श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्‍याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !

अयोध्या येथील श्रीराममंदिरातील देणगी चोरीवरून संतांनी केली मागणी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या व्यवस्थापनासाठी कुणा (सरकारनियुक्त) मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची आवश्यकता नाही. मंदिराला एका ‘दासा’ची (सेवक/भक्त याची) आवश्यकता आहे. त्या भक्ताची जीवनशैली ही सेवाभावावर, म्हणजेच नम्र भक्तीच्या भावनेवर आधारित असावी, असे वक्तव्य जगद्गुरु सतीश आचार्य महाराज यांनी येथे एका प्रसारमाध्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. श्रीराममंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या प्रकरणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास, हनुमानगढीचे महंत राजू दास, स्वामी करपात्रीजी महाराज आदी संतांचा समावेश होता.

जगद्गुरु सतीश आचार्य महाराज पुढे म्हणाले की, आम्हाला ‘आखाडा’ परंपरा किंवा ‘रामानंदी’ पंथातील अशा एका विद्वान आणि ज्ञानी साधूची आवश्यकता आहे, ज्याला धर्माचे सखोल ज्ञान असेल. येथे आवश्यकता आहे, ती धर्माची, धर्माचे रक्षण करण्याची आणि धर्माधिष्ठित प्रशासनाची !

श्रद्धा महत्त्वाची आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी नाही ! – महंत धर्मदास

या वेळी महंत धर्मदास म्हणाले की, श्रीराममंदिरा मुख्य प्रशासकीय अधिकार्‍याची काहीच आवश्यकता नाही, कारण तिथे स्वत: रामच वास करतात. श्रद्धा असल्याविना भक्ती आणि उपासना असू शकत नाही. श्रद्धा महत्त्वाची आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी नाही.

जर व्यवस्थापनाचे दायित्व आखाड्यांकडे असते, तर चोरी झाली नसती ! – महंत राजू दास

महंत राजू दास म्हणाले की, प्रभु श्रीराम हे कोणत्याही विशिष्ट पक्षाचे किंवा संघटनेचे नाहीत. त्यांच्यावर कुणाचाही ‘कॉपीराईट’ (मालकी अधिकार) नाही. जर श्रीराममंदिराचे व्यवस्थापन आखाड्यांकडे असते, तर अशी चोरी झाली नसती. संत परंपरेमध्ये देवाची सेवा व्यवसाय नाही. येथे श्रद्धेने लोक सेवा करतात.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोणताही अन्याय होणार नाही ! – महंत धर्मदास

महंत धर्मदास यांनी म्हटले की, जर योगीजींनी दायित्व सांभाळले नसते, तर इतक्या गुन्हेगारांना पकडता आले नसते. ते एक चांगली व्यक्ती आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोणताही अन्याय होणार नाही.