‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन धर्मध्वजा’वर कोरलेले गोमातेचे चित्र प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर गायीविषयीच्या ज्या विलक्षण अनुभूती मला आल्या, त्या मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. एखादी अनुभूती जेव्हा आपल्याला स्पर्श करते, तेव्हा तिच्यामागे केवळ भावना नसून काहीतरी शास्त्रही असते, असे मला वाटते. ते शास्त्र समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक असते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ जाण्याच्या सूत्रानुसार स्थूल गायीमागील सूक्ष्म शास्त्र आपण समजून घेतले पाहिजे. याच विषयावर या लेखात मी यामागचे शास्त्र मांडणार आहे. ज्यामुळे उद्योजक आणि सर्व वाचक यांना गायीचे महत्त्व उलगडून प्रेरणा मिळू शकेल.
(भाग १६)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.
भाग १५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998850.html

१. गोमाता ही केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी आरोग्य आणि निसर्गसंतुलन करणारी !
गायीचे पालन-पोषण केल्यामुळे आपल्याला असणारे त्रास आणि संकटे नाहीशी होतात. याचा अनुभव मी स्वतः घेतला असून ते सर्व अनुभव आधीच्या लेखात सांगितले आहेत. ‘आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते, त्याचप्रमाणे ‘गोमाता’ मनुष्य आणि पर्यावरण यांचे संरक्षण करते’, ही भावना माझ्या मनात अधिक दृढ झाली. गोमाता केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून तिचे अस्तित्व मानवी आरोग्य आणि निसर्गसंतुलन यांच्याशी जोडलेले आहे, याची जाणीव हळूहळू होत गेली. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी जेव्हा मला सांगितले, ‘तू गाय घे आणि तिची सेवा कर’, तेव्हापासून माझा गोमातेविषयीचा दृष्टीकोन पालटू लागला. त्यानंतर गोमातेविषयीचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेण्याची माझी उत्सुकता वाढली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदु परिषद हे ‘गोवंश हत्या बंदी कायद्या’साठी सातत्याने कार्यरत आहेत; कारण गोमातेचे सांस्कृतिकच नव्हे, तर वैज्ञानिक महत्त्वही त्यांनी पूर्वीच ओळखले होते.
२. जर्सी गायीमुळे दुधाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होणे
मी जेव्हा गायींची सेवा चालू केली, तेव्हा माझ्या लक्षात आले की, गाय आणि म्हैस यांना केवळ दूध देणारे प्राणी म्हणून आपण पहातो; पण देशी गाय आणि जर्सी (विदेशी) गाय यांमधील तफावत समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही तफावत मलाही पूर्वी ठाऊक नव्हती; मात्र जसजसा माहिती घेण्यास प्रारंभ केला, तसतसा ‘ए १’ आणि ‘ए २’ दुधामधील तफावत स्पष्ट होत गेली. ‘ए १’ गाय, म्हणजे साधारणपणे आपल्या देशात आढळणार्या ‘जर्सी आणि संकरित गायी’. जर्सी गायी भरपूर दूध देतात, म्हणजे देशी गायींच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट-तिप्पट. हे पाहिल्यावर साहजिकच आपल्याला त्या अधिक उपयुक्त वाटतात; पण या दुधामध्ये नेमकी काय तफावत आहे ? हे समजल्यावर मी स्वतः स्तब्ध झालो.
जर्सी आणि इतर संकरित गायी या मूळ भारतीय देशी गायी नसून दूध उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने परदेशात केलेल्या संकर प्रक्रियेतून विकसित झालेल्या आहेत. या संपूर्ण संशोधनामागे एकच हेतू होता, तो म्हणजे अल्प काळात अधिक दूध मिळवणे. या प्रक्रियेत प्राण्यांच्या नैसर्गिक शरीररचनेपेक्षा उत्पादन क्षमतेला अधिक प्राधान्य दिले गेले. त्यामुळे जर्सी गायी दिसायला मोठ्या आणि भरपूर दूध देणार्या असल्या, तरी त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेविषयी पुढे प्रश्न निर्माण झाले. याच अतीउत्पादनाच्या शर्यतीत काही देशांमध्ये प्राण्यांवर केलेले प्रयोग, अन्नपद्धतीतील पालट आणि अनैसर्गिक व्यवस्थापनामुळे ‘मॅड काऊ’सारखे गंभीर आजारही समोर आले. यावरून हे स्पष्ट होते की, केवळ दूध अधिक मिळावे, या एकाच उद्देशाने केलेले प्रयोग दीर्घकाळासाठी मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
वाचकांना सूचनाया लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा. |
३. जर्सी गायीच्या दुधाविषयी करण्यात आलेले संशोधन आणि त्या दुधात आढळलेले विषारी घटक
डेन्मार्कमधील एक शास्त्रज्ञ कीथ वुडफोर्ड ज्यांनी ‘Devil in the Milk (There is a Devil in the Milk)’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी डेन्मार्कमधील एका विशिष्ट भागात ज्या मुलांना लहानपणापासून जर्सी गायींचे दूध दिले जात होते, त्या मुलांना लहान वयातच मधुमेह (डायबेटिस), तसेच वेगवेगळे आजार होऊ लागल्याचे सत्य मांडले आहे. हे आजार नेमके कसे होत आहेत ? हे शोधण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले असता त्यात असे दिसून आले की, ज्या मुलांना दूध दिले जात होते, ते दूध ‘ए १’ प्रकारच्या जर्सी गायींचे होते. यानंतर त्यांनी भारतीय पद्धतीच्या गायी जसे की, गीर, कांकरेज, साहीवाल इत्यादी आणि या जर्सी गायींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर दोन्ही गायींच्या गुणसूत्रांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले.
जसे की, ‘जर्सी आणि काही संकरित गायी यांच्या दुधामध्ये ‘ए १’ प्रकारचे ‘बीटा-केसीन’ प्रथिन असते, तर भारतीय देशी गायींच्या दुधामध्ये ‘ए २’ प्रकारचे ‘बीटा-केसीन’ आढळते. ही तफावत अतिशय सूक्ष्म असून ती ६७ व्या ‘अमिनो ॲसिड’मध्ये आहे. (‘ए १’ दुधात ६७ व्या स्थानी ‘हिस्टिडीन’ आणि ‘ए २’ दुधात ६७ व्या स्थानी ‘प्रोलिन’ हे प्रथिन असते.) या सूक्ष्म पालटामुळे पचनाच्या वेळी ‘ए १’ दुधातून ‘BCM-7’ (Beta-Casomorphin-7) नावाचा घटक सिद्ध होऊ शकतो’, असे काही अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे. काही संशोधनांनुसार या घटकांचा मधुमेह, पचनसंस्थेचे विकार आणि इतर आजारांशी संभाव्य संबंध आढळतो. (यावर अजूनही जागतिक स्तरावर संशोधन चालू आहे.) जर्सी आणि काही संकरित गायी यांच्या दुधात ‘ए १’ प्रकारचे ‘बीटा-केसीन’ असते, जे पचन प्रक्रियेच्या वेळी शरिरात घातक विषारी घटक सिद्ध करू शकते, तर भारतीय देशी गायींच्या दुधात ‘ए २’ प्रकारचे ‘बीटा-केसीन’ असल्याने ते दूध नैसर्गिक, पचायला सोपे अन् आरोग्यास अधिक उत्तम ठरते.
४. जर्सी गायीच्या दुधाच्या दुष्परिणामांमुळे जगभरात देशी गायींविषयी संशोधनाला प्रारंभ होणे

आपल्या देशी गायींविषयी असे परिणाम आढळून येत नाहीत. हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी विविध चाचण्या केल्या. या चाचण्या सोप्या नसून गायीच्या किंवा इतर प्राण्यांच्या केसांमधून (‘डी.एन्.ए.’ – जनुकीय चाचणी) केल्या जातात. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे प्रयोगशाळेत त्यासाठी वेळ लागतो; मात्र या सर्व चाचण्या केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले की, ‘ए १’ प्रकारचे दूध पिणे टाळले पाहिजे.
यानंतर ही माहिती हळूहळू सर्वत्र पसरू लागली आणि यावर आधारित संपूर्ण संशोधन अन् निष्कर्ष त्या पुस्तकामध्ये सविस्तर दिले गेले. या अभ्यासातून असा निष्कर्ष पुढे आला की, संकरित गायींच्या दुधामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके आधी थांबवणे आवश्यक आहे. याच विचारातून एक मोठे जनआंदोलन उभे राहिले. त्यानंतर जगभरात केवळ भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही लोकांनी भारतीय गोवंशियांकडे लक्ष द्यायला प्रारंभ केला. देशी गायींची मूळ रचना न पालटता त्यांच्यातील नैसर्गिक गुणधर्म जपून दूध उत्पादन कसे वाढवता येईल ? यावर संशोधन चालू झाले आणि या विषयाला एक नवा आयाम मिळाला.
या सगळ्या अभ्यासातून मला हेही कळले की, आपल्या भारतात ३० ते ३६ प्रकारच्या देशी गायी आहेत. उदाहरणार्थ गीर, कांकरेज, साहीवाल, हरियाणा, राठी, थरपारकर, देवणी, दांगी, खिल्लार, ओंगोल इत्यादी. या सर्व गायी ‘ए २’ दूध देणार्या आहेत.
५. म्हशीपेक्षा गायीचे दूध अधिक योग्य असण्यामागील कारणमीमांसा
म्हैस हा प्राणी रानरेड्यापासून हळूहळू माणसाळला गेला असून तिचा कृत्रिम संकर करून वेगळी जात सिद्ध केलेली नाही. ही परंपरा पूर्वापार चालत आलेली असल्यामुळे सर्व म्हशी ‘ए २’ दूध देणार्या आहेत. जाफराबादी, कोल्हापुरी, पंढरपुरी, मुर्रा अशा सर्व म्हशी भरपूर दूध देतात आणि त्यांचे दूध ‘ए २’ प्रकारचेच असते. याविषयात कोणतीही तफावत किंवा भेदभाव नाही. केवळ गाय आणि म्हैस यांच्या दुधामध्ये ‘फॅट’च्या (स्निग्धांशाच्या) प्रमाणात तफावत असते. साधारणपणे म्हशीच्या दुधामध्ये ६ ते ८ टक्के ‘फॅट’, तर गायीच्या दुधामध्ये ४ ते ५ टक्के ‘फॅट’ असते. त्यामुळे गायीचे दूध पचायला हलके आणि सोपे, तर म्हशीचे दूध ‘फॅट’ अधिक असल्यामुळे तुलनेने जड अन् पचायला कठीण असते. म्हणूनच लहान मुलांसाठी गायीचे दूध अधिक योग्य मानले जाते.
‘ए १’ दुधामध्ये शरिरासाठी घातक घटक सिद्ध होऊ शकतात. हे घटक ‘ए २’ गाय किंवा म्हैस यांच्या दुधामध्ये सिद्ध होत नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ‘ए २’ गाय आणि म्हैस यांचे दूधच पिणे योग्य आहे, तसेच कोणतेही दुग्धजन्य पदार्थ तूप, दही, ताक, लोणी किंवा इतर पदार्थ सिद्ध करायचे असतील, तर ते देशी गाय किंवा म्हैस यांच्या दुधापासूनच करावेत, हे आता स्पष्ट झाले आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
संपादकीय भूमिकाविदेशी गायीच्या दुधातील घातक घटक समजून घेऊन देशी गायींच्या संवर्धनास चालना देणे आजमितीला आवश्यक ! |
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
भाग १७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1003676.html
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !