दैनिक ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित लेखांचे संकलन अन् त्यासाठी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे संकलन आणि त्यासाठी लेखकांशी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका सत्संगात कथन केले. ते येथे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांच्याशी खगोलशास्त्राच्या संदर्भातील लेखांसाठी संपर्क होणे

१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख प्रा. सुतार यांना पुष्कळ आवडणे अन् त्यांनी लेखाचे पुष्कळ कौतुक करणे

श्री. भूषण कुलकर्णी : ‘माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येणार्‍या ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित लेखांचे संकलन आणि त्या संदर्भातील समन्वय अशी सेवा असते. मला २ – ३ चांगले अनुभव आले. चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान उतरण्याच्या (लाँचिंग) कालावधीत साधकांनी मला सांगितले, ‘‘या संदर्भातील लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध व्हायला हवेत.’’ तेव्हा मी तुम्हालाच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करत होतो. साधकांच्या ज्यांच्याशी ओळखी आहेत, त्यांना मी वार्ताहरांच्या माध्यमातून संपर्क करत होतो.

श्री. भूषण कुलकर्णी

मी रत्नागिरी येथील प्रा. बाबासाहेब सुतार यांना संपर्क केला. ते खगोलशास्त्राचे अभ्यासक असून त्यात त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी लेख लिहून दिल्यावर तुमच्याकडून मानधन घेणार नाही.’’ प्रा. बाबासाहेब सुतार यांनी पहिला लेख सोप्या भाषेत करून दिला होता. दैनिकाशी संबंधित सेवा करणारे साधक ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचकांना प्रत्येक सूत्राचे आकलन होईल’, अशा दृष्टीने लेख प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे प्रा. सुतार यांनीही तसाच लेख लिहून दिला होता. मी त्या लेखाचे संकलन केले आणि तो लेख ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला. प्रा. सुतार यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेला तो लेख वाचला. तेव्हा त्यांना तो लेख पुष्कळ आवडला. ते मला म्हणाले, ‘‘मी लिहिलेली सूत्रे आपण आणखीन सुंदर पद्धतीने मांडली आहेत.’’ तेव्हा मी प्रथमच असा प्रयत्न केला होता. त्यांनी मला भ्रमणभाषवर संदेश पाठवला, ‘अतिशय चांगले संकलन, उत्तम मांडणी (प्रेझेंटेशन) !’ त्यानंतर मी त्यांच्याकडून दुसरा लेख मागितला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता ते पुढच्या वेळेला लेख पाठवतील ना?

श्री. भूषण कुलकर्णी : हो. आता त्यांनी लेख देण्यास आरंभ केला आहे.

हे वाचा → शुभम् भवतु ! ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो ना. छान !

१ आ. प्रा. बाबासाहेब सुतार यांनी ‘विक्रम याना’च्या संदर्भातील दिलेला लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणे, प्रा. सुतार यांनी ‘लेखाचे अत्युत्तम संकलन आणि अतिशय छान मांडणी केली आहे’, असे सांगून लेखाचे कौतुक करणे अन् दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचा प्रसारही करणे

श्री. भूषण कुलकर्णी : ‘विक्रम यान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. तेव्हा प्रा. सुतार यांनी मला विचारले, ‘‘तुमचा अनुभव काय? विक्रम यान उतरणार कि नाही ?’’ मी त्यांना स्पष्ट सांगितले, ‘‘हो. विक्रम यान उतरणारच आहे.’’ ते मला म्हणाले, ‘‘कशावरून ?’’ मी म्हटले, ‘‘सगळे संत आणि ज्योतिषी ‘यान उतरणार आहे’, असे म्हणत आहेत. साधकांची त्या सगळ्यांवर श्रद्धा आहे.’’ मग ते म्हणाले, ‘‘मी दोन्ही प्रकारे लेख सिद्ध करून देतो. त्याच लेखात तुम्ही यान उतरण्याच्या ऐन वेळी ते पडले, तर केवळ तेवढे पालट करा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख घ्या.’’ त्यांनी स्वतःहूनच हा भाग सांगितला. त्यामुळे लिखाण पुष्कळ चांगले झाले.

नवलकरताई (श्रीमती स्मिता नवलकर, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे) म्हणतात, ‘‘आपण मांडणी (प्रेझेंटेशन) चांगली करूया, म्हणजे समाजात दैनिक ‘सनातन प्रभात’चे अधिक चांगले वितरण होईल.’’ नंतर काही चौकटी वेगळ्या काढल्या आणि चांगली मांडणी करण्यासाठी काही चित्रे घेतली. असा थोडासा प्रयत्न करून प्रा. सुतार यांचा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर प्रा. सुतार म्हणाले, ‘‘मागच्या वेळेस मी सांगितले होते. लेखाचे संकलन पुष्कळ चांगले केले आहे, तर आता अत्युत्तम संकलन आणि अतिशय छान मांडणी केली आहे.’’

नंतर प्रा. सुतार यांना विचारले, ‘‘आता ‘आदित्य’ ‘लाँच’ होत आहे. (भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सूर्याचा अभ्यास करणारे हे पहिले सौर यान अवकाशात प्रक्षेपित केले जाणार होते.) त्याच्याविषयी तुम्ही लेख लिहून द्याल का ?’’ ते म्हणाले, ‘‘लिहून देईन, काहीच अडचण नाही.’’ त्यांना लेख लिहायला पुष्कळ आवडू लागले. मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे काही अंक त्यांना पाठवतो आणि आश्रमातील प्रसाद पाठवतो. ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचा प्रसारही करतात.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी लेख लिहिणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)!

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) पूर्वी आपल्याला राष्ट्र आणि संरक्षण विषयक लेखाची ध्वनीचित्रफित (व्हिडिओ) पाठवायचे. तो लेख ते (ब्लॉग) लिखाणाविषयीचे संकेतस्थळ यावरून पाठवायचे. नंतर आपण ते लेख दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी घेत होतो. आता त्यांच्याशी जवळीक झाली आहे. त्यामुळे ते स्वतःहून आपल्याला लेख देतातच; मात्र मी त्यांना एखादा विषय सुचवला, तरीही ते लगेच ‘हो’ म्हणतात. सहसा ते कुणाला लेख लिहून देत नाहीत. ते व्हिडिओ पाठवतात. ते म्हणाले, ‘‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी म्हणून लिहून देईन.’’ एकदा ते पहाटे लवकर उठले आणि त्यांनी स्वतः लेख लिहून २ दिवसांत दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पाठवला.

३. लेखकांनी ‘वाचकांना समजेल’, अशा भाषेत लिखाण देणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प लेखकांसाठीही कार्यरत झाला आहे’, असे जाणवणे

‘दैनिक ‘सनातन प्रभात’साठी जी धोरणे ठरवली आहेत, त्यानुसार लेखक लेख पाठवतात. त्यात ‘लिखाण चांगले कसे होईल ?’ अशा संदर्भात दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांचा प्रयत्न असतो. ‘तुम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्हाला विचार दिला होता, ‘वाचकांना समजण्याच्या दृष्टीने इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत लिहायला हवा.’ तुमचा हा विचार आमच्यात रुजायला लागला आहे. त्याप्रमाणे लेखकही त्यांच्या लेखातील इंग्रजी वाक्यांचे मराठीत अर्थ लिहून देतात.

हे ही वाचा →

इराणचे प्रमुख नेते मारले गेले, तरी नवीन नेते कसे सिद्ध होत आहेत ?

चीन आणि पाकिस्तान यांच्या नाकावर टिच्चून भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ (प्रभावी कृती) !

भारतीय ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) संरचना : स्वयंपूर्णता, सक्षमता आणि कार्यक्षमता यांचा मार्ग !

पूर्वी माझ्याकडून एका लेखकांच्या लेखातील एका इंग्रजी वाक्याचे भाषांतर करतांना एक शब्द चुकला होता. एका शब्दाचा त्यांना अभिप्रेत अर्थ वेगळा होता आणि मी त्याचा योग्य अर्थ लिहिला नव्हता. मी माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल त्यांची क्षमायाचना केली. दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘चूक आणि सुधारणा’ अशी चौकटही दिली. तेव्हापासून सगळेच लेखक अर्थासहित लेख देतात आणि हे सर्व आपोआप घडले. सगळे लेखक आता सुटसुटीत लिखाण देतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये ज्या पद्धतीने लेखाला मथळे दिलेले असतात, त्याप्रमाणे लेखकही मथळा देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आम्हाला घडवत असतांना लेखाचे संकलन करायला शिकवले, तसेच ‘आता त्याविषयीचा संकल्प लेखकांसाठीही कार्यरत होत आहे’, असे मला वाटते.

अजूनही मी वार्ताहर आणि संपादक यांच्या माध्यमातून इतर लेखक जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वाचकांना ताज्या घटनांवरचे चांगले वाचनीय लेख मिळतील आणि याचा ग्रंथांसाठी लाभ होऊ शकेल.

४. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा अभ्यासू वृत्तीने करणारे श्री. भूषण कुलकर्णी !

४ अ. विविध मासिके आणि साप्ताहिक यांतील राष्ट्र अन् धर्म यांसाठी आवश्यक तेवढी सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी घेणे : सध्या मी विविध मासिके आणि साप्ताहिक यांच्यातील लिखाण निवडण्याची सेवा करत आहे. आता ही सेवा करतांना ‘कधीही तुमची आठवण काढली की, तुम्ही सूक्ष्मातून समवेत आहात’, ही मोठी अनुभूती मला सतत येते. एखादे मासिक किंवा ग्रंथ याचे पूर्ण पान वाचायला लागतेच; मात्र आता लक्षात येते, ‘तुम्ही सूक्ष्मातून समवेत असल्याने जिथे तुमची सूक्ष्मातून दृष्टी जाते ना !, तेवढे सूत्र घेण्यासारखे असते.’

४ आ. समष्टी सेवा म्हणून लिखाण चांगले होण्यासाठी प्रयत्न करणे : ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित पुष्कळ लिखाण येते. यापेक्षाही अध्यात्मच चांगले वाटते. समष्टी सेवा म्हणून प्रतिदिन चांगले लिखाण द्यायचे आहे. तो प्रयत्न करायचा आहे. समष्टी सेवा आहे; मात्र ‘यापेक्षा देवाशी एकरूप व्हायचे आहे’, हा विचार अधिक प्रबळ व्हायला लागला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले की, दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित आलेली अडचण सुटणे

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

मी सद्गुरु मुकुल गाडगीळकाका यांच्या समवेत थोडा वेळ सेवेला असतो. पूर्वी मी तुमच्या समवेत सेवा केली आहे. आता ‘तुमच्याशी त्यांचे साम्य व्हायला लागले आहे’, असे मला जाणवते. पूर्वी बांधकामाशी संबंधित सेवा करत असतांना खडी, स्टील मिळण्यात, तसेच अन्य अडचणी आल्यावर मी तुम्हाला सांगून ठेवत असे, ‘अशी सेवा चालू आहे आणि प्रयत्न करत आहे.’ त्यानंतर २ – ३ घंट्यांनी ‘कुणीतरी स्टील देत आहे किंवा खडी मिळत आहे, सिमेंट मिळत आहे’, असे समजायचे. आता सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितले की, तिकडे दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित आलेली अडचण सुटलेली असते. ‘सद्गुरु गाडगीळकाका आणि तुमच्यात एकरूपता यायला लागली आहे’, असे मला जाणवते.

– श्री. भूषण कुलकर्णी

५. विचारून सेवा केल्याने दिशा मिळणे आणि सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे

श्री. भानू पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे) : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आतापर्यंत तुम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’ची कात्रणे काढून ठेवली होती ना ? त्याचे उत्तरदायित्व आता भूषण कुलकर्णीकडे आहे. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्राधान्याने त्यातील कुठले लिखाण घ्यायचे, हे सर्व तो तळमळीने पूर्ण करतो. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येण्यासाठी आवश्यक असलेले लिखाण तो १ – २ मास आधीच मागून घेतो आणि त्याच्या संदर्भातील प्रक्रिया चालू करतो. त्यातील विषयांची व्यवस्थित विभागणी करून देणे आणि ते लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’साठी, तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी देणे, ही सेवा भूषण चांगली करतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ही अभ्यासू वृत्ती झाली ना ?

श्री. भूषण कुलकर्णी : हो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दैनिकाशी संबंधित सेवा करणारे साधक किती जण अशी सेवा करतात.

श्री. भूषण कुलकर्णी : आता तरी मी आरंभ केला आहे. आता पुढे अजून साधक तयार करणार. ‘मागच्या तुलनेत आनंद पुष्कळ वाढला’, असे स्वतःला जाणवते. मला काही अडचण आल्यास मी सद्गुरु मुकुल गाडगीळ यांच्याशी बोलून घेतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे महत्त्वाचे आहे. विचारून विचारून पुढे जायचे असते.

श्री. भूषण कुलकर्णी : पूर्वी माझ्या मनात ‘मी पुष्कळ अडचणी सांगतो का ? ‘मला पुष्कळ सेवा आहेत’, असे सांगतो का ?’, असे नकारात्मक विचार येत होते. त्यामुळे मला वाटायचे, ‘जी सेवा येईल, ती करत राहूया.’ आता मला वाटते, ‘उत्तरदायी साधकांना प्रत्यक्ष स्थिती सांगूया आणि ‘पुढे कसे करू ?’, हे विचारून घेऊया.’ त्यामुळे मला दिशा घेऊन पुढे जाता येते आणि त्यात आनंद मिळतो.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक