आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त !

समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ याची विशेष करून या साहित्यकृतीमध्ये उपदेशाची जी पद्धत अंगीकारण्यात आली आहे, त्याविषयी पहाणार आहोत. या श्लोकाच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मनाच्या श्लोकाची जन्मकथा आणि मनाच्या श्लोकांमधील सूत्रांचे प्रकार’, यांविषयी वाचले. आज ‘आधुनिक विज्ञानशाखांच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकाच्या परिणामकारकतेची कारणे’ याचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भाग ४ 

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1023229.html

३. आधुनिक विज्ञानशाखांच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकाच्या परिणामकारकतेची कारणे

ऊ. मनाला त्रास न देता दिशा देणे : मनाच्या श्लोकांचे एक सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य, म्हणजे ‘त्यात मनाला तू चुकीचा, पापी, हीन, त्याज्य आहेस’, असे त्रास देणारे करण्यात आलेले नाही. याउलट ‘मन प्रोत्साहित होईल आणि सांगितलेले सहजतेने स्वीकारले जाईल’, असे प्रेमाने संबोधले आहे. अनेक ठिकाणी मनाला ‘मना सज्जना’, असे म्हटले आहे. त्याच्याशी एक जीवलग मित्र असा संवाद आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने मनाला शिकवण्याच्या ढोबळपणे २ पद्धती होतात.

डॉ. दुर्गेश सामंत

ऊ १. त्रास करून शिकवणे (Punitive approach / Self-Criticism) : जेव्हा आपण स्वतःला ‘मी पापी आहे’, ‘मी चुकीचा आहे’ किंवा ‘मी निरुपयोगी आहे’, असे म्हणतो, तेव्हा त्याला मानसशास्त्रात ‘पॅथॉलॉजिकल क्रिटिक’ (Pathological Critic किंवा स्वतःला अयोग्य त्रास करून घेणे) असे म्हणतात. याचा आपल्यावर अयोग्य परिणाम होतो. जेव्हा आपण स्वतःवर टीका करतो, तेव्हा मेंदूतील ‘अमिगडाला’ (भीतीचे केंद्र) सक्रीय होतो. यामुळे शरिरात ‘कोर्टिसोल’ (ताणाशी संबंधित अंत:स्राव) वाढते. यामुळे तात्पुरती भीती निर्माण होऊन माणूस कदाचित् वाईट वागणे थांबवेल; पण त्याच्या मनात न्यूनगंड, नैराश्य आणि स्वद्वेष निर्माण होतो. असे दीर्घकाळ चालू राहिले, तर यामुळे मनाची प्रगती आणि विकास खुंटतो.

ऊ २. विवेकाने आणि प्रेमाने शिकवणे (Self-Compassion & Cognitive Reappraisal) : मनाच्या श्लोकांतील पद्धत ही स्वकरुणा ‘सेल्फ-कम्पॅशन’ आणि ‘विवेक’ यांवर आधारित आहे. मनाला ‘रे मना’ किंवा ‘हे जीवा’ असे संबोधन एका आईने किंवा प्रेमळ व्यक्तीने बाळाला अथवा मित्राने मित्राला समजावण्यासारखे आहे. जेव्हा आपण चुका मान्य करून त्या सुधारण्यासाठी स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा मेंदूचा ‘प्री-फ्रंटल कॉर्टेक्स’ (तर्काचा भाग) सक्रीय होतो. यामुळे आपण शांतपणे विचार करू शकतो. यात भीती नसते, तर ‘जाणीव’ असते. यामुळे माणूस स्वतःचा तिरस्कार न करता स्वतःला पालटण्यासाठी प्रवृत्त होतो. मानसशास्त्राच्या मते ‘विवेकाने आणि प्रेमाने (Non-punitive approach ) शिकवण्याची पद्धत सर्वोत्तम आहे.’ त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत –

अ. मानसशास्त्रीय युक्ती : जेव्हा आपण एखाद्याला ‘चांगले’ म्हणतो, तेव्हा ती व्यक्ती (किंवा स्वतःचे मन) त्या चांगुलपणाला जागे करण्यासाठी प्रयत्न करू लागते. याला ‘पायग्मॅलिअन इफेक्ट’ (Pygmalion Effect) म्हणतात.

थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘मनाचे श्लोक हे मनाला शिक्षा देणारे ‘मॅन्युअल’ (माहिती पुस्तिका) नसून ते मनाला स्वतःच्या खर्‍या स्वरूपाची ओळख करून देणारे ‘आरोग्यशास्त्र’ आहे.’ आधुनिक मानसशास्त्रही आता हेच सांगते, ‘स्वतःवर कठोर टीका करण्यापेक्षा ‘स्व-संवाद’ (Self-Talk) हा पालट करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे.’

आ. सुधारण्याची इच्छाशक्ती मजबूत बनणे : एका अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक स्वतःला पापी किंवा अपराधी मानून स्वतःला त्रास देत रहातात, ते पुन:पुन्हा त्याच चुका करतात (याला ‘What-the-Hell Effect’ किंवा ‘मला काय त्याचे, व्हायचे ते होऊ देत’, असे म्हणतात). याउलट जे स्वतःला क्षमा करून विवेकाने सुधारण्याचा प्रयत्न करतात, त्यांची इच्छाशक्ती अधिक मजबूत असते. समर्थ रामदासस्वामी मनाला अपराधी ठरवत नाहीत, तर त्याला ‘बोध’ देतात. ‘तू हे चुकीचे करत आहेस’, असे म्हणणे आणि ‘तू चुकीचा आहेस’, असे म्हणणे, यांतील भेद समर्थांना अचूक ठाऊक होता, असे म्हणावे लागते.

इ. मनोविकासाला अनुकूल पद्धत : जर आपण मनाला ‘निरुपयोगी’ किंवा ‘पापी’ म्हटले, तर मेंदू ‘फिक्स्ड माईंडसेट’मध्ये (बंद मनोधारणेमध्ये) जातो, म्हणजे ‘मी असाच आहे, मी पालटू शकत नाही’; पण जेव्हा आपण विवेकाने संवाद साधतो, तेव्हा ‘ग्रोथ माईंडसेट’ (विकसनप्रवण मनोधारणा) सिद्ध होतो. प्रत्येक श्लोक मनाला प्रगतीकडे  (Growth) नेणारा आहे.

काही आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रे किंवा पद्धती यांच्याविषयीचे संशोधन विदेशात होऊन मानसोपचारतज्ञ त्या पद्धती रुग्णावर उपचार करण्यासाठी वापरतात. मनाच्या श्लोकांतून स्पष्ट होत असलेली या आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रांना समांतर अशी काही सूत्रे या लेखात स्पष्ट केली आहेत. भले कुणाला ईश्वरप्राप्ती इत्यादी ध्येये चुकीची वाटत असतील, त्यामुळे त्यांना ‘मनाचे श्लोक’सारख्या साहित्यकृती अनावश्यकही वाटत असतील; परंतु येथे एक गोष्ट तरी समजून घ्यावी. ती म्हणजे ‘योग्य दिशेने स्वपरिवर्तन यासाठी जीवन आहे, तसे केले, तर जीवनात काही विकास आहे.’ मनाचे श्लोक दिशाही देतात, सोपे आणि जमतील असे प्रयत्न घडवून आणतात.

४. साधनेच्या दृष्टीतून महत्त्व

मनाच्या श्लोकांचे या लेखमालेत दिलेले विवरण प्राधान्याने सामान्य व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून केले आहे. साधक म्हणजे जो ईश्वरप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत आहे असा किंवा जिज्ञासू. साधकाला त्याच्या ध्येयानुरूप समस्यांचे निराकरण होणे अपेक्षित असते. तो सामान्यांपेक्षा समस्यांच्या संबंधाने अधिक संवेदनशील असतो. त्याचे ध्येय पुष्कळ पुढचे असते. मनाच्या श्लोकांचे वैशिष्ट्य असे की, ते अगदी ज्ञानप्राप्तीसाठी सर्वसंग परित्याग करून बाहेर पडलेल्या संन्याशांसाठीसुद्धा उपयुक्त आहेत. किंबहुना मनाच्या श्लोकांची जन्मकथा पाहिली, तर अशांनीच ते प्रथम समाजात म्हटले आहेत, हे लक्षात येईल.

अशांच्या साधनासापेक्ष आवश्यकताही हे श्लोक पूर्ण करतात. अर्थात् यासाठी या श्लोकांचा अधिक सखोल अभ्यास करायला हवा. तो केला, तर लक्षात येईल की, अनेक ग्रंथांमधून जे तात्त्विक विवरण केले आहे, ते प्रत्यक्षात अंगी बाणवायची, ही सोपी साहित्यिक  कृती आहे. ३५० वर्षांपूर्वी समर्थ रामदासस्वामी यांनी मराठी जनमानसाला दिलेला हा वारसा आजच्या जागतिक विज्ञानाच्या कसोटीवरही तितकाच खरा उतरतो, याचा अर्थ त्यात दिलेली दिशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या (ब्रह्म), सर्व विश्व चालवणार्‍या व्यवस्थेला (धर्म / ईश्वर) अनुकूल आहे, हे लक्षात घ्यावे. अर्थात् अनेक संतांनी मनाला आणि जीवाला उद्देशून अशा प्रकारच्या साहित्यकृती केल्या आहेत. अगदी अलीकडील उदाहरण, म्हणजे प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘असे घोर प्रारब्ध पूर्वांतरीचे । तरी भोगण्या जीवा का न रूचे ॥’ हे भजन मला व्यक्तीशः हे कधीही कानावर पडले, तरी मनाच्या श्लोकांचे स्मरण झाल्याखेरीज रहात नाही !

(समाप्त)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२६)