रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साम्राज्यलक्ष्मी यागाच्या संदर्भातील संशोधन !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २१.२.२०२४ या दिवशी ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला. हा याग ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, ‘सनातन संस्थेच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’ आणि ‘लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशांनी करण्यात आला. यागाचे पौरोहित्य सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केले. यागाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या अन्य संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.

‘साम्राज्यलक्ष्मी यागाचा यागातील विविध घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

‘साम्राज्यलक्ष्मी यागा’च्या वेळी करण्यात आलेली देवतांची मांडणी

१. चाचण्यांतील नोंदींचे विवेचन

यागातील विविध घटकांची यागापूर्वी आणि यागानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

लोलकाद्वारे चिकित्सा

१ अ. यागानंतर यागाच्या घटकांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : यागापूर्वी पुरोहित आणि यागाला उपस्थित ४ साधिका यांच्यामध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली; पण यागानंतर ती नाहीशी झाली. यागानंतर सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. घटकांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

१ आ. यागातील धुरांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

हिंदूंनो, तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हा इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे. त्यामुळे यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक अन् मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना आणि यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते. आवश्यक त्या तीव्रतेने साधना करणे सर्वांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये यज्ञ करणे, हा सर्वांत सोपा आणि सर्वांसाठी पूरक असा मार्ग आहे. यज्ञाचा वातावरणावरही पुष्कळ जलद आणि अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो, हे विविध वैज्ञानिक संशोधनांतूनही सिद्ध झाले आहे. यासाठी हिंदूंनो, आगामी तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्यापुढे रामराज्य स्थापनेसाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. चाचण्यांचा निष्कर्ष

सौ. मधुरा कर्वे

वरील सर्व नोंदींवरून लक्षात येते की, साम्राज्यलक्ष्मी यागाचे यागातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम झाले. यागानंतर पूजेच्या मांडणीतील श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. यागाच्या धुरात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. याग भावपूर्ण आणि परिपूर्ण झाल्याने यागातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित झाले. यागाला उपस्थित असलेल्या साधिकांनी त्यांच्या क्षमतेनुसार यागातील चैतन्य ग्रहण केले. यागाला उपस्थित राहिल्याचा त्यांना आध्यात्मिक लाभ झाला. पुरोहितांनी यागाचे पौरोहित्य सेवाभावाने केल्याने त्यांनाही आध्यात्मिक लाभ झाला. यागानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकार्‍यांमधील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. असे होणे, हे संतांमधील चैतन्य समष्टीसाठी कार्यरत झाल्याचे दर्शक आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक