हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

११ सहस्र हिंदूंची धर्मरक्षण करण्याची गर्जना !

हुपरी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेने जागवले हिंदुत्व !

  • चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्याची एकमुखी मागणी !

  • अमली पदार्थांद्वारे युवकांना व्यसनाधीन बनवणार्‍या षड्यंत्राविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांकडून अभिवादन !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – ‘चंदेरी नगरी’ असलेल्या हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे १ मार्च या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ११ सहस्र हिंदूंनी धर्मरक्षणार्थ संघटित होऊन प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्धार केला. या सभेत भाग्यनगर येथील ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजासिंह यांच्यासह सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे कृतीला उद्युक्त करणारे जाज्वल्य आणि हिंदुत्व चेतवणारे मार्गदर्शन झाले. युवती आणि महिला यांच्या लक्षणीय उपस्थितीत झालेल्या या सभेत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, अशी मागणी करण्यात आली. महिला आणि युवती यांवरील अन्याय-अत्याचार यांच्या विरोधात तात्काळ कृती होण्यासाठी स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ असावा आणि स्वतंत्र दूरभाष क्रमांक असावा, अशी मागणी करण्यात आली.

सभेसाठी पंचक्रोशीतून सर्व अडथळ्यांवर मात करत उपस्थित राहून जागृत झालेला हिंदू घटनात्मक मार्गाने भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होईपर्यंत शांत बसणार नाही, अशी चेतावणी या सभेद्वारे देण्यात आली. सभेच्या माध्यमातून धर्मपालनाचे महत्त्व बिंबले, संघटिपणाचे महत्त्व कळले आणि हिंदु जनजागृती समिती प्रत्येक स्तरातील हिंदूंना दिशा देऊन कृतीप्रवण करते, हे या सभेच्या माध्यमातून अधोरेखित झाले. सभेनंतर तात्काळ कृतीशील होत काही ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू झाले, तर युवकांनी धर्मपालनाच्या कृती करण्यासाठी त्वरित आरंभ केला.

सभेतील हिंदूंना कृतीला प्रवृत्त करणारी मान्यवर वक्त्यांची भाषणे !

आता ‘गजवा-ए-हिंद’ नव्हे, तर ‘भगवा-ए-हिंद’ची आवश्यकता आहे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

(‘गजवा-ए-हिंद’ म्हणजे भारताचे इस्लामीकरण आणि भगवा-ए-हिंद म्हणजे भारताचे भगवेकरण)

श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

गाव आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक गावात ‘ग्रामसुरक्षा दले’ स्थापन केली पाहिजेत. या दलांद्वारे ‘बांगलादेशी घुसखोरमुक्त’ आणि ‘हलालमुक्त गाव’ मोहिमेला गती दिली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी, तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी हुपरी सूर्यतलाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाने समयमर्यादा ठरवली पाहिजे. आजच्या तरुणांसमोर छत्रपती संभाजी महाराज हेच आदर्श असले पाहिजेत.

देशद्रोहाचे कट रचणार्‍यांनाही पोलिसांनी नोटिसा द्याव्यात ! – सुनील घनवट

पोलिसांनी सभेच्या आयोजकांना १६८ ची (प्रतिबंधात्मक कारवाईची) नोटीस  दिली, तसेच सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी फुलांचे हारही बाँबशोधक पथकाच्या साहाय्याने पडताळले. या संदर्भात श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘व्यासपिठावर येण्यापूर्वीच आम्हाला १६८ ची नोटीस मिळाली, तसेच आमच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त लावला आहे; परंतु आमची विनंती आहे की, खर्‍या अर्थाने जे देशद्रोहाचे कट शिजतात. त्यांना पण जरा नोटिसा पाठवा.’’

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हुपरी शहरात अंबादेवीची पालखी दर्ग्यात नेण्याची चालेलेली चुकीची प्रथा तात्काळ बंद करून हिंदु धर्माचे पावित्र्य राखावे, असे आवाहन सभेच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. वर्ष २०४७ पर्यंत ‘गजवा-ए-हिंद’ करण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंनी जागरूक होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे. त्यामुळे आता ‘गजवा-ए-हिंद’ नव्हे, तर ‘भगवा-ए-हिंद’ची आवश्यकता आहे !

हिंदुत्वनिष्ठांचे दमन होऊ नये म्हणून एक हिंदू म्हणून संघटित व्हावे लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने मालेगाव बाँबस्फोटातील सर्व हिंदुत्वनिष्ठांची निर्दोष मुक्तता केली. सत्य कितीही दडपले, तरी ते कायमस्वरूपी दडपले जाऊ शकत नाही, हे यातून पुन्हा सिद्ध झाले. आज कर्नाटक असो कि बंगाल, केरळ असो कि काश्मीर हिंदूंना दडपण्याचे प्रयत्न चालूच आहेत. भगवा हा आतंकवादाचे नाही, तर शौर्याचे प्रतिक आहे. भविष्यात हिंदुत्वनिष्ठांचे दमन होऊ नये; म्हणून आपल्याला जात-पात-पक्ष-संप्रदाय विसरून एक हिंदु म्हणून संघटित व्हावे लागेल. हिंदु राष्ट्र आणण्यासाठी आपल्याला संघर्षच करावा लागेल आणि त्यासाठीच ही सभा आहे. त्यामुळे यापुढील काळात आपल्याला या भूमीत रामराज्य आणण्यासाठी हिंदु म्हणून एकत्र यावेच लागेल !

हिंदु धर्मासाठी कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी आदर्श ! – आमदार टी. राजासिंह

आमदार टी. राजासिंह

सहस्रो हिंदूंची कत्तल करणारा, बळजोरीने हिंदूंचे धर्मांतर करणारा, मंदिरांचा विध्वंस करणारा धर्मांध क्रूर टिपू सुलतान आमचा आदर्श कधीच असू शकत नाही. कर्नाटक राज्यात आजही काही गावांत टिपू सुलतानने केलेल्या अत्याचारांमुळे ‘काळी दिवाळी’ साजरी केली जाते. त्यामुळे टिपू आपला आदर्श कसा असू शकेल ? ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी प्राणत्याग केला आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंना स्वाभिमानाने जगायला शिकवून हिंदवी स्वराज्य निर्माण केले, तेच आमच्यासाठी आदर्श आहेत.

‘‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी स्वतंत्र ‘पोलीस टास्क फोर्स’ (पोलीस कृती दल) हवा आणि महिला-युवती यांना तक्रार करण्यासाठी स्वतंत्र क्रमांक असला पाहिजे, अशी मागणी टी. राजासिंह यांनी या प्रसंगी केली.

त्यामुळे धर्मांध टिपू सुलतान नाही, तर हिंदु धर्मासाठी कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत. हिंदूंना स्वत:चे संख्याबळ आणि धर्मप्रेम दोन्ही वाढवावे लागेल. याचसमवेत ‘लोकसंख्या नियंत्रण’ कायदा लागू करावा.

अशी झाली सभा…

१. प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. आमदार टी. राजा सिंह यांनी अत्यंत लीन होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला नमन केले.

२.  वेदमूर्ती श्री. ऋषिकेश जोशीगुरुजी आणि वेदमूर्ती श्री. अविनाश जोशीगुरुजी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणामुळे सभास्थळी चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सनातन संस्थेच्या नूतन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

३. श्री. आदित्य शास्त्री यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म कार्य ईश्वरी अधिष्ठानामुळे अल्प कालावधीत किती वेगाने वाढत आहे, हे संक्षिप्तपणे मांडले. त्यानंतर हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या धर्मविरांचा सत्कार करण्यात आला.

४. यानंतर मान्यवरांनी ओघवत्या वाणीतून वीरश्रीयुक्त मार्गदर्शन केले.

५. सभेच्या शेवटी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करायचे ? याची प्रात्यक्षिके दाखवली आणि संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली.

वेदमंत्रपठण करतांना डावीकडून वेदमूर्ती श्री. अविनाश जोशीगुरुजी आणि वेदमूर्ती श्री. ऋषिकेश जोशीगुरुजी

उपस्थित मान्यवर

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी, कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, हुपरी येथील नगरसेविका सौ. ऋतुजा गोंधळी, सौ. नंदिनी कौंदाडे, सौ. अलका नाईकवाडे, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक श्री. नितीन काकडे, श्री. शरद माळी, अखिल भारत हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे आणि शहरप्रमुख श्री. संजय पाटील, भाजपचे मंडलप्रमुख श्री. सुभाष गोटखिंडे, उद्योजक श्री. सतीश झांजगे, उद्योजक श्री. राजेश शेटे, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकर ससे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, ‘हिंदु एकता’चे श्री. दिलीप भिवटे, ‘हिंदु जागरण मंच’चे श्री. ओम पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. भगवंतराव जांभळे, विश्व हिंदु परिषद जिल्हासहमंत्री श्री. निळकंठ माने

वक्त्यांचे मार्गदर्शन एकाग्रतेने लिहून घेतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी

उपस्थित पक्ष-संघटना-संप्रदाय

स्वामी समर्थ संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारत हिंदु महासभा, भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दल यांसह पंचक्रोशीतील विविध स्थानिक संघटना-संप्रदाय, तरुण मंडळे

सभेच्या पूर्वी मावळ्यांच्या वेशभूषेत असलेल्या युवकांचा सभेला उपस्थित रहाण्यासाठी आवाहन करणारा एक विशेष ‘व्हिडिओ’ सिद्ध करण्यात आला होता.

प्रत्यक्ष शिवकालीन काळात घेऊन जाणार्‍या या ‘व्हिडिओ’ला हिंदूंचा विशेष प्रतिसाद मिळाला, अनेकांनी ते ‘व्हॉट्सॲप’च्या स्टेट्स’ला ठेवले. यामुळे सभेचा प्रचार होण्यास लाभ झाला.

स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांच्या वेळी  ‘आतंकवाद असाच संपवावा लागतो’, हे दर्शवणारा अफझलखान वधाचा प्रसंग

विशेष क्षणचित्रे

  •  सभेमुळे गावातील बर्‍याचशा मुलींनी कुंकू लावायला प्रारंभ केला.
  • एका कुटुंबाने त्यांच्या मामांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे त्यांना ‘यापुढे आमच्या कुटुंबाशी संबंध ठेवू नका’, असे सांगितले.
  • एक ताई ३ महिन्यांच्या तान्ह्या बाळाला घेऊन सभेमध्ये आली होती. तिने तिच्या गावातील महिलांना बसमधून प्रवास करतांना घोषणा दिल्या आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला.
  • श्री. राहुल राजपूत हे धर्माभिमान दिव्यांग असूनही चालत सभेला आले होते, तर  बेनाडी या गावातील श्री. कृष्णा आप्पा चौगुले (वय ९४ वर्षे) हे सभेला उपस्थित होते.
  • विक्रमनगर, इचलकरंजी येथील ‘काडसिद्धेश्वर महिला भजनी मंडळा’च्या ४३ महिला बसगाडीने एकत्र सभास्थळी आल्या आणि घोषणा देत त्यांनी प्रवेश केला.
  • आलाटवाडी, यळगुड, निपाणी, बोरगाव, काळमवाडी, तळंदगे, बेनाडी, निवडकी या आणि आजूबाजूच्या अनेक गावांमधून अनेक धर्माभिमानी गटागटाने येऊन सहभागी झाले.
  • तामगाव येथील श्री. रंजीत दुर्गाळे हे २ ‘टेंपो ट्रॅव्हल्स’, १ चारचाकी घेऊन त्यांच्या ‘स्वामी समर्थ केंद्रा’तील सर्व महिलांना घेऊन सभेसाठी आले होते.
  • श्री. लक्ष्मण गुरव यांनी त्यांच्या भागातील ४५ महिलांना सभेला येता यावे, यासाठी वाहनाची व्यवस्था केली होती.

सभेसाठी विशेष सहकार्य करणार्‍यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आभार !

१. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेली सभा यशस्वी होण्यासाठी विविध संघटना, संप्रदाय, उद्योजक, प्रतिष्ठित मान्यवर अशा अनेकांनी अनेक प्रकारचे अमूल्य सहकार्य केले आहे. यात प्रामुख्याने सर्वश्री निरंजन रणदिवे, संतोष पाटील, शिवाजीराव शेटके, महादेव आढावकर, राजेंद्र औंधकर, दत्ता पाटील, रमेश भोरे, संतोष हत्तीकर, पंढरीनाथ ठाणेकर, रवींद्र ससे, बाळकृष्ण शेटे, संजय पाटील, संजय नाईकवाडे, नितीन काकडे, विक्रम सावंत, कु. पद्मश्री काशीद, जिव्हेश्वर मंदिर विश्वस्त, भाजपचे श्री. सुभाष गोटखिंडे, श्री. अभयसिंह घोरपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याविषयी समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

२. इचलकरंजी येथील भाजपचे आमदार श्री. राहुल आवाडे यांनी सभेला येण्यासाठी धर्मप्रेमींना बसगाड्या उपलब्ध करून दिल्या.

३. समाजातील एका धर्माभिमानी व्यक्तीने सभेच्या व्यासपिठाचे ‘बॅकड्रॉप’ (व्यासपिठाच्या मागे असलेला भव्य पडदा) बनवण्यासाठी व्यावसायिक व्यक्तीची भेट घालून दिली आणि नवीन बॅकड्रॉप बनवून दिला. त्यासाठीचा सगळा व्यय त्यांनी स्वत: केला.

सभा पाहण्यासाठी क्लिक करा → https://www.facebook.com/jagohindukolhapur/videos/1610376536770925

हुपरी येथे यापूर्वी झालेल्या सभेच्या निमित्ताने एका ध्वनीक्षेपक यंत्रणेच्या मालकांचा पूर्वपरिचय होता. त्यांना स्थानिक स्तरावर यंदा सभा आहे, असे एका मासापूर्वी समजले, तेव्हा त्यांनी मैदानातील इतर व्यवस्था कुणाला सांगू शकतो, याचे स्वतःहून चिंतन केले. आम्ही भेटायला गेल्यावर त्यांनी त्यांचे चिंतन सांगितले. ‘आपल्याला मनापासून आणि एकदम चांगले काम करून देणारे लोक हवे आहेत. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. हे मी सर्वांना सांगितले’, असे त्यांनी सांगितले. यानंतर अनेकांना भेटण्यासाठी ते स्वत: उपस्थित राहिले, काही ठिकाणी नियोजन करून दिले, तसेच संबंधित यंत्रणांचे देयक-भाडे अल्प करण्याविषयी अन्यांचे प्रबोधन केले. यामुळे साधकांचा वेळ वाचला, तसेच लागणार्‍या अनेक मौल्यवान वस्तू पुष्कळ सहजतेने मिळाल्या !

– डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

विशेष प्रतिक्रिया

सनातन संस्थेच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे आपण धर्माप्रती अतिशय समर्पित श्रद्धा भावनेने कार्य करत आहात. तुमचे कार्य हे समाजासाठी एक आदर्श आहे. तुमचे कार्य समाजाला योग्य दिशा दाखवणारे, नैतिकतेचा मार्ग प्रशस्त करणारे आणि सर्वांना प्रेरणा देणारे आहे. आपल्या समर्पणाला आणि सेवेला शत-शत नमन ! तुम्ही करत असलेले कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. निःस्वार्थ भावनेने, ज्ञानाने आणि श्रद्धेने कार्य करणार्‍या तुम्हाला पुष्कळ पुष्कळ शुभेच्छा आणि अभिनंदन ! हे कठीण कार्य करत रहाण्यासाठी तुम्हाला परम ईश्वरी शक्ती मिळो, हीच सदिच्छा !

– श्री. अशोक महाजन, रेंदाळ

पहा सभेचा चित्रमय वृत्तांत !

(चित्रावर क्लिक करा)

हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि सभेच्या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी केलेल्या प्रचाराचा लाभ !

  • हिंदु जनजागृती समितीच्या कार्यामुळे, सभेच्या प्रचारामुळे गावात, युवकांमध्ये, हिंदुत्वनिष्ठांमध्ये परिवर्तन दिसून आले आणि ते प्रत्यक्ष धर्मजागृतीच्या कार्यात झोकून देऊन सहभागी होत आहेत.
  • पूर्वी गटबाजी होती, हिंदु एकत्र येत नव्हते; मात्र आता हिंदु जनजागृती समिती, तसेच आतापर्यंत झालेल्या सभा यांमुळे हिंदू एकत्र येत आहेत, हे समोर आले.
  • ग्रामीण भागांत समितीप्रती लोकांमध्ये विश्वास निर्माण होत असून ते धर्मविडंबन रोखण्यासाठी कृतीशील होत आहेत, असे लक्षात आले.
  • यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गुढीपाडवा, तसेच अन्य सण धर्मशास्त्रीय दृष्टीकोनातून साजरे होत नव्हते, आता धर्मशास्त्र समजून घेऊन भावपूर्णरितीने साजरे केले जातात.
  • प्रत्येक हिंदूला वैयक्तिक, कौटुंबिक स्तरावर आणि गावपातळीवर पालट जाणवतो. विशेष करून युवकांना दिशा मिळून युवकांचे संघटन वाढल्याचा लाभ गावाला होत आहे.
  • गावातील राजकीय मतभेद विसरून अनेक गावांमध्ये एक हिंदू म्हणून नागरिक येत आहेत.
  • हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यामुळे धर्माचरण वाढले.