समर्थ रामदासस्वामी लिहिलेल्या ‘मनाचे श्लोका’च्या विशेष करून या साहित्यकृतीमध्ये उपदेशाची जी पद्धत अंगीकारण्यात आली आहे, त्याविषयी पहाणार आहोत. या श्लोकाच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. २६ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मनाच्या श्लोकाची जन्मकथा आणि मनाच्या श्लोकांमधील सूत्रांचे प्रकार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022522.html

३. आधुनिक विज्ञानशाखांच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकाच्या परिणामकारकतेची कारणे
हा भाग समजण्यासाठी काही मूलभूत सूत्रे समजून घेऊया. भीती, तणाव यांमुळे शरीर, मेंदू आणि मन यांवर होणारे परिणाम समजण्यासाठी पुढे मेंदूच्या काही भागांचा उल्लेख केला आहे. ते भाग कुठे आहेत, हे समजण्यासाठी आकृती दिली आहे. तणावनिर्मिती आणि तणावमुक्ती यांच्या संबंधाने मेंदूत होणार्या संवेदनांच्या देवाणघेवाणीचा क्रम सामान्यपणे पुढीलप्रमाणे असतो –
तणावनिर्मिती : ‘अमिग्डाला’ (उत्तेजित) > हायपोथॅलामस > पिट्यूटरी ग्रंथी > अंतस्राव निर्मिती
तणावमुक्ती मार्ग : ‘प्री-फ्रंटल कॉर्टेक्स’ > ‘अमिग्डाला’ (शांत होणे)
‘डायपोथालामस’, ‘हिप्पोकँपस’ आणि ‘अमिग्डाला’ यांची मिळून ‘लिंबीक सिस्टम’ बनते.
तणावनिर्मिती संवेदनांचे वहन तणावमुक्तीशी संबंधित संवेदनावहनापेक्षा मूलत: अधिक वेगवान असतात. त्यामुळे सामान्यतः राग येणे चुकीचे आहे, हे ठाऊक असूनही राग कधी आला, ते त्याला समजत नाही. तणावनिर्मिती प्रक्रिया कार्यान्वित होण्यासाठी एका सेकंदाचा २० वा भाग इतक्या वेळाचे ज्ञानेंद्रिय अथवा विचार यांच्याकडून आलेले उद्दिपन पुरते. तणावमुक्ती मार्ग प्रभावी बनण्यासाठी ‘प्री-फ्रंटल कॉर्टेक्स’ बळकट बनावे लागते.

अ. गेयतापूर्ण आणि तणाव दूर करणारी रचना : ‘मनाचे श्लोक’ मोठ्या आवाजात म्हणू लागले, तर त्यातील गेयता ठळकपणे समोर येते. म्हणणारा व्यक्ती आपोआपच ते विशिष्ट लयीत सहजतेने म्हणू लागतो. इतरांनाही ते ऐकावेसे वाटतात आणि म्हणणार्यालाही ते चांगले वाटत असते. अर्थात् अद्याप याचा अनुभव कुणी घेतला नसेल, तर काही वेळा श्लोक म्हणून पहावेत. हे जे चांगले वाटणे आहे, त्याला उत्तरदायी आहे त्याची अंगभूत गेयता. त्याला उत्तरदायी आहे श्लोकाची रचना. हे श्लोक ‘भुजंगप्रयात’ या वृत्तामध्ये आहेत. वृत्त हा व्याकरणातील विषय आहे. पद्यातील एखाद्या ओळीतील, शब्दांतील कोणती अक्षरे लघु आणि कोणते गुरु (थोडे दीर्घ स्वरात) उच्चारावी लागतात, त्यानुसार त्या त्या अक्षराला १ किंवा २ वृत्त अशी संख्या देण्यात येते. एका ओळीतील अक्षर संख्या जेव्हा १२ होते, तेव्हा ते ‘भुजंगप्रयात’ वृत्त. अर्थात् येथे त्याचे पुष्कळ विवरण न करता पुढे जाऊया.
अ १. गेयता मेंदूतील तणाव न्यून करते : मुख्य सूत्र हे की, ‘भुजंगप्रयात’ या वृत्तातील रचना म्हटल्यास गेयतेमुळे मेंदूतील तणाव न्यून होतो, हे चेताशास्त्राच्या दृष्टीने स्पष्ट झाले आहे. चेताशास्त्र सांगते की, त्यातील गेयता मेंदूच्या विशिष्ट भागाला चेतते. मग त्यातून निर्मित संवेदनाचे मेंदूतील विविध भागांकडे जाणारे संदेशवहन गुणात्मक रितीने असे पालटते की, त्यामुळे तणाव न्यून होतो. थोडक्यात मनाचे श्लोक म्हटल्याने चांगले वाटत असेल, तर त्याचे एक कारण अशा प्रकारे जैविक आहे. जेथे कार्यकारणभाव जैविक आहे, तर त्याची उपयुक्तता केवळ व्यक्तीसापेक्ष रहात नाही. उदाहरणार्थ तणाव दूर करणारे औषध व्यक्ती पुरुष कि स्त्री, काळा कि गोरा इत्यादी प्रकारचे भेद करत नाही. तिचा मेंदूवरील परिणाम सरसकट एकच असतो.

अ २. लयीमुळे पद्य म्हणून त्यातील बोध सहज रुजणे : एखाद्या वचनात गेयता असल्याने ते परत परत गुणगुणले जाण्याची आणि पाठ होण्याची शक्यता वाढते. मनाच्या श्लोकातील २०५ श्लोक या वृत्तामध्ये आहेत. गेयतेचा लाभ आणखीही काही आहे. सर्वसाधारणपणे एखादे सूत्र गद्य प्रकारे वाचतो वा ऐकतो, तेव्हा त्यासंबंधी मेंदूत होणारी प्रक्रिया त्याचा अर्थ समजून घेतला जाणे, त्याचा बोध होणे, अशी होत होत कालावकाशाने ते सूत्र मनात रुजते. जेव्हा एखादे सूत्र पद्य प्रकारे चांगल्या लयीत म्हटले वा ऐकले जाते, तेव्हा मधले टप्पे वगळत ते थेट रुजण्याकडे जाऊ लागते. त्याचा अर्थ नंतर ज्याच्या त्याच्या जिज्ञासूपणानुसार उलगडत जातो. गेयतेमुळे होणारी प्रक्रिया त्यामुळे लाभकारी ठरते. चांगले काय ते आधीच आत सामावून घेतले जाते. बर्याच जणांना प्रसिद्ध गीतांमधील प्रत्येक शब्द ठाऊक नसतो; परंतु त्यांची लय त्यांच्या मनात बसलेली असते. याचे कारण लय शब्दार्थाहून अधिक परिणाम करते. अर्थात् शब्द आणि त्यांचा अर्थ नेमकेपणाने ठाऊक असेल, तर अधिक उत्तम, हे सांगणे न लगे.
अ ३. ‘भुजंगप्रयात’ वृत्तामध्ये ठराविक अंतराने विराम येत असतो. त्यामुळे लयबद्धता येते. लयबद्ध पठणामुळे ‘वॅगस नर्व्ह’ (एक प्रमुख चेतानाडी) उद्दिपित होते, ज्यामुळे हृदयगती नियंत्रित रहाते आणि शांतता मिळते. लयबद्ध पठणामुळे श्वासाची गती आपोआप संथ आणि लयबद्ध होते, ज्याचा सकारात्मक परिणाम मज्जासंस्थेवर होतो.
आ. मनाला संबोधन हे मनाच्या श्लोकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ! : मनाच्या श्लोकांचे कुणालाही लक्षात येऊ शकणारे असे वैशिष्ट्य, म्हणजे ते मनाला उद्देशून आहेत, कुणा व्यक्तीला उद्देशून नाही. त्यात ‘रे मना’ असे आहे, ‘जनहो’ असे नाही. हा भेद येथे अभिप्रेत आहे. जेव्हा ते एखादा म्हणत असतो, तेव्हा तो स्वत:च्या मनाला विशिष्ट प्रकारे संबोधत असतो. स्वतःच्या मनाला त्याचा स्पष्ट उल्लेख करून त्रयस्थपणे संबोधत मनात पालट घडवून आणणे, हे एक तंत्र आहे. आधुनिक मानसशास्त्रात या तंत्राचा अभ्यास करण्यात येतो. त्या दृष्टीने मनाच्या श्लोकांकडे आता आपण पाहू.
आ १. ‘मी’ आणि माझे ‘मन’ यांत अंतर निर्माण करणारे ‘कॉग्निटीव्ह डिफ्युजन’ तंत्र : आधुनिक मानसशास्त्र सांगते की, मी आणि माझे मन यांत अंतर निर्माण केल्याने समस्यांचे आपल्याला भावणारे स्वरूप पालटते. आजच्या काळात तणाव आणि चिंता (Anxiety) वाढण्याचे मुख्य कारण, म्हणजे आपण स्वतःला स्वतःच्या विचारांशी पूर्णपणे जोडून घेतो. उदा. ‘मला भीती वाटते’, असे म्हणतांना आपण भीतीशी एकरूप होतो. जेव्हा मनाला उद्देशून तेच सूत्र सांगतो, तेव्हा मेंदूतील वातावरण (संवेदना) पालटते. मानसशास्त्रात याला ‘सोलोमनचा विरोधाभास’ म्हणतात. आपण स्वतःच्या समस्या सोडवण्यापेक्षा दुसर्याला सल्ला देण्यात अधिक हुशार असतो. जेव्हा आपण ‘रे मना’ म्हणतो, तेव्हा आपण स्वतःलाच ‘दुसरी व्यक्ती’ मानतो. यामुळे स्वतःचा मेंदू ‘सल्लागार’ भूमिकेत जातो. ‘मला भीती वाटत आहे’, असे म्हटल्यावर मेंदूच्या भीतीचे किंवा ताणाचे केंद्र (‘अमिग्डा’ला) अधिक सक्रीय होते, तर आपण मनाला ‘रे मना’ म्हटल्यावर अन्य कुणाला तरी म्हटल्यासारखे होते. ‘रे मना’ किंवा गद्यात म्हणायचे झाल्यास ‘मना, तू का घाबरत आहेस ?’, असे म्हटल्यावर मेंदूचा ‘प्री-फ्रंटल कॉर्टेक्स’ (तर्क करणारा भाग) सक्रीय होतो. हा भाग मेंदूतील भीतीचे केंद्र शांत करतो. (या प्रक्रियेच्या, म्हणजेच एकूण ताण आणि मेंदूवर, तसेच त्यामुळे शरिरावर होणारे परिणाम यांविषयी जिज्ञासूंनी पूर्वी २२ डिसेंबर २०२५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचावा.लेख पाहण्यासाठी क्लिक करा → आरोग्यदायी मन:स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक !) एका संशोधकाला प्रयोगात असे दिसले की, स्वतःचे नाव घेऊन किंवा ‘तू’ म्हणून (म्हणजेच त्रयस्थाप्रमाणे – तृतीय पुरुषी एकवचनी) स्वतःशी संवाद साधणार्या लोकांचा रक्तदाब आणि ताण तेच ‘मी’ म्हणत (प्रथम पुरुष एकवचनी प्रकारे) म्हणणार्यांपेक्षा पुष्कळ न्यून असतो.
मनाचे श्लोक अन्य साधारण परिचित अशा प्रकारच्या साधारणपणे परिचित ‘धार्मिक’ ग्रंथांच्या तुलनेत इथेच वेगळे ठरतात. ते मनाला ‘दुसरे’ मानून त्याच्याशी संवाद साधतात. जेव्हा आपण मनाला ‘मना’ म्हणून हाक मारतो, तेव्हा आपला मेंदू त्या विचारांपासून अलिप्त होतो आणि आपण त्या विचारांचे गुलाम न रहाता ‘साक्षी’ बनतो. भीतीपासून स्वत:ला वेगळे करतो. आधुनिक मानसशास्त्रात याला ‘कॉग्निटीव्ह डिफ्युजन’ असे म्हणतात. दुसर्या बाजूला वेदांतामध्ये मनोमय कोष (म्हणजे मन), म्हणजे ‘मी’ नाही, हे सत्यच तात्त्विक दृष्टीने सांगितले जाते, याचीही नोंद घ्यावी. साधक कोणत्याही मार्गाने साधना करणारा का असेना, त्याला कुठेतरी हेच साध्य करायचे असते. अर्थात् हे विवरण अन्य धार्मिक ग्रंथांना न्यून लेखणे नसून केवळ भेद सांगण्यासाठी आहे. त्या त्या प्रकारच्या साहित्यकृतींचे एकूण साधनेच्या दृष्टीने स्वत:ची स्थाने आहेत आणि ती सर्व महत्त्वाची आहेत. समर्थांच्या लिखाणाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास साधकासाठी ‘दासबोधा’चे स्थान वेगळे अणि ‘मनाच्या श्लोकां’चे वेगळे. साधकासाठी मनाचे श्लोक किंवा त्यातील काही तत्त्वनिर्देशक भाग चांगले समजण्यासाठी दासबोध आवश्यक !
(क्रमशः)
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२६)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1023229.html
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !