दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘मनाचे श्लोका’विषयीची लेखमाला २६ मार्च ते २८ मार्च आणि ३० मार्च या दिवशी या काळात ४ भागांत प्रसिद्ध झाली आहे. या लेखासंबंधाने अनेक साधक आणि वाचक यांनी या ना त्या प्रकारे तो आवडल्याचे सांगितले. त्यासाठी कृतज्ञता ! यासह काही जणांकडून विचारणाही झाली. ती सूत्रे आणि संबंधित विवरण पुढे देत आहे.
६ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मनाच्या श्लोकांचा साधनेत वापर आणि ईशचिंतनाचा मेंदूवर परिणाम’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026660.html
कर्म आणि दृष्टी
सूत्र : ‘मनाचे श्लोक’ ५७ मधील तिसरा चरण आणि गीतेतील अध्याय ९ मधील ९ वा श्लोक यांवर निरुपण सांगावे.
उत्तर :
१. ‘मनाचे श्लोक’संबंधीचे निरूपण
१ अ. मूळ श्लोक :
जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ।।
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ – मनाचे श्लोक, श्लोक ५७
१ आ. विवरण :
१ आ १. पार्श्वभूमी : श्लोक क्र. ५७ च्या आधी काही श्लोकांमधून ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ म्हणत आदर्श पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. ती आपल्यात यावीत, तर साधकाने काय करावे (कर्म), यासाठी पुढचे काही श्लोक येतात. त्यात प्रथम असलेला श्लोक ५७ एखाद्या मथळ्याप्रमाणे आहे. जीवनात भगवंताचे नाम घ्यावे, घेत भक्ती-उपासना करावी, असे सांगून झाल्यावर वर उल्लेखित चरण येतो.

२. तिसरा चरण
हा वर अधोरेखित असून तो प्रपंचात कसे जगायचे, हे सांगण्यासाठी येतो. प्रपंच उदासीनतेने करावा, ही सारदृष्टी या चरणात सांगितली आहे. उदासीनता, म्हणजे अलिप्तता, अनासक्ती, तटस्थता. प्रापंचिक दायित्व सांभाळतांना कर्मे करावीच लागतात, तसेच सुख-दु:खे अनिवार्य आहेत. अनासक्त असणे, म्हणजे मनात हवे-नकोची ओढ नसणे. ओढ आहे कि नाही, कसे ओळखायचे ? सुखदायक वस्तू दूर गेली, तर ती काही करून मला हवीच, हा आग्रह अथवा ती नसल्याविषयी दु:ख नसावे. अन्य काही दु:ख वाट्याला आलेच, तर त्याविषयी अप्रसन्नता मनात नसावी. अशी आंतरिक तटस्थता, म्हणजे येथे उदासीनता. जेव्हा प्रपंच भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे आणि प्रपंचाच्या प्राप्तीसाठी भगवंत नाही, असे होते, तेव्हा तटस्थता येते (ते व्हावे यासाठी श्लोकाचे पहिले २ चरण दिशा देत आहेत). येथे प्रपंचाचा उपयोग अंत:करण शुद्धीसाठी करणे अपेक्षित आहे. आंतरिक तटस्थता नसेल, तर असलेले प्रपंचाच्या माध्यमातून संसारबंधनात टाकणारे संस्कार दृढ बनत असतात.
उलट उदासीनता असेल, तर वृत्ती सदा सर्वदा मोकळी रहाते. ही वृत्ती म्हणजे प्रपंचातील जे समोर येते त्यासंबंधीचा अंत:करणातील प्रतिसाद. समोर काही आहे, हे समजणे ही एक वृत्ती, तर त्याच्या प्रती उमटणारा प्रतिसाद ही दुसरी वृत्ती. या दुसर्या वृत्तीला ‘फलव्याप्ती’ म्हणतात. वस्तू पाहिली की, ती हवीशी वाटणे किंवा नकोशी वाटणे, हा तटस्थ प्रतिसाद नव्हे. अशी वृत्ती पुढचे कर्म करायला भाग पाडते. मग वृत्ती एकप्रकारे गुंतून जाते. ‘उदासीनता’ साधू लागल्यावर हा प्रतिसाद जेवढा आवश्यक तेवढाच असतो. मग वृत्ती त्यात गुंतत नाही. मोकळी रहाते. उदाहरणार्थ येथे पैसा हे केवळ वस्तू जीवनातील गरजा भागवण्यासाठीचे साधन असते. पैसा म्हणजे सुरक्षितता असत नाही. प्रपंचासाठी देव असेल, तर पैसे यावेत, त्यातून सुरक्षितता मिळेल ही समजूत असते, अधिकाधिक संपत्तीची ओढ लागते, तर देवासाठी प्रपंच असेल अन् सुरक्षितता देवाच्या अधीन आणि पैसा गरजेसाठी असे होते.
या तिसर्या चरणातून तत्त्वतः शब्द प्रपंचात कर्म करतांना मूलभूत विचार कोणता असावा, यासाठी आहे. कोणताही अशा प्रकारचा उपदेश काही मूलभूत तत्त्व किंवा सत्यावर आधारित असतो. जसे ‘देवाचे नाम घ्या’, असे सांगितले जाते, ते ‘देव हे सत्य आहे’ म्हणून. त्याचप्रमाणे प्रपंचात उदासीनच असायला हवे, हे एक तत्त्वच आहे. मूलभूत सत्य आणि त्यावर आधारित उपदेश दोन्ही समजले, तर साधनेला मोठे साहाय्य होते. समर्थ रामदासस्वामी यांचा वर उल्लेखित उपदेश कोणत्या दर्शनावर (तत्त्वज्ञानावर/ सिद्धांतांवर) आधारित आहे, हे समजण्यासाठी गीतेतील अध्याय ९ मधील श्लोक ९ उपयोगी आहे. त्या श्लोकाकडे जाण्याआधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ.

३. गीतेतील अध्याय ९ ची पार्श्वभूमी
गीतेतील अध्याय ७ ते १२ मध्ये प्रामुख्याने ‘ईश्वर’ या विषयासंबंधी विवरण आहे. ७ व्या अध्यायात भगवंताने स्वत:चे स्वरूप दोन प्रकारचे, म्हणजे ‘अपरा प्रकृती’ आणि ‘परा प्रकृती’ असल्याचे म्हटले आहे. अपरा प्रकृतीमध्ये जगतातील वस्तू, त्यातील व्यवस्था (गुरुत्वाकर्षण ते आपल्या पोटातील अन्न पचन होणे इत्यादीपर्यंत सर्व काही) सर्व येते. परा प्रकृती म्हणजे ब्रह्म. अर्थातच परमात्म्याचे परा प्रकृती स्वरूप हे श्रेष्ठ आहे. ८ व्या अध्यायात भगवंताने सकाम पुण्यकर्म करून स्वर्गादी लोकांची प्राप्ती, क्रममुक्ती (म्हणजे ब्रह्मलोकाची प्राप्ती आणि त्यानंतर तेथे ज्ञान प्राप्ती करून ब्रह्मदेवाच्या अंताला त्या जीवालाही मुक्ती) आदींविषयी विवरण केले. शेवटी सांगितले, ‘काही झाले, तरी जीवाला स्वरूपज्ञानाविना मुक्ती नाही.’
अध्याय ९ च्या प्रारंभीलाच भगवंताने ‘मी आता जे सांगणार आहे, त्याने तात्काळ मुक्ती साध्य होते, असे अतिगुह्य, तसेच सर्व प्रकारच्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ असे ज्ञान सांगेन’, असे म्हणत प्रारंभ केला. या अध्यायाचे नावच ‘राजविद्या-राजगुह्ययोग’ आहे. त्यातील आपल्याला पहावयाच्या ९ व्या श्लोकाविषयी पुढच्या लेखात पाहू.
(क्रमश:)
॥ गुरुचरणार्पणमस्तु ॥
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०२६)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1027294.html
| मनाच्या श्लोकांविषयीच्या लेखमालेतील भाग पाहण्यासाठी क्लिक करा →
भाग १ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक ! भाग २ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम ! भाग ४ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त ! |

‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !