दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘मनाच्या श्लोकां’विषयीची लेखमाला २६ मार्च ते २८ मार्च आणि ३० मार्च २०२६ या काळात ४ भागांत प्रसिद्ध झाली आहे. (लेखाच्या शेवटी लिंक्स दिल्या आहेत.) या लेखासंबंधाने अनेक साधक आणि वाचक यांनी या ना त्या प्रकारे तो आवडल्याचे सांगितले. त्यासाठी कृतज्ञता ! यासह काही जणांकडून विचारणाही झाली. ती सूत्रे आणि संबंधित विवरण पुढे देत आहे.

१. मनाच्या श्लोकांचा साधनेत वापर
प्रश्न : पूर्वी व्यवहारात मला फसवण्यात आले. त्यासंबंधाने, तसेच हाताखाली असणार्या कामगारांसंबंधाने ते काही चुकीचे करतात म्हणून रागाचे विचार येतात. स्वयंसूचनांसह मनाच्या श्लोकांचा उपयोग करायचा, तर मी काय करू शकतो ? मी पूर्वी मनाचे श्लोक म्हटलेले आहेत. मला ते आवडतात. – एक साधक
उत्तर : पूर्वी श्लोक म्हटलेले आहेत आणि ते आवडतात, हे चांगले आहे; याचे कारण त्यांचा, तसेच ते योग्य तेच सांगतात यांचा संस्कार कुठेतरी झाला आहे. त्यामुळे मन त्यात सांगितलेले स्वीकारायला अधिक अनुकूल राहील. आपण सूचनांसह मनाच्या श्लोकांमधील प्रसंगसापेक्ष आणि दोषसापेक्ष कोणता श्लोक भावतो, ते पाहून त्या प्रकारचे १-२ श्लोक निवडावेत. त्यासह स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल भाववृद्धीला उपयुक्त ठरेल, असे १-२ श्लोक निवडावे. हे श्लोक दिवसात तुमच्या सवडीनुसार मनात किंवा मोठ्याने २-४ वेळा म्हणावेत. त्यांतील सूत्रांचे मनन सहजतेने होईल तेवढे करत रहावे. पूर्वी म्हटलेले असल्याने त्यांची चाल इत्यादी रुजलेलीच आहे. मधून मधून गुणगुण्याचाही अल्पस्वल्प सकारात्मक लाभ होत असतो.

२. ईशचिंतनाचा मेंदूवर परिणाम
पार्श्वभूमी : काल चिंतन करतांना लक्षात आले की, जीवनातील उच्च मूल्ये (उदा. सत्य, ज्ञान, प्रेम, व्यापकत्व इत्यादी) आपल्या जीवनाला अर्थ देत असतात. ही मूल्ये चैतन्याची स्वरूप आहेत. जडाचा त्यांच्याशी संबंध नसतो. आपल्या जीवनाचा प्रवास या मूल्यांच्या दिशेने असतो. हे लक्षात आल्यावर वृत्ती अंतर्मुख झाली. त्या वेळी मनात अन्य कुठले विचार नव्हते. केवळ शांत बसून या चैतन्याचा अनुभव कसा घेता येईल, याकडे लक्ष होते. त्या वेळी समाधान आणि तृप्ती वाटत होती. अन्य प्रसंगातही साधारणपणे असेच घडते की, एखाद्या गोष्टीचा बोध झाल्यामुळे मन अंतर्मुख होते किंवा चैतन्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केल्यावर शांती वाटते.

प्रश्न : ज्या वेळी आपण आध्यात्मिक अवस्थेत असतो (उदा. काही वेळा वृत्ती अंतर्मुख झाल्यावर आतून शांती वाटत असते. ती स्थिती आनंददायी असते, त्यातून बाहेर पडू नये असे वाटते), तेव्हा मेंदूतील चेतासंस्थेवर त्याचा काय परिणाम होतो ? – श्री. राज कर्वे
उत्तर : अ. आधारभूत माहिती : जेव्हा एखादी व्यक्ती जीवनातील मूल्यांवर चिंतन करते आणि तिला एक ‘स्पष्टता’ (Clarity) मिळते, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये त्या वेळी नेमके काय घडते, असे हे सूत्र आहे. मेंदूतील विविध भागांचा एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी त्या त्या भागातील चेतापेशींची चेतातंतूंच्या माध्यमातून एकमेकांशी संदेशवहन करणार्या जाळ्या (नेटवर्क) असतात. त्यातील २ प्रधान जाळ्या, म्हणजे एक सर्वसाधारण जाळे जे आपण काही विशिष्ट कृतीवर लक्ष केंद्रीत केलेले नसते, मनात इकडचे तिकडेचे विचार चालू असतात त्या वेळी सक्रीय असते, तर दुसरे कार्यकेंद्रीत जाळे जे बाहेरच्या जगात काही विशिष्ट कृती करण्यासाठी मेंदू कटिबद्ध असतांना सक्रीय असते.
आ. मेंदूवर परिणाम : एका संशोधनात आढळून आले की, या दोन्ही कार्यप्रणालींमध्ये अंतर्मुख सखोल जीवनचिंतन होत असतांना (उदा. श्री. राज यांनी सांगितलेल्या प्रसंगात) समन्वय होतो. अशा वेळी सर्व जणू काही एका बिंदू स्थिर झाल्यासारखे होते. त्यामुळे आपल्याला मेंदूतील ‘मूल्यांवर आधारित निर्णय’ घेण्यात मुख्य दायित्व असणारा ‘व्हेंट्रोमेडियल प्री-फ्रंटल कोर्टेक्स’ हा भाग सक्रीय होऊन स्पष्टता आली. नवीन प्राप्त विचार मेंदूच्या अन्य भागांशी जोडण्यात येऊन जुन्या अनुभवांशी काय मेळ बसला जाऊन समाधान निर्माण झाले. ‘कोणताही प्रश्न, म्हणजे तणाव, तर समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर, म्हणजे सुख’, असे झाल्याने ‘डोपामाईन’चा प्रवाह निर्माण झाला. ‘सेरोटोनीन’ नामक अन्य अंत:स्रावाचीही मात्रा वाढून त्याने मनाला स्थिर केले. तो समाधान देणारा अंत:स्राव आहे. नको असलेल्या संवेदनांना अडवणार्या ‘गाबा (GABA)’ या अंत:स्रावामुळे शांतता निर्माण झाली. प्रेम किंवा व्यापकता यासंबंधी चिंतन होते, तेव्हा ‘ओक्सिटोसीन’ या अंत:स्रावाची मात्रा वाढते. ती शांत वाटणे यांत भर घालते. या प्रसंगी मेंदूतील विद्युत् लहरींमध्येही गुणात्मक फरक पडत असतो. अशा प्रकारचा अनुभव हा एकूण शरिरासाठी, तसेच मेंदूसाठी सकारात्मक ठरतो. केवळ माहितीसाठी ज्यांना उदासीनतेचा आजार आहे, त्यांना तो दूर करणार्या आधुनिक मनोविकारतज्ञांकडून देण्यात येणार्या औषधांद्वारे मेंदूमध्ये या अनुकूल प्रकारच्या रसायनांची मात्रा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
इ. आध्यात्मिक दृष्टीकोन : ज्या सूत्रांचे चिंतन होत होते ते, म्हणजे एक प्रकारे ईशचिंतन आहे. स्वाभाविक मनाला समाधान आणि शांती लाभली. समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे, ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरि पाविजे तो स्वभावे ।। – मनाचे श्लोक, श्लोक २’. साखरेचा स्वभावच गोडी आहे. तिची गोडी त्या दाण्यापासून अभिन्न आहे. भगवंताचे चिंतन केले, तर त्याच्या स्वभावानुसार प्रचीती येणार नाही का ? सर्व सृष्टी आणि तिचे नियम जर भगवंतापासून बनले आहेत, तो स्वत: त्यात आहे, तर ज्या घटना त्याच्या स्वभावाला, म्हणजेच त्या व्यवस्थेला अनुकूलपूरक असतील, त्या वेळी त्याचा स्वभाव, म्हणजे शांती जैविकदृष्टीनेसुद्धा अनुभवाला आली, तर त्यात नवल कोणते ! चैतन्याचे चिंतन करतांना ‘त्याच्या’ स्वभावानुसार जाणवते ! किंबहुना तसे काही जाणवले, तर ते खरे ईशचिंतन ! मार्क ट्वेन (प्रसिद्ध अमेरिकन लेखक, ज्याने प्रथम गंगा नदीच्या पाण्यातील जंतूनाशक क्षमता जगासमोर प्रथम मांडली) सांगतो, ‘माणसाला दोन जन्म असतात. पहिला जन्म, म्हणजे अस्तित्वात येणे आणि दुसरा जन्म, म्हणजे कशाला जन्माला आलो, हे समजणे !’
(क्रमशः)
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२६)
| मनाच्या श्लोकांविषयीच्या लेखमालेतील भाग पाहण्यासाठी क्लिक करा →
भाग १ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाचे श्लोक ! भाग २ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून मनाच्या श्लोकांचा मेंदूत होणारा परिणाम ! भाग ४ : आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीतून ‘मनाचे श्लोक’ सर्वसामान्य व्यक्तीसह साधक आणि संन्यासी यांना उपयुक्त ! |
लेखाचा पुढील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/1026944.html
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !