‘पितांबरी’ आस्थापन गोसंवर्धनामुळे अनुभवत असलेली समृद्धी !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले गायीचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व, आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे गोशाळा उभारण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया, गोसंवर्धनामुळे ‘रुचियाना’ गूळ आणि ‘पितांबरी ॲग्रो टुरिझम’ यांमध्ये आलेले समृद्धी’, यांविषयी वाचले. आज पुढचा भाग येथे देत आहोत.        

(भाग १५)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996687.html

गायीचे पूजन करतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि उपस्थित अन्य कर्मचारी

१. गायींमुळे भूमीतील नकारात्मक दोष न्यून होणे

तळवडेच्या शेजारी असलेल्या ताम्हाणे गावातही आम्ही अनुमाने ५० ते ६० एकर भूमी घेतलेली होती. त्या ठिकाणी गवती चहा (लेमनग्रास) आणि चाफा यांची लागवड करण्यात आली होती; मात्र अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नव्हते. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून मी ऐकले होते, ‘काही भूमी सहस्रो वर्षांपासून पडिक राहिलेल्या असतात. कालांतराने त्या जागांचे अनेकदा हस्तांतरण झालेले असते. वेगवेगळ्या लोकांच्या इच्छा, भावना, तसेच काही ठिकाणी घडलेल्या नकारात्मक घटनांचा ठसा त्या भूमीवर रहातो. अशा कारणांमुळे त्या भूमींना दोष लागतात आणि त्यामुळे तिथून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.’

‘हे दोष दूर करण्यासाठी सर्वांत प्रभावी उपाय, म्हणजे गाय’, असा विचार मला अंतर्मुख करणारा वाटला. त्यातूनच एक संकल्पना पुढे आली. त्या वेळी तळवडे गोशाळेत गायींची संख्या अनुमाने १५-१६ झाली होती. त्यांपैकी ४ गायी आम्ही ताम्हाणे येथील जागेवर आणल्या. तेथे गायी आल्यावर हळूहळू पालट स्पष्टपणे जाणवू लागले. परिसरातील वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली. अडवली येथील एका ‘प्लॉट’मधून (भूमीचा तुकडा) बांबू मिळू लागले. इस्टेटमधील उपलब्ध लाकडांपासून आम्ही ‘पॅलेट्स’ (चित्रकाराची रंगफळी) बनवण्यास प्रारंभ केला, तसेच सोनचाफ्याच्या झाडांना भरघोस फुले येऊ लागली. जे यापूर्वी क्वचित्च दिसत होते. हे सारे पालट अचानक घडलेले नव्हते; पण सातत्याने आणि ठळकपणे अनुभवास येत होते. ‘गायींच्या सान्निध्यामुळे भूमीला पुन्हा जीवन मिळाले’, असेच वाटू लागले.

‘पुंगनूर’ जातीची गाय विकत घेऊन तिला घरी, कार्यालय येथे आणल्यानंतर आलेली अनुभूती

‘पुंगनूर’ गाय

पुढे जेव्हा जेव्हा मी नवीन भूमी घेतल्या, तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी गायी नेण्यास प्रारंभ केला. त्या काळात मला ‘पुंगनूर’ नावाची छोटी देशी गायीची जात असल्याची माहिती मिळाली. ही जात अत्यंत दुर्मिळ असून तिचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक महत्त्व विशेष असल्याचे समजले. ही माहिती मिळताच मी स्वतः विशाखापट्टणम् येथे गेलो. तिथून पुढे पुंगनूर गावात जाऊन ४ गायी आणल्या. एका टप्प्यात त्या गायी थेट कोकणात नेणे कठीण होते, म्हणून प्रारंभीला त्यांना आनगाव येथे आणले. त्या गायी मी घरी घेऊन आलो. त्या संपूर्ण घरात फिरल्या. त्यानंतर त्यांना कार्यालयामध्येही आणले. आमच्या कार्यालयाच्या तिन्ही मजल्यांवरील प्रत्येक विभागातील प्रत्येक खोलीत त्या गायी फिरवण्यात आल्या. त्यांची विधीवत पूजा केली गेली आणि त्यानंतरच त्या गायी कोकणात पाठवण्यात आल्या. या घटनेनंतर जे घडले, ते मला आजही आश्चर्यचकित करते. 

दुनिया की सबसे छोटी गाय पुंगनूर, पुराणों में भी है जिसका ज़िक्र | Punganur Cow

 (सौजन्य : DD News 

आमची ‘पितांबरी’ची इमारत जुनी झाली आहे. तिच्या पुनर्विकासाचा विषय कागदपत्रांच्या अभावामुळे रखडत होता; मात्र गायी आमच्या घरात आणि कार्यालयात येऊन गेल्यानंतर परिस्थिती पालटू लागली. अडलेली कामे मार्गी लागू लागली. आज आमच्या कार्यालयाची इमारत लवकरच पुनर्विकासाकडे जात आहे. गायी येऊन गेल्यानंतर हा पालट स्पष्टपणे अनुभवायला मिळाला. यामुळेच पूर्वी ‘प्रत्येक घरात देशी गाय असलीच पाहिजे’, असा आग्रह का धरला जात होता ?’, हे मला आता पूर्णपणे समजले आहे. देशी गाय असेल, तरच असे लाभ अनुभवायला मिळतात, यावर माझा ठाम विश्वास बसला आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे भूमी आहे आणि ती उत्पादक (प्रॉडक्टिव्ह) होत नसेल किंवा ज्यांचे गावाकडे घर आहे, त्यांना मी आवर्जून सांगतो, ‘देशी गाय पाळा. तिचे संवर्धन करा.’

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

२. कोल्हापूरमधील एका धर्मशाळेला वैयक्तिक खर्चातून १५० किलो ‘रुचियाना’ गूळ उपलब्ध करून देणे

याच कालावधीत एकदा मी कोल्हापूरला गेलो होतो. श्री महालक्ष्मीदेवी मंदिराजवळ आमच्या काही वितरकांनी एक धर्मशाळा चालू केली होती. तेथे मी भेट दिली असता दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था चालू असल्याचे दिसले. प्रतिदिन अनुमाने १ सहस्र भाविक तेथे जेवण घेत होते. शिरा, भात, आमटी, भाजी हे सर्व पदार्थ साधे; पण प्रेमाने बनवलेले भोजन होते. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘या उपक्रमाचा आर्थिक भार मोठा आहे आणि जर थोडा हातभार लागला, तर ही सेवा अधिक काळ चालू ठेवता येईल.’ त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही प्रतिमास शिर्‍यासाठी १५० किलो ‘रुचियाना’ गूळ पावडर विनामूल्य देण्यास प्रारंभ केला. हे उत्पादन मी स्वतः माझ्या ‘पितांबरी’ आस्थापनाकडून विकत घेऊन माझ्या वैयक्तिक खर्चातून त्या सेवेसाठी देत होतो.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

३. श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराबाहेर फुले विक्री करण्याची संकल्पना सुचून विविध ठिकाणी फुले विक्री चालू होणे 

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

ही सेवा चालू झाल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आली, जणू देवीनेच मनात एक विचार जागवला, ‘चाफ्याची फुले इथे आणून विक्री कर.’ त्यानंतर आम्ही प्रतिदिन अनुमाने ३ सहस्र चाफ्याची फुले मंदिराबाहेर विक्रीसाठी देऊ लागलो. त्या फुलांना प्रत्येकी दीड रुपयाचा दर मिळू लागला आणि प्रतिदिन अनुमाने ४ सहस्र ५०० रुपये रोख उत्पन्न मिळू लागले. पुढे देवीसाठी लागणारे गजरे, वेण्या आणि हार बनवण्यासही प्रारंभ केला. हे साहित्य ५० रुपयांना विकले जाऊ लागले आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आम्ही आमच्या गावातील श्री नवलादेवी, तसेच इतर देवस्थानांनाही फुले देण्यास प्रारंभ केला. कधी दत्त मंदिरात, कधी देवीच्या मंदिरात विशेष पूजा असली, तर फुले विनामूल्य देत असू. हळूहळू तिथूनही नियमित मागण्या येऊ लागल्या. या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ‘मनापासून केलेली सेवा कधीच वाया जात नाही. देवकृपेने ती अनेक पटींनी परत मिळते. हा संपूर्ण अनुभव म्हणजे गोमातेच्या सान्निध्यातून अनुभवलेली समृद्धीच आहे’, असे मला मनापासून वाटते.

४. गोमहिमा आणि गोविज्ञान यांमुळे अनुभवलेली समृद्धी !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त फडकवण्यात आलेला सनातन धर्मध्वज

त्यामुळेच शंखनाद महोत्सवातील धर्मध्वजावर असलेले गायीचे चित्र आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देत होते. तो संदेश, म्हणजे ‘गोमहिमा आणि गोविज्ञान समजून घेऊन त्याच्या आधारे आपण समृद्धीच्या मार्गावर कसे जाऊ शकतो, हेच शिकवणारा होता.’

गाय केवळ पूज्य नाही, तर ती संरक्षित राहिली पाहिजे. गायींची संख्या वाढली पाहिजे. गोसंवर्धन झाले पाहिजे; कारण गाय वाचली, तर संस्कृती वाचते आणि संस्कृती वाचली, तर धर्म टिकतो; म्हणूनच आपल्याला हिंदु धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे, स्वतःच्या आचारातून, विचारातून आणि कृतीतून !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

गोमातेचा विजय असो ! सनातन हिंदु धर्माचा विजय असो !

भाग १६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1001357.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक