
मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला यंदा ८ सहस्र ८०० वर्षांनी आलेल्या सीता स्वयंवराच्या मुहूर्तावर भारताच्या राष्ट्रनिर्माणाचा दिव्य स्रोत प्रदान करणार्या अयोध्या नगरीतील मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिराची उभारणी पूर्ण होऊन अंतिमतः कळसावर सुवर्णकिनार असलेल्या चैतन्यमय धर्मध्वजाची स्थापना झाली. हा अलौकिक दैवी धर्मध्वज सनातन धर्माच्या पुनरुत्थानाचे, पुनर्जागरणाच्या आरंभाचे प्रतीक ठरणार आहे. सनातन धर्मामध्ये धर्मध्वजाला अनन्यसाधरण महत्त्व आहे. ध्वज हे राष्ट्राच्या अस्तित्वाचे सन्मानचिन्ह आहे. ‘राष्ट्र हे रामराज्याचे प्रतीक हवे’, असे आपली सनातन परंपरा सांगते. श्रीरामाच्या सैन्यध्वजाप्रमाणे दैवी कोविदार वृक्ष, सूर्यवंशी रघुंवशाचे प्रतीक असलेला तेजोयम सूर्य आणि ब्रह्मांडाचे बीजाक्षर, बीजमंत्र, बीजध्वनी ‘ॐ’ चिन्हांकित असलेला धर्मध्वज श्रीराममंदिराच्या कळसावर स्थानापन्न होणे, ही येत्या काळात भारतातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा परिपोष होण्याची नांदी आहे. आता रामलल्ला केवळ मंदिरातच आलेले नाहीत, तर ते दरबारात स्थानापन्न झाले आहेत. येत्या काळात हिंदु राष्ट्राच्या माध्यमातून होणार्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी श्रीराममंदिर कळसस्थित हा धर्मध्वज श्रीरामाचे चैतन्यमयी दैवी तत्त्व वातावरणात प्रक्षेपित करत राहील आणि रामरायाच्या कृपाशीर्वादाने लवकरच रामराज्याची स्थापनाही होईल, यात शंकाच नाही !

दिव्य, भव्य आणि नव्य (नव्या) अयोध्यानगरीत संत-महंतांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते २५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी झालेली धर्मध्वजाची स्थापना हा श्रीरामाचे भक्त आणि देशभक्त यांच्यासाठी परम सौभाग्याचा दिवस आहे. हा दिवस खर्या अर्थाने ऐतिहासिक यासाठी आहे की, या धर्मध्वजाच्या साक्षीने, या धर्मध्वजाच्या चैतन्याने, या धर्मध्वजाच्या परमपावन दर्शनाने आणि या धर्मध्वजाच्या अलौकिक दैवी अस्तित्वाने येत्या काळात हिंदूंना राष्ट्राचे पुनरुत्थान, पुनर्उभारणी अन् पुनर्रचना करण्याची प्रेरणा मिळणार आहे. रामरायांना अभिप्रेत असलेले सनातन राष्ट्र खर्या अर्थाने तेव्हाच अस्तित्वात येईल, जेव्हा ते पुन्हा एकदा रामराज्य होईल. हे राष्ट्र ‘रामराज्य’ म्हणजेच ‘आदर्श राज्य’ होण्यासाठी लागणारी दैवी ऊर्जा हा धर्मध्वज अखंडितपणे प्रत्यक्ष रामरायाकडून पुरवणार आहे. जसे श्रीराममंदिराची उभारणी झाल्यावर कोट्यवधी देशभक्तांच्या मनात हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेची निश्चिती झाली, तसेच आता त्याच्याच कळसावरील धर्मध्वजाच्या स्थापनेने हिंदु राष्ट्राच्या कार्याला गती मिळेल, याची निश्चिती झाली आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनीही नेमकेपणाने परकीय दास्यत्वाची मानसिकता उलथवून स्वत्वाची, स्वदेशत्वाची, या मातीत असलेल्या मूळ तत्त्वांची जाणीव दृढ करण्याचे केवळ आवाहनच केलेले नाही, तर समयमर्यादाही दिली, हे चांगले झाले.

अंतरंगात श्रीरामाची स्थापना करा !

पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगाला राष्ट्रनिर्माणाच्या धाग्याने अलगदपणे जोडून भारतियांना अत्यंत व्यापक अशा राष्ट्रनिर्माणाचे ध्येय दिले. रामरायाच्या अलौकिक गुणवर्णनाने त्यांनी रामभक्तांमध्ये भावसुमने प्रज्वलित केलीच; परंतु त्याचसमवेत त्यांच्यात राष्ट्रभक्तीची नवी बिजेही पेरली. पुढील १० वर्षांत पाश्चात्त्यांच्या मानसिक दास्यत्वापासून भारताला मुक्त करण्याचे मोदी यांनी दिलेल्या ध्येयाचे आयाम राष्ट्राच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पालटापासून चालू होतात आणि नागरिकांच्या दैनंदिन आहार-विहारापासून ते थेट धर्माचरणापर्यंत जाऊन पोचतात. मोदी यांनी अंतरंगात श्रीरामाचे तत्त्व जागृत करण्याचे आवाहन केले, जे भावी स्वयंपूर्ण भारताचा पाया आहे. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की, जग आज भारताकडे ‘मार्गदर्शन करणारा देश’ म्हणून आशेने पहात आहे. हे दायित्व भारताला स्वतःमध्ये निर्माण करायचे असेल, तर मर्यादापुरुषोत्तम श्रीरामतत्त्वाचा धर्मध्वज प्रत्येक भारतियाने त्याच्या मनमंदिरात स्थापन करायला हवा. ‘श्रीरामाचा दरबार’ आता अस्तित्वात आला, म्हणजे त्याचे राज्य चालू झाले आहे. त्यामुळे आता खर्या अर्थाने भारतात रामराज्य अवतरित करण्याचे दायित्व शासनासह प्रजाजनांचे आहे. पंतप्रधानांनी आवर्जून नव्याने बांधण्यात आलेल्या सप्तर्षींसह रामपरिवारातील अन्य मंदिरांत जाण्याचे आवाहन केले. माता शबरी, निषादराज, परमभक्त हनुमान, शेषावतार लक्ष्मण आदी सारे अत्युच्च गुणांचे आदर्श आहेत, ज्यांच्यामुळे रामराज्य अवतरित झाले आहे. येणार्या काळात भारतात रामराज्य येण्यासाठी या गुणांनी युक्त व्यक्तींच्या सामूहिक शक्तीची चेतना आवश्यक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘पुढील १ सहस्र वर्षांचा विचार आपल्याला करायचा आहे’, असे पंतप्रधान म्हणाले. त्यासाठी कितीही संकटे आली, तर त्यामुळे विचलित न होता कार्यरत रहाण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले. आध्यात्मिकदृष्ट्याही पुढील १ सहस्र वर्षे येणारे हिंदु राष्ट्र टिकणार आहे. असे आदर्श राज्य चालण्याची आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी हिंदूंनी आता आरंभ केला पाहिजे. तो स्वतःपासूनच आधी केला पाहिजे. त्यासाठी रामभक्तीचा पाया भक्कम हवा, तरच श्रीरामाच्या कृपेने त्याला अपेक्षित अशा रामराज्याच्या दिशेने आपली वाटचाल पक्की होईल.
राममंदिराकडून राष्ट्रमंदिराकडे !

अश्वमेध यज्ञ करून पूर्ण पृथ्वी पादाक्रांत केलेल्या श्रीरामाने १० सहस्र वर्षे राज्य केले. पूर्ण विश्वाने रामराज्याला मान्यता दिली होती. आताच्या भारताला केवळ आर्थिक नव्हे, तर आध्यात्मिक विकास साधूनच पुढील सहस्रो वर्षांचा पाया रचता येईल. नीतीमान प्रजा आणि धर्माचरणी राजा, हे रामराज्याचे मूलभूत आधारस्तंभ होते. तिसर्या शतकात विक्रमादित्याने आणि ६ व्या शतकात स्कंधगुप्त राजाने अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधले होते, १२ व्या शतकात मेघसेतू राजाने येथे मंदिर बांधले होते, जे बाबराने उद्ध्वस्त केले. गेल्या ५०० वर्षांत कोट्यवधी रामभक्त, देशभक्त आणि संत यांनी श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी केलेल्या असीम त्यागातून आजचे श्रीराममंदिर उभे राहिले. श्रीराममंदिरासाठी संघर्ष आणि प्राणांचे बलीदान दिलेल्या शेकडो नागरिकांच्या आत्म्याला आता शांती लाभली असेल, यात शंकाच नाही; परंतु जसे केवळ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर समाधान मानून चालणार नव्हते, तर देश घडवण्याचे कार्य महत्त्वाचे होते, अगदी तसेच केवळ देवतेचे तत्त्व कार्यरत झाले, म्हणून देव आणि देश भक्तांनी समाधान मानून चालणार नाही, तर आता खर्या अर्थाने त्यांना आदर्श राष्ट्रउभारणीसाठी तन अन् मन अर्पण करावे लागणार आहे.

देशाच्या कानाकोपर्यात ‘आदर्श व्यवस्था’ निर्माण करण्यासाठी त्यांना कार्यरत रहावे लागणार आहे. रामराज्यात सर्वांना समान न्याय होता, महिला सुरक्षित होत्या आणि कठोर आज्ञापालन होते. हे सारे शासनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. राजाला प्रजेविषयी आणि प्रजेला राजाविषयी धाक अन् प्रेम दोन्ही होते. अशी स्थिती निर्माण करण्यासाठी शासन आणि जनता दोघांनाही कष्ट घ्यावे लागणार आहेत.

सुरक्षा हे राष्ट्राचे प्रथम कर्तव्य असते, त्या दिशेने भारताचे प्रयत्न चालू झाले आहेतच; परंतु अद्यापही सर्व प्रकारच्या अंतर्गत जिहादरूपी रावणांना मिटवण्यासाठी शासनाची ‘शून्य सहनशक्ती’ची भूमिका तीव्र झालेली नाही. हत्या, बलात्कार, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांनी टोक गाठलेले आहे.

या गुन्हेगारांना रामनामाचा अखंड जप करण्याची शिक्षा दिली, तरच त्यांच्यात अंतर्बाह्य पालट होऊ शकतो. ‘आता श्रीराममंदिरावर फडकलेला धर्मध्वजच ही प्रेरणा शासन, प्रशासन आणि जनता यांना देईल’, अशी आशा या निमित्ताने करायला हरकत नाही. ‘मोदी यांना वर्ष २०४७ मध्ये अपेक्षित असलेला ‘विकसित भारत’ हा ‘विश्वगुरु भारत’ असायला हवा’, असे या धर्मध्वजाकडून येणार्या वायूलहरी सांगत आहेत. ‘येत्या काही वर्षांत ‘आर्थिक महासत्ता’ होणारा भारत ‘आध्यात्मिक महासत्ता’ म्हणून गणला जावा’, असे हा डौलाने फडकणारा धर्मध्वज सांगत आहे. त्याची हाक ऐकून त्याचा यथोचित सन्मान राखण्यासाठी आता शासनासह प्रत्येक देशभक्त आणि देवभक्त यांनी संघटितपणे रामनामाचा जयघोष अंतरी ठसवायला हवा !
| भारताला केवळ आर्थिक नव्हे, तर अध्यात्मिक विकास साधूनच पुढील सहस्रो वर्षांचा पाया रचता येईल ! |
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !