वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister

पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांचा दावा

पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की (मध्यभागी) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (डावीकडे वर्तुळात) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे वर्तुळात)

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर अत्यंत आदराचे स्थान असलेले नेते आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन जगात ज्या मोजक्या नेत्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकतात आणि ज्यांच्या दबावाचा त्यांच्यावर परिणाम होतो, त्यात पंतप्रधान मोदी यांचा समावेश आहे. भारताचे रशिया आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनशी असलेले संबंध ऐतिहासिक आणि दृढ आहेत. याच संबंधांचा वापर करत पंतप्रधान मोदी यांनी २०२२ च्या शेवटी पुतिन यांना युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून रोखून जगाला मोठ्या संकटातून वाचवले होते, असा दावा युरोपमधील देश पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांनी येथे केला. नवी देहलीत पार पडलेल्या ‘भारत-पोलंड संयुक्त आर्थिक आयोगा’च्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पोलंडने केवळ युक्रेन युद्धातील भारताच्या भूमिकेचेच नव्हे, तर इराण-इस्रायल तणावाच्या संदर्भातील भारताच्या भूमिकेचेही कौतुक केले. या प्रसंगी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला ‘स्थायी सदस्यत्व’ मिळावे, या भारताच्या मागणीला पोलंडने पाठिंबा घोषित केला.