श्री सत्यसाईबाबांच्या रथासह चरण पादुकांचा नगर शहरासह उपनगरांत विहार

नगर – प्रेमावतार भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रथमच आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टपूर्ती येथून अहिल्यानगर जिल्ह्यात आलेल्या श्री सत्यसाईबाबांच्या रथासह चरण पादुकांचे गावोगावी आणि घरोघरी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. भाविकांनी श्रद्धायुक्त अंत:करणाने पादुका पूजनाचा सहकुटुंब आनंद घेतला. ठिकठिकाणी साईभक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करू लागले. पादुका रूपाने प्रत्यक्ष श्री सत्यसाईबाबाच आपल्या भेटीला आले आहेत, हा श्रद्धाभाव भाविकांमध्ये दिसत राहिला. श्रीसत्यसाईंच्या रथयात्रेसह दिव्य पादुकांची आतुरतेने प्रतिक्षा केली जात असल्याचे दिसून येत आहे.

‘श्री सत्यसाई सेवा संघटने’चे जिल्हा प्रमुख श्री. अशोक कुरापाटी यांनी जिल्ह्यातील नियोजन उत्तम केले असल्याने सर्वधर्मीय भाविकांना दर्शनाचा लाभ मिळण्यास मोठे साहाय्य झाले. पादुका दर्शनासाठी भाविकांची लक्षवेधी गर्दी होत असली तरी सर्वजण शांतपणे शिस्तबद्धतेने दर्शन घेत असल्याचे दिसून येत होते.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात ब्रह्मवृंदानी पुण्याह वाचन आणि वेदमंत्र पठण केल्यानंतर ‘सत्यसाई बाल भजन महोत्सवा’चा शुभारंभ करण्यात आला. शहराच्या विविध भागांतील महिला भजनी मंडळांनीही या भजन महोत्सवात सहभाग घेतला. स्वामींना विविध प्रकारच्या ५६ सात्त्विक पदार्थांचे ब्रह्म अर्पण करण्यात आले.

दुपारी ३ च्या सुमारास रथयात्रेने नंदनवन लॉन्समधून प्रस्थान केले. आयुर्वेद कॉर्नर, नेप्ती नाका, देहलीगेट, सारडा कॉलेज, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, कुष्ठधाम रोड, श्रमिकनगर, भिस्तबाग नाका, पाईपलाईन रोड, श्रीराम चौक, दसरेनगर अशा नगर शहरातील विस्तारीत उपनगरांमध्ये रथयात्रेचे होणारे स्वागत आयोजकांचा उत्साह दुणावणारे ठरले आहे.