गोसंवर्धनामुळे ‘रुचियाना’ गूळ आणि ‘पितांबरी ॲग्रो टुरिझम’ यांच्यासंबंधीच्या अडचणी झाल्या न्यून !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

४ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले गायीचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व, तसेच आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे गोशाळा उभारण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया पाहिली. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग १४)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग १३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993925.html

१. गोमय उत्पादन चालू करणे आणि त्यामुळे ‘पितांबरी’च्या व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येणे

आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे आमची १० एकरांची स्वतःची जागा होती. ती जागा ‘ग्रीन झोन’ (हरित क्षेत्र) मध्ये येत असल्याने १० एकरांमध्ये केवळ १० सहस्र चौरस फूट बांधकामास अनुमती होती. त्यामुळे उर्वरित जागेचा उपयोग नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्या ठिकाणी आम्ही गायीच्या शेणापासून खतनिर्मितीची प्रक्रिया चालू केली. गोमय कुजवण्यासाठी ‘ट्रायकोडर्मा’ आणि इतर उपयुक्त जिवाणूंचा वापर करून गायीच्या शेणाची कुजवण केली जाई. अशा पद्धतीने आम्ही ‘गोमय’ नावाचे उत्पादन विकसित केले. प्रारंभीला हा प्रयोग छोट्या प्रमाणात चालू झाला; मात्र हळूहळू गोमयची मागणी वाढू लागली.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

यापूर्वी आम्ही गांडूळ खत सिद्ध करत होतो. त्या वेळी म्हशीचे शेण बाहेरून आणून त्यात गांडुळे सोडून खतनिर्मिती केली जात होती; मात्र त्या उत्पादनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. गायीचे शेण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल, अशी कल्पनाही तेव्हा नव्हती. गोमय शेतकर्‍यांना वापरासाठी दिल्यानंतर प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले. पिकांची वाढ, उत्पादनातील फरक आणि भूमीची सुधारलेली गुणवत्ता यांमुळे शेतकरी समाधानी झाले. त्याचा परिणाम असा झाला की, ते पुन्हा पुन्हा गोमय खरेदी करू लागले. त्यामुळे उत्पादन, कामगार आणि जागेशी संबंधित अनेक अडचणी आपोआप सुटत गेल्या.

या स्थैर्यानंतर त्याच ठिकाणी आम्ही अगरबत्ती उत्पादनाचा कारखाना (फॅक्टरी) चालू केला. त्याचे उत्पादन प्रारंभीपासूनच व्यवस्थित चालू लागले. एका मागोमाग एक गोष्टी सुरळीत घडू लागल्यावर मला स्पष्टपणे जाणवले की, हे केवळ व्यावसायिक नियोजनाचे यश नाही, तर गायींच्या सान्निध्यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा हा परिणाम आहे.

‘गायीची सेवा केवळ अध्यात्मपुरती मर्यादित नसून ती उद्योग, शेती आणि जीवन यांच्या प्रत्येक पातळीवर सकारात्मक परिवर्तन घडवून आणते’, हा माझ्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव आहे.

वसुबारसेला गायीची पूजा आणि प्रतिमास गोसेवा करणे !

गायीचे पूजन करतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि उपस्थित अन्य कर्मचारी

मागे वळून पहातांना जाणवते की, एका मागोमाग एक गोष्टी कशा जुळून येत गेल्या, हे खरोखरच अनाकलनीय आहे. परमेश्वराची कृपा आणि गायींचे सान्निध्य यांमुळे निर्माण झालेली सकारात्मकता यांमुळेच हा प्रवास शक्य झाला, असा माझा ठाम विश्वास आहे. तेव्हापासून आम्ही वसुबारसेच्या दिवशी गायींची विधीवत् पूजेस प्रारंभ केला. ही केवळ एक परंपरा न रहाता आमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली. प्रतिमासाला मी स्वतः आवर्जून तेथे जाऊन गायींना घास भरवणे, त्यांना केळी भरवणे, तसेच घरच्या पोळ्या करून स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घालणे, अशी गोसेवा आम्ही सातत्याने करत आलो आहोत. या सेवेतून केवळ समाधानच नव्हे, तर मनःशांती आणि सकारात्मकता यांचा अनुभवही मिळतो.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

२. तळवडे येथे गायीचा गोठा उभारण्यातील अडचणी न्यून होऊन तो उभारला जाऊन ‘रुचियाना’ गूळ पावडरची निर्मिती होणे

तळवडे (जिल्हा रत्नागिरी) येथे आमच्या मूळ गावाच्या ठिकाणी आम्ही ५ एकर जागा घेतली होती. त्या काळात संघाचे प्रचारक प्रल्हाद अभ्यंकर यांनी आम्हाला एक महत्त्वाचा सल्ला दिला, ‘गावाकडे जा, तिथे प्रयोग करा, उद्योग उभे करा.’ या शब्दांनी मनात ठाम निर्धार केला की, आपल्या गावासाठी काहीतरी करायचे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल-तळवडे हे आमचे गाव आहे. आनगाव येथे असलेल्या गायींना वासरू झाल्यामुळे ८ गायी झाल्या होत्या. त्यापैकी ४ गायी आम्ही तळवडेला आणल्या. त्या गायी गावात आणल्यानंतर प्रथम गोठा उभारण्यात आला. त्यानंतर हळूहळू पालट जाणवू लागले. पूर्वी ज्या ठिकाणी सतत अडचणी आणि कटकटी होत असत, त्या न्यून होऊ लागल्या. कामगार टिकू लागले. दीर्घकाळ प्रलंबित असलेली वीजजोडणी मिळाली. पाण्यासाठी आवश्यक असलेली विहिरीची जागाही मिळाली. एका मागोमाग एक अडथळे दूर होत गेले. यानंतर शेतीला प्रारंभ झाला. ऊस आणि केळी यांची लागवड करण्यात आली. पुढे गुर्‍हाळ चालू झाले. गुळाच्या ढेप सिद्ध झाल्या आणि त्यातून ‘रुचियाना गुळाची पावडर’ विकसित झाली. हे उत्पादन बाजारात यशस्वी ठरले आणि अल्पावधीतच त्याची ओळख निर्माण झाली. गायी प्रतिदिन त्या परिसरात चरायला जात होत्या. त्यांच्या सान्निध्यामुळेच भूमी सुपीक होत गेली, वातावरण सकारात्मक झाले आणि कामांना गती मिळाली.

३. राजापूर तालुक्यात ऊसाची लागवड वाढून ‘रुचियाना’ गुळाची विक्री महाराष्ट्रासह अन्य राज्यांत चालू होणे

गायींच्या उपस्थितीमुळे तळवडे गावात पुन्हा एकदा समृद्धीचे चक्र चालू झाले. हा केवळ विश्वास नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून उमटलेला निष्कर्ष आहे. यानंतर आमच्यासमोर आणखी एक संधी चालून आली. वाडेकर नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचे निसर्गोपचार केंद्र होते आणि त्यांची १० एकरांची जागा विक्रीसाठी उपलब्ध होती. त्या जागेची किंमत त्यांनी २ कोटी रुपये सांगितली होती. परिसरात झाडे लावलेली होती, जुने पण उपयोगी बांधकाम होते, तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेली जागाही होती.

प्रारंभी आम्ही ती जागा ६ मासांसाठी भाड्याने घेतली. त्या काळात या जागेचा नेमका उपयोग कसा करता येईल ?, याचा सखोल विचार चालू होता. याच कालावधीत ‘कोकण विकास प्रतिष्ठान’चे संजय यादवराव यांच्यासह अनेकदा कोकणाचे दौरे मी केले होते. त्या दौर्‍यांतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, या परिसरात कृषी पर्यटनाला मोठी संधी आहे. याच काळात राजापूरमधील ‘अर्जुना’ धरण पूर्ण झाले होते. त्या धरणाचे पाणी या भागात येऊ लागले. परिणामी परिसरातील विहिरी, शेती आणि वाड्यावस्त्या इथपर्यंत पाण्याची उपलब्धता वाढली. कालवे सिद्ध झाले आणि आज तर आमच्या शेतापर्यंत कालव्यांचे पाणी येते. त्यामुळे तळवडे परिसरात बारमाही पाण्याचे चित्र निर्माण झाले.

पाण्याची उपलब्धता वाढताच आम्ही ऊसाची लागवड चालू केली. पहिल्याच टप्प्यात अनुमाने ३५ टन ऊसाचे उत्पादन मिळाले. त्यानंतर शेजारच्या सौंदळ गावात भाड्याने जागा उपलब्ध झाली. तेथेही ऊसाची लागवड करण्यात आली. या सर्व क्षेत्रांतून मिळून जवळपास ३ सहस्र टन ऊसाचे गाळप करण्यात आले. याच गाळपातून पुढे ‘रुचियाना’ गुळाची पावडर सिद्ध झाली. या उत्पादनाची विक्री प्रारंभीला महाराष्ट्रात चालू झाली आणि नंतर राज्याच्या बाहेरही विस्तारली. अल्पावधीतच या उत्पादनाने बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

४. ‘पितांबरी ॲग्रो टुरिझम’चा प्रारंभ

आनगाव येथे अगरबत्ती निर्मितीचा कारखाना आणि गोमयाचे उत्पादन चालू होते; पण त्याच आवारात काही अतिरिक्त जागा उपलब्ध होती. त्या जागेचा उपयोग करून काही नवे करता येईल का ?, असा विचार मनात येऊ लागला. याच काळात माझे मेव्हणे (बहिणीचे पती) नाशिकहून ठाण्याला आले होते. त्यांची कल्याण येथे बेकरी होती. मी त्यांना बेकरी चालवण्याविषयी विचारले आणि त्यांनी तात्काळ सिद्धता दर्शवली. त्यानंतर आम्ही बेकरीचा उपक्रम चालू केला. खारी, बिस्किटे, टोस्ट, बटर यांसारखी उत्पादने सिद्ध होऊ लागली. आनगावला आधीपासूनच गायी असल्यामुळे संपूर्ण कामकाज सुरळीतपणे पुढे जात राहिले.

एका टप्प्यावर आनगावची जागा विक्रीस काढण्याचाही विचार झाला होता. त्यासाठी अडीच ते ३ कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव मिळाले. तरीही ही किंमत आम्हाला समाधानकारक वाटत नव्हती. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ही जागा बाबांच्या आठवणींशी जोडलेली असल्याने ती विकण्याची माझी इच्छा नव्हती. याच कालावधीत सरकारकडून पत्र आले की, एकूण भूमीपैकी सव्वा एकर जागा महामार्गाच्या प्रकल्पात जाणार आहे. प्रत्यक्षात सव्वा एकर जागा अधिग्रहित करण्यात आली आणि त्या एकाच भागासाठी आम्हाला जवळजवळ अडीच कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, म्हणजे संपूर्ण जागा विकल्यास जेवढी रक्कम मिळाली असती, तेवढीच रक्कम केवळ एका एकरासाठी मिळाली. याच निधीचा उपयोग पुढे वाडेकर यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आला. ती जागा मिळाल्यानंतर तेथे ‘पितांबरी ॲग्रो टुरिझम’चा प्रारंभ झाला केली. या उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आणि अल्पावधीतच हा उपक्रम यशस्वी ठरला.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

भाग १५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998850.html

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

संपादकीय भूमिका : गोसेवा केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती उद्योग, शेती आणि जीवन यांच्या प्रत्येक पातळीवर सकारात्मक परिवर्तन घडवून आणते !