आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक !

आज ‘समर्थ रामदासस्वामी जयंती’ आहे.

त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

समर्थ रामदासस्वामी

१. जन्मकथा

एके वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून श्रीरामनवमीच्या उत्सवासाठी सज्जनगडावर येणारा शिधा काही कारणाने येऊ शकत नव्हता. उत्सवाला ७ दिवस उरले होते. गडावरील उत्सवाचे नियोजन करणारी मंडळी हवालदिल झाली. त्यांनी समर्थ रामदासस्वामी यांना स्थिती सांगितली. त्यांनी लगेच काही श्लोक लिहिले आणि सांगितले, ‘गडावरील सेवेकर्‍यांनी खाली समाजात जाऊन प्रत्येक घरासमोर उभे राहून ते म्हणावेत. देतील ती भिक्षा घेऊन यावी.’ झाले प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला गेला. अल्पावधीत शिधा जमा झाला. कार्यक्रम नेहमीप्रमाणे झाला. ते श्लोक म्हणजे मनाचे श्लोक ! अर्थात् या लेखाचा मुख्य उद्देश ही जन्मकथा सांगणे, हा नाही. येथे विशेष करून या साहित्यकृतीमध्ये उपदेशाची जी पद्धत अंगीकारण्यात आली आहे, त्याविषयी पहाणार आहोत.

१ अ. मनाच्या श्लोकांची २ ठळक वैशिष्ट्ये : ज्याने कधी मनाचे श्लोक भले सर्वच्या सर्व नसले, तरी त्यातील थोडे तरी म्हटले असतील, तर त्याची २ वैशिष्ट्ये सहज लक्षात येतील. एक म्हणजे गेयता आणि दुसरे म्हणजे ते म्हणणार्‍याच्या, ऐकणार्‍याच्या मनाला उद्देशून असणे. या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास करणार आहोत.

डॉ. दुर्गेश सामंत

१ आ. आधुनिक शास्त्रांच्या दृष्टीकोनांतून अभ्यासाचे कारण : कुणाला वाटेल की, या अभ्यासाचे कारण ‘आमचे पुरातन ग्रंथ-उपदेश कसे आधुनिक शास्त्रांच्या कसोटीवर उतरतात, ते पहा, हे सांगणे किंवा तसे ते आहेत, म्हणजे समर्थ रामदासस्वामी किती श्रेष्ठ आहेत, ते पहा’, इत्यादी पटवून देणे या प्रकारचा असेल. प्रस्तुत लेखकाचा तो उद्देश नाही. लेखकासाठी मनाचे श्लोक किंवा अन्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांचे लिखाण अथवा गीता, उपनिषद यांसारख्या साहित्याचे श्रेष्ठत्व काळानेच सिद्ध करून ठेवले आहे. त्यासाठी गेल्या १०० वर्षांत जन्मलेल्या विद्याशाखांच्या आधाराची आवश्यकता नाही.

असे असले, तरी सध्याच्या धावपळीच्या जगात पालटलेल्या स्थितीमध्ये मनाच्या श्लोकांसारख्या साहित्यातील विचारांची माणसाला आवश्यकता आहे. सध्या आधुनिक विज्ञानाचा बोलबाला आहे. व्यक्ती त्या दृष्टीने जीवनाकडे पहातात. अशा व्यक्तीला जीवनात योग्य त्या दिशेने जाण्यासाठी ‘मनाचे श्लोक’ यासारख्या साहित्यकृतींविषयी आधुनिक शास्त्रांच्या आधारे काही समजले, तर त्यांना त्या त्या साहित्याचा आधार घ्यावासा नक्की वाटेल.

याचे आणखी एक कारण, म्हणजे कुठेतरी समाजमनाची धारणा बनलेली आहे की, मनाच्या श्लोकांसारखे साहित्य हे त्या काळात किंवा अगदी ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत उपयोगी असेलही; परंतु आता जग पालटले आहे, समस्या पालटल्या आहेत. या जुन्या साहित्यात नवीन समस्यांवर काय उपाय निघणार ? उदाहरणार्थ नोकरी, व्यवसाय यांत इतका ताण वाढलेला आहे की, ज्याकाळी हे साहित्य निर्माण झाले, त्याकाळी असले ताणच नव्हते, तर या साहित्यातून सध्याच्या ताण यासंबंधाने काय लाभ होणार ? वास्तवात तसे नाही. मानवी मेंदूचे कार्य तेच राहिले आहे. त्यातील प्रक्रियांचे गुणधर्म तेच राहिले आहेत. जे आधुनिक चेताशास्त्र आता आपल्याला सांगत आहे; कारण तशी आधुनिक पडताळणीसंसाधने आता उपलब्ध झाली आहेत एवढेच !

आधुनिक मानसशास्त्राचा उगम तसे विकास यांची कहाणी, तर १-२ शतकांमधील आहे. बाकी मानवी मन शतकानुशतके तेच आहे, म्हणजे त्यातील प्रक्रिया त्याच आहेत. आधुनिक मानसशास्त्र विज्ञानाच्या पद्धतीने मनाचा आणि त्यातील प्रक्रियांचा अभ्यास करायचा प्रयत्न करत आहे. आता येथे आधुनिक मानसशास्त्र, म्हणजे पाश्चात्त्य मानसशास्त्र हे लक्षात घ्यावे. आणखी एक महत्त्वाचे कारण, म्हणजे विज्ञानाच्या आधारे प्रमाणित झालेल्या सूत्रांचा पडणारा प्रभाव, हा मग एका कोणा व्यक्तीच्या सापेक्ष रहात नाही, हे सर्वसाधारणपणे स्वीकारले गेलेले सूत्र आहे. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’ यांसारख्या धार्मिक मानल्या गेलेल्या साहित्यकृतीचा धार्मिक व्यक्ती, विशिष्ट संप्रदायातील व्यक्तीलाच तेवढा लाभ होईल, इतरांना होणार नाही, असे मानण्याला फारशी जागा रहात नाही.

२. मनाच्या श्लोकांमधील सूत्रांचे प्रकार

आधुनिक विज्ञानाशाखांच्या आधारे मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाकडे वळण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मनाला जी सूत्रे सांगण्यात आली आहेत, त्यांची काही वर्गवारी करण्याचा प्रयत्न करू.

अ. उपदेशात्मक :

१. काय करावे याविषयी : ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।’ (मनाचे श्लोक, श्लोक २), असे जेव्हा म्हणण्यात येते, तेव्हा ते सामान्य उपदेशात्मक सूत्र बनते.

२. काय करू नये याविषयी : ‘मना पापसंकल्प सोडोनी द्यावा ।’ (मनाचे श्लोक, श्लोक ५), यांत मनाला त्याने काय करू नये, हे सांगितले जाते.

या दोन्ही उपदेशात्मक सूत्रांच्या आधारे मनाला एक सर्वसाधारण जीवनदृष्टी मिळते. एरव्ही चुकीचा विचार किंवा कल्पना मनात येतच असतात. त्यातील कोणत्या चुकीच्या आणि योग्य हेही बर्‍याचदा बुद्धीला स्पष्ट असते. मात्र थेट मनाला आधीच त्यासंदर्भात सांगून ठेवल्याने मनातील अयोग्य विचार कृतीकडे जातांना थोडा थांबतो.

आ. प्रश्नात्मक रचनेतून वास्तव सांगणे : ‘जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूचि शोधूनि पाहे ।।’ (मनाचे श्लोक, श्लोक ११), यांत मनासमोर असा प्रश्न उपस्थित केला जातो की, त्याचे जे उत्तर आहे, ते मन स्वत:च देते.

थोडे बारकाईने पाहिले, तर लक्षात येईल की, आपण स्वत:ला नव्हे, तर आपल्या मनाला सांगत आहोत. त्यामुळे येथे मन श्लोक उच्चारणार्‍या ‘मी’ पेक्षा वेगळे बनत आहे, जणू कुणा दुसर्‍याला सांगत आहोत.

इ. भावनांवर नियंत्रण : ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी ।’ (मनाचे श्लोक, श्लोक ६) यासारख्या वचनातून मनाला राग नकोच, हे स्पष्ट सांगितले जाते. रागाची भावना येताच या श्लोकामुळे संस्कारित मनात ती थोडी थांबते, त्या भावनेच्या विस्ताराला काही पायबंद बसतो.

ई. वितंडवादाच्या प्रवृत्तीला पायबंद : ‘नको रे मना वाद हा खेदकारी ।’ (मनाचे श्लोक, श्लोक १६०), असे मनाला सांगण्यात येते, तेव्हा त्याला जाणीव करून दिली जाते की, ‘आपण कुणाशी वाद घालत असू किंवा कुणी आपल्याशी वाद घालत असेल, तर सावध व्हावे, अनावश्यक दिशेने जाऊ नये’, ही सूचना मनाला मिळते.

ही काही उदाहरणे झाली. यांतून उपदेशाच्या सूत्रांचे मोजके गट समोर ठेवले आहेत. ही उदाहरणे पुढचा विषय समजण्यास सोपे व्हावे, तसेच मनाच्या श्लोकांचा ते करत असलेल्या स्वपरिवर्तनाच्या प्रयत्नांसाठी कसा लाभ घेऊ शकतो, याची दिशा कळावी, यासाठी दिली आहेत. अशा प्रकारे मनाच्या श्लोकातील सूत्रांची गटवारी तीही साधनेच्या सापेक्ष जो तो करू शकतो. येथे विस्तारभयास्तव या संबंधाने अधिक काही न करता पुढे जाऊया.

(क्रमश:)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022765.html