९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ९ ऑगस्टला कारसेवा करण्याच्या संतांच्या घोषणेचे प्रकरण

काली सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप

हरिद्वार (उत्तराखंड) – देशात ९ ऑगस्ट हा ‘क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. जर श्रीकृष्णजन्मभूमीसाठी संतांच्या नेतृत्वाखाली कोणती क्रांती झाली, तर सर्व संतांनी एकत्र येऊन तिला पाठिंबा दिला पाहिजे. आम्हीही कारसेवेत सहभागी होऊ. जर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही. जर असे झाले नाही, तर संत प्रतीकात्मक कारसेवा करून संदेश देतील, असे विधान काली सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी येथे केले. हरिद्वार येथे निरंजनी आखाड्यात झालेल्या बैठकीत संतांनी अभियानाची रणनीती आखली आणि देशभरातील साधू-संतांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. संतांनी सांगितले की, कारसेवेत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनाही आमंत्रित केले जाईल.

स्वामी आनंद स्वरूप यांनी असेही सांगितले की, मुसलमान समाजाचा एक वर्गही ‘श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम व्हावे’, अशी इच्छा बाळगतो, जेणेकरून दीर्घकाळापासून चालू असलेला वाद संपुष्टात येईल आणि देशात हिंदु-मुसलमान एकता भक्कम होईल.

कावड यात्रा संपल्यानंतर कारसेवेचा दिनांक घोषित केला जाईल ! – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज म्हणाले की, सर्व संतांनी ‘चलो मथुरा चलें’ (चला मथुरेला जाऊया) असे आवाहन केले आहे. ज्याप्रमाणे अयोध्येत साधू-संत आणि महात्मा मोठ्या संख्येने पोचले होते, त्याचप्रमाणे आता मथुरेतही सर्व संत-महात्मा आणि भाविक पोचतील. श्रीकृष्णजन्मभूमीवर मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर व्हावे, अशी सर्वांची एकच मागणी आहे. ज्यांची श्रीकृष्णजन्मभूमीवर श्रद्धा आहे, ते सर्व तिथे पोचतील. मंदिर बांधणीचे काम लवकर चालू व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. हे आवाहन केवळ काही संतांचे नाही, तर संपूर्ण सनातन समाजाचे आहे. कावड यात्रेनंतर कारसेवा कार्यक्रमाची औपचारिक घोषणा केली जाईल. यात विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्वर, संत आणि महंत सहभागी होतील.