाने निर्माण केलेले एक चित्र आहे.’ जेथे जेथे ‘मनाचे श्लोका’मध्ये ‘नको रे मना’ म्हणत काही सांगितले जाते, तेव्हा मनाला अयोग्य विचार येताच तेथेच अयोग्य दिशेने जाण्यापासून सावध केले जाते. अयोग्य भावनांपासून मन दूर होते. तो तो श्लोक त्यातील सूत्रानुसार मनाला थांबवून त्याला काय ‘नको’ आहे, हे पहायला लावतो. जेव्हा विचारांकडे त्रयस्थपणे पाहिले जाते, तेव्हा त्या विचारांची स्वतःवरची पकड ढिली होत असते. आपण योग्य आणि अयोग्य काय इत्यादी विचार करून पुढची कृती करते.

हे सर्व पुढील सारणीतून अधिक चांगले स्पष्ट होईल –

जेव्हा व्यक्ती अशा प्रकारे प्रक्रिया होऊन स्वत:ला योग्य काय ? अयोग्य काय ? हे सांगतो, त्याला आधुनिक मानसशास्त्रात ‘डिस्टन्स सेल्फ-टाक’ म्हणजे ‘दूरचे स्वगत’ म्हणतात. ‘रे मना’ किंवा ‘नको रे मना’ म्हणून मनाच्या श्लोकांद्वारे नेमकी हीच प्रक्रिया साधली जाते.

इ. मेंदूतील चुकीच्या दिशेने जाणार्‍या प्रोत्साहन व्यवस्थेला लगाम : माणसाने योग्य प्रकारे कसे वागावे, याचा उपदेश अनेक ग्रंथ करतात. त्यात तात्त्विक स्वरूपात काही सांगण्यात आलेले असते. त्याचा परिणाम आणि तेच सूत्र ‘मनाचे श्लोक’ पद्धतीने सांगून होणारा परिणाम भिन्न आहे. उदाहरणार्थ सामान्य तत्त्वज्ञान सांगते, ‘द्रव्याचा लोभ वाईट.’ येथे एक माहिती या प्रकारे हे तत्त्व बुद्धीला समजते; त्यामुळे त्याचा फारतर विचार होतो. काय लोभ आणि काय अलोभ यांसंबंधी पुढचे विचार चालू होऊ शकतात; मात्र येथे वर्तन अथवा मनाची जुनी धाव सहजतेने पालटत नाही. ती एकप्रकारे निष्क्रीयताच असते. असे का घडते ? याविषयी आधुनिक चेताशास्त्र याला ‘डोपामिन लूप’चे कार्य म्हणते.

डॉ. दुर्गेश सामंत

इ १. ‘डोपामिन लूप’ म्हणजे काय ? : चेताशास्त्रानुसार लोभ हा ‘डोपामिन लूप’ (Dopamine Loop) मुळे निर्माण होतो. ‘डोपामिन’ हे एक अंत:स्रावी रसायन मेंदूत सिद्ध होत असते. ते जितक्या अधिक प्रमाणात सिद्ध होईल, तेवढे आपल्याला चांगले वाटते. त्यामुळे एखादी वस्तू दिसली की, छान वाटते. तेथे त्या वस्तूविषयी काही पूर्वानुभवामुळे काही ‘डोपामिन’ मेंदूत निर्माण झालेले असते. काही कारणाने, म्हणजे अगदी ‘केवळ ती वस्तू मनात येणे’, यामुळे मेंदूत ‘डोपामिन’ परत निर्माण होते. मग ती वस्तू हवी वाटू लागते. येथे ती न मिळाल्यास ‘डोपामिन’ निर्माण होण्यास, त्याची अपेक्षित वाढ होण्यास बाधा आल्याने त्रास वाढतो, तर ती मिळण्याचा प्रयत्न केल्यास, म्हणजे अगदी मनोराज्यात गेल्याससुद्धा ‘डोपामिन’ अधिक प्रमाणात सिद्ध होते. हे एकप्रकारे स्वत:ला स्वत:च प्रोत्साहित करणारे चक्र आहे. याला ‘मेंदूची प्रोत्साहन व्यवस्था’ (रिवॉर्ड सिस्टम) म्हणू शकतो. येथे बाह्य विषयाप्रती माणसाच्या लोभाला आवर न घातल्यास साधनेत, तसेच एरव्ही हानी होत असते. ही हानी केवळ गद्य प्रकारे त्या माणसाला सांगून जो परिणाम होईल, त्यापेक्षा अधिक चांगला परिणाम ‘मनाचे श्लोक’ पद्धतीने होतो.

लोभ निर्माण करणारा विषय उदा. ‘दुसर्‍याचे धन’ हा विचार मनात येताच त्या दिशेने मेंदूची क्रिया जाते. मग दुसर्‍याचे धन घेणे चुकीचे कारण अमुक-तमुक इत्यादी गद्य प्रकारे आपण स्वत:ला कदाचित् सांगत; पण तेथे ते सहज स्वीकरले जाईल, असे नसते. आपण काही पळवाट काढत रहातो. तेच सूत्र ‘मनाचे श्लोका’मध्ये ‘नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।’ (मनाचे श्लोक, श्लोक ९)  अशा प्रकारे सांगितले जाते. ‘पूढिलांचे म्हणजे दुसर्‍यांचे’. येथे बुद्धीने, तर्काने न सांगता स्वत:ला वळण न घालता मनालाच वळण लावण्याचा प्रयत्न होतो. जो तुलनेने सहजतेने घडतो; कारण या लेखाच्या २७ मार्च २०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात सांगितल्याप्रमाणे ‘मी’ आणि माझे मन यांत अंतर निर्माण होऊन त्रयस्थपणे सांगितले जात असते. मन मग त्या दिशेने सक्रीय रहाण्याचा प्रयत्न करते. अगदीच आरंभीच मनाला श्लोक बजावून सांगतो, ‘दुसर्‍याचे द्रव्य घ्यावे, असे वाटणे चुकीचे आहे.’ ज्यामुळे मेंदूतील चुकीच्या दिशेने जाऊ कार्यान्वित होणार्‍या प्रोत्साहन व्यवस्थेवर (रिवॉर्ड सिस्टम) नियंत्रण मिळवता येते.

ई. पाठांतरामुळे मेंदूची लवचिकता (न्यूरोप्लास्टिसिटी) वाढणे : ‘मनाचे श्लोक’ पाठ करण्यास सांगितले जाते. असे केल्याने मन त्यातील विचारांना अधिकाधिक अनुकूल बनत जाते; कारण मनाच्या श्लोकांचा परत परत म्हणण्याने मेंदूवरही एक विशेष परिणाम होतो. मेंदूच्या पेशींची एकमेकांशी संवेदनांची देवाण-घेवाण करणारी जोडणी पालटते. परत परत पाठांतराने ती बळकट बनते. याला ‘न्यूरोप्लास्टीसिटी’ म्हणतात. संबंधित विचार अथवा प्रसंग घडताच न कळतच मन श्लोकात दिलेल्या विचारांना अनुकूल असलेल्या मार्गाने मेंदू तर्काने, विचाराने प्रयत्न न करता सहजतेने आपोआप कार्यान्वित होतो. मेंदूला चुकीच्या कृतीपासून वाचवण्याचा प्रयत्न सहजतेने होतो. साधनेतून लक्ष विचलित होण्याचे प्रमाण न्यून होते.

उ. भयाला मेंदूचा ताबा न मिळता त्याच्यासाठी सुरक्षित जागेची (‘सेफ स्पेस’ची) निर्मिती : एखादी परिस्थिती भीती निर्माण करते, तेव्हा सामान्यत: तिचा मेंदूवर असा प्रभाव पडतो की, मेंदूच्या सर्व क्रिया त्या दिशेने जातात. याला मेंदू ‘हायजॅक’ होणे (ताब्यात घेतला जाणे) म्हणतात. एखादे भय काही कारणाने निर्माण होत असेल, तर त्याला उत्तर ‘सुरक्षितपणाची जाणीव मनात निर्माण होणे’, हे आहे. सामान्यत: मग ‘ते भय अनाठायी कसे आहे’, इथपासून ‘तसे यदाकदाचित झालेच, तर अमुक करता येईल’, इत्यादी प्रकारे मनाचे प्रबोधन केले जाते, म्हणजेच पर्यायी विचार बाहेरून दिला जात असतो. असे सगळे झाले, तरी तीही एक प्रक्रिया आहे, जेथे भीतीच्या विचाराला आणि सोबतच्या भावनेला उत्तर हे सुरक्षेच्या विचाराने प्रयत्नपूर्वक दिले जाऊन उपाय होणे अपेक्षित असते.

हे सर्व बुद्धीच्या आणि तर्काच्या स्तरावर घडते. भयनिर्मिती आणि तत्क्षणी उपाय असे तेथे नाही. ना त्या भयाच्या विचाराच्या पाठीशी राहून त्याचा प्रभाव वाढवणार्‍या भावना ऊर्जेला आवर घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे निर्मित भय स्वतःचा काही प्रभाव मेंदूवर गाजवतेच. त्याचे काही दुष्परिणाम होतात. मनाच्या श्लोकांचे तंत्र वेगळ्या प्रकारे या समस्येला हाताळते. मनाच्या श्लोकात तेथेच मनाला ‘राघवाचा’ आधार लगेच मिळतो. मनाला सुरक्षिततेची भावना मिळते आणि भीतीचा प्रभाव न्यून होतो.

मानसशास्त्रात याला ‘अटॅचमेंट थिअरी’ म्हणतात. जेव्हा मन एका शक्तीशाली आणि प्रेमळ आधाराशी (जसे की राम) जोडले जाते, तेव्हा मेंदूतील भीतीची केंद्रे शांत होतात. येथे लक्षात घ्यायचे सूत्र असे की, ‘केवळ भीती सोडा’, असे सांगणे नाही, तर भीती घालवण्यासाठी मेंदूला एक ‘पर्याय’ तेथे निर्माण होतो. ‘नुपेक्षी कदा रामदासाभिमानी’, ‘नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानि’, ‘मना सज्जना राघवी वस्ति कीजे’ इत्यादी प्रकारची सूत्रे काही प्रकारच्या श्लोकांच्या अंती येतात. ते श्लोक पहावेत.

(क्रमशः)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२६)

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024047.html