सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हिंदु संघटना यांच्या सतर्कतेचा परिणाम

प्रतिकात्मक चित्र

(मिशनरी म्हणजे धर्मप्रसारक)

सावंतवाडी – शहरातील जगन्नाथराव भोसले उद्यानात बसलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणार्‍या ३ मिशनरींना बजरंग दलाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी कह्यात घेतले. हे तीनही मिशनरी वयस्कर असल्याने त्यांच्या वयाचा विचार करून आणि ‘यापुढे असे प्रकार घडल्यास आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी समज देऊन पोलिसांनी त्यांना सोडून दिले. हे मिशनरी गोवा राज्यातील असल्याचे अन्वेषणातून उघड झाले आहे.

गेले ८ दिवस ख्रिस्ती धर्माची शिकवण देण्याचा प्रकार चालू होता. उद्यानात हा प्रकार चालू असतांना एका महाविद्यालयीन युवकाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिली, तसेच मिशनरी करत असलेल्या प्रसाराचे छायाचित्रण करायला प्रारंभ केला. त्या वेळी त्या मिशनरींनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला; मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले असता ‘विद्यार्थ्यांना ख्रि;स्ती धर्माची शिकवण देत होतो’, असे त्यांनी मान्य केले.

‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, तसेच हिंदूंनी अशा मिशनरींपासून दूर रहावे, तसेच हे प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस आणि हिंदू संघटना यांच्याशी संपर्क साधावा’, असे आवाहन बजरंग दलाने केले आहे.

संपादकीय भूमिका

ख्रिस्ती मिशनरींचा डाव हाणून पाडणारे विद्यार्थी आणि बजरंग दल यांचे अभिनंदन ! अशी सतर्कता सर्वत्रच्या हिंदूंमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे !